भारताच्या यश फडतेने जिंकले आरहूस स्क्वॉश स्पर्धेचे जेतेपद
मुंबई, ८ सप्टेंबर: भारतीय स्क्वॉशपटू यश फडतेने डेन्मार्क येथील आरपीएम पॉवर आरहूस ओपन ही स्क्वॉश स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा डॅनिश स्क्वॉश कॅलेंडरमधील तसेच युरोपियन स्क्वॉश सर्किटमधील एक प्रमुख स्पर्धा मानली जाते. संपूर्ण स्पर्धेत फडतेने उत्कृष्ट कामगिरी केली आणि विजेतेपदापर्यंतच्या प्रवासात त्याच्यापेक्षा वरचे मानांकन असलेल्या अनेक खेळाडूंना पराभूत केले.
उपांत्यपूर्व फेरीत गोव्याच्या फडतेने तिसऱ्या मानांकित आयर्लंडच्या कार्ल मॅकलॉघनीला ३-० (११-७, ११-८, ११-९) अशा फरकाने हरवले. त्यानंतर, उपांत्य फेरीत त्याने दुसऱ्या सीडेड डेन्मार्कच्या माल्थे लॉरसेनवर ३-१ असा विजय मिळवला.
अंतिम सामन्यात फडतेसमोर टॉप सीडेड डेन्मार्कच्या मॅग्नस लॉरसेचे आव्हान होते. यातही त्याने उत्कृष्ट खेळ करत ६२ मिनिटांत ३-१ (११-८, १८-१६, ७-११, ११-४) असा विजय मिळवून विजेतेपद पटकावले.
आरहूस स्क्वॉश स्पर्धेमधील सर्वोत्तम कामगिरीनंतर यशने बेल्जियममधील पीएसए अरामिस ओपनवर लक्ष केंद्रित केले आहे. ही स्पर्धा १० दिवसांनी सुरू होणार आहे. त्यानंतर तीन आठवड्यांनी तो फ्रान्समधील ब्रेस्ट येथे होणाऱ्या पीएसए ब्रेस्ट स्क्वॉश ओपन स्पर्धेत सहभागी होईल.
0000000
