शहर पथविक्रेत्यांचा इंदिरा चौकातून मनपा कार्यालयावर मोर्चा

कल्याण : पथविक्रेत्यांवर सुरू असलेल्या कथित बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ शहर पथविक्रेता समितीच्या वतीने बुधवारी रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. हा मोर्चा सकाळी ११ वाजता डोंबिवली पूर्वेतील इंदिरा चौक येथून निघणार असून, महानगरपालिका कार्यालयावर धडकणार असल्याची माहिती केडीएमसीच्या शहर पथ विक्रेता समितीचे सदस्य भालचंद्र पाटील यांनी दिली. शहर पथविक्रेता अधिनियम २०१४ नुसार पथविक्रेत्यांना संरक्षण देणे आवश्यक असताना, प्रशासनाकडून कायद्याचे उल्लंघन करून कारवाई केली जात असल्याचा आरोप पथविक्रेता समितीने केला आहे. कारवाईमुळे अनेक पथविक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होऊन त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचे समितीचे म्हणणे आहे.

या पार्श्वभूमीवर पथविक्रेत्यांवरील कारवाई तात्काळ बंद करावी, जप्त केलेल्या गाड्या व साहित्य तातडीने परत करावे, नोंदणीकृत पथविक्रेत्यांना व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच बेकायदेशीर कारवाई करणाऱ्या संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशा विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष न दिल्यास मोर्चानंतर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही समितीने दिला आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *