महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते उद्घाटन; नागरी समस्या व विकासकामांना गती मिळण्याची नागरिकांची अपेक्षा
दिवा, दि. ७ सप्टेंबर (आरती परब) : दिवा प्रभाग समितीचे नवनियुक्त अध्यक्ष दीपक जाधव यांच्या कार्यालयाचे उद्घाटन ठाणे महापालिकेच्या महापौर शर्मिला पिंपोळकर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर महापौर पिंपोळकर यांनी जाधव यांचा सत्कार करून त्यांना अध्यक्षपदाची खुर्ची ग्रहण करण्यास सांगितले.
यावेळी दिवा शहरप्रमुख तथा नगरसेवक रमाकांत मढवी आणि उपशहरप्रमुख तथा नगरसेवक शैलेश पाटील यांनी दीपक जाधव यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला नगरसेवक, विविध पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक मान्यवरांची मोठी उपस्थिती होती.
दिवा शहरातील वाढत्या नागरी समस्या, प्रलंबित विकासकामे तसेच भविष्यातील विविध विकासकामांना गती मिळावी, यासाठी प्रभाग समितीच्या माध्यमातून प्रभावीपणे काम केले जाईल, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. नव्या अध्यक्षांच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचून त्या मार्गी लागतील, अशीही अपेक्षा आहे.
दरम्यान, दिवा प्रभाग समितीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही अध्यक्ष दीपक जाधव यांचा सत्कार करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच ठाणे महापालिका सभागृह नेते हणमंत जगदाळे यांनी नूतन कार्यालयाला भेट देऊन दीपक जाधव यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या.
नूतन अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर दिवा विभागातील मूलभूत सुविधा, नागरी प्रश्न आणि विकासकामांना प्राधान्य देत काम करण्याचे मोठे आव्हान दीपक जाधव यांच्यासमोर आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकाळात दिव्याच्या विकासाला कितपत गती मिळते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
