डॉ. गोरक्ष धोत्रे युगांडाचे
‘केअर ग्लोबल ॲम्बेसेडर’
मुंबई : माध्यम व चित्रपट उद्योगातील प्रदीर्घ अनुभव तसेच सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत डॉ. गोरक्ष सदाशिव धोत्रे यांची युगांडाचे भारतासाठी ग्लोबल ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
यानिमित्ताने मुंबई मराठी पत्रकार संघात त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी उत्साहात कार्यक्रम पार पडला. यावेळी युगांडा डायस्पोरा केअर ग्लोबल इनिशिएटिव्हचे डायरेक्टर नीरज विश्वकर्मा यांच्या हस्ते डॉ. गोरक्ष धोत्रे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
डॉ. धोत्रे यांनी भारतात तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर माध्यम, चित्रपट आणि कामगार क्षेत्रातील हजारो कर्मचाऱ्यांच्या हक्क, कल्याण आणि न्यायासाठी कार्य केले आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीची आणि मानवतावादी कार्याची दखल घेऊन ही महत्त्वपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
या जबाबदारीअंतर्गत भारतात येणाऱ्या किंवा भारतात वास्तव्यास असलेल्या युगांडन डायस्पोराला आरोग्यसेवा, शिक्षण, व्यवसाय, गुंतवणूक तसेच आवश्यक सामाजिक मदत आणि समन्वय उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. धोत्रे कार्य करणार आहेत.
युगांडाचे राष्ट्राध्यक्षांचे वरिष्ठ सल्लागार व राजदूत-विशेष ॲबे वलुसिंबी यांनी डॉ. धोत्रे यांच्या नियुक्तीबद्दल शुभेच्छा देताना त्यांच्या अनुभवाचे, सामाजिक बांधिलकीचे आणि मानवतावादी कार्याचे कौतुक केले असून, या कार्यासाठी त्यांच्या कार्यालयाकडून संस्थात्मक सहकार्य, मार्गदर्शन व समन्वय देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
या कार्यक्रमाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे कामगार नेते व पिंपरी-चिंचवडचे माजी उपमहापौर केशव घोळवे, ऑल इंडिया सिने वर्कर्स असोसिएशनचे राष्ट्रीय सचिव अनिल शिंदे, पत्रकार समीर चवरकर, शुभम देशमाने, आदित्य आनंद , जगदीश वाणी, हेमंत ताम्हाणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
