१० मीटर एअर रायफलमध्ये चार सुवर्णपदकांची कमाई

मुंबई : गोवा येथे नुकत्याच पार पडलेल्या वेस्ट झोन शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये विलेपार्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (CSMSS) संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील (PTKS) प्रतिभावान नेमबाज तनया एन. जैन हिने आपल्या अचूक आणि दमदार नेमबाजीचे दर्शन घडवत १० मीटर एअर रायफल प्रकारात तब्बल चार सुवर्णपदकांची कमाई केली.

तनयाने या स्पर्धेत सीनियर, ज्युनिअर, युथ आणि सब-युथ अशा चारही गटांत अव्वल स्थान पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले. तिने ४०० पैकी तब्बल ३९७ गुण मिळवत नेमबाजीतील आपली गुणवत्ता आणि सातत्य अधोरेखित केले.

चार गट, चार विजय आणि चार सुवर्णपदके, अशी दैदिप्यमान कामगिरी करत तनया जैनने आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्या या यशामुळे प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या शिरपेचातही आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

तनयाच्या या उल्लेखनीय यशामागे तिचे प्रशिक्षक स्नेहल जितेश कदम आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अचूक मार्गदर्शन, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलातील सातत्यपूर्ण प्रशिक्षण आणि अविरत सराव तसेच PTKS अध्यक्ष अरविंद प्रभू यांचे वेळोवेळी खेळाडूंना मिळालेले प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले. त्याचबरोबर तनयाची एकाग्रता, शिस्त, सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि जिद्द यामुळे तिने हे यश संपादन केले.

तनयाच्या या शानदार कामगिरीबद्दल तिचे प्रशिक्षक, क्रीडा संकुलातील पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींकडून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे. नेमबाजीच्या क्षेत्रात तनया भविष्यातही अशीच दमदार कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास तिच्या प्रशिक्षकांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *