सातबारा, नकाशे अन् ई-मोजणीची सेवा मोबाईलवर
अशोक गायकवाड
कर्जत : भूमी अभिलेख विभागातील कागदपत्रे आणि विविध अभिलेख मिळविण्यासाठी नागरिकांना आता शासकीय कार्यालयांच्या वारंवार चकरा मारण्याची गरज राहणार नाही. ‘महाभूमी महाराष्ट्र’ या ऑनलाइन पोर्टलमुळे भूमी अभिलेख विभागाच्या अनेक महत्त्वाच्या सेवा घरबसल्या उपलब्ध झाल्या असून, नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचणार आहेत. या डिजिटल सुविधेचा नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कर्जत भूमी अभिलेख कार्यालयाचे शिरस्तेदार शैलेश जाधव यांनी केले आहे.
जमाबंदी आयुक्त तथा संचालक, भूमी अभिलेख, महाराष्ट्र राज्य, पुणे शैलेश नवल आणि अपर जमाबंदी आयुक्त तथा अतिरिक्त संचालक ज्ञानेश्वर खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली ऑनलाइन सेवा अधिक सुलभ करण्यात आल्या आहेत. ‘महाभूमी’ पोर्टलवर डिजिटल ७/१२ उतारा, गाव नकाशे, एकत्रीकरणपूर्व टिपण, फाळणी नकाशा आणि पक्का बुक यांसारखे अभिलेख ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहेत. तसेच एकत्रीकरण योजनेचा उतारा आणि पोटहिस्सा नकाशेही घरबसल्या मिळविता येणार आहेत.
ई-मोजणीसाठीही नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ई-मोजणी अर्जाची सद्यस्थिती आणि मोजणी नोटीस ऑनलाइन पाहता व डाउनलोड करता येणार असून ही सुविधा विनाशुल्क उपलब्ध आहे. अर्जानुसार मोजणीची क-प्रतदेखील ऑनलाइन डाउनलोड करता येणार आहे. एकाच डिजिटल व्यासपीठावर विविध सेवा उपलब्ध झाल्याने कार्यालयीन पाठपुरावा कमी होऊन शासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता वाढण्यास मदत होणार आहे. ‘सरकारी कार्यालयात जाण्याऐवजी सेवा आता नागरिकांच्या मोबाईलवर’ या संकल्पनेला ‘महाभूमी’ पोर्टलमुळे प्रत्यक्ष बळ मिळाले असून, भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सेवेचा हा उपक्रम नागरिकांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.
0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *