मुंबई : स्टेट बँकेचे कबड्डी खेळाडू, प्रशिक्षक व मार्गदर्शक शिवाजी भांदीग्रे यांचे १ मे रोजी सायं. ७-०० च्या सुमारास परेल रुग्णालयात आकस्मित निधन झाले. परेलच्या बी. रघुवीर संघातून खेळणाऱ्या दादांनी महाराष्ट्र हायस्कूल नं. २ शाळेतून कबड्डी खेळण्यास सुरुवात केली. निधना समयी ते ८२ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले व सूना असा परिवार आहे. ते दादा या नावाने कबड्डी वर्तुळात परिचित होते. उजवा कोपरा रक्षक असलेले दादा पायात झेप घेऊन पकड करण्यात माहीर होते. दादा चढाई देखील उत्तम करीत असत. खेळाडूच्या डोक्यावरून उडी मारण्यात ते तरबेज होते. पण खेळाडू पेक्षा ते अधिक रमले प्रशिक्षकाच्या भूमिकेत.

विरोधी संघातील खेळाडूंच्या खेळाचा अभ्यास करून त्याचा उपयोग आपल्या सहकारी खेळाडू कडून संघाच्या विजया करीता करून घेण्यात त्यांना अधिक रस होता. साऊथ कॅनरा स्पोर्टस् क्लब या संघाला पुनर्जीवित करून नावलौकिक मिळवून देण्यात शेखर शेट्टी यांच्या बरोबरीने दादांचा सिंहाचा वाटा होता. कित्येक कबड्डी खेळाडूंना त्यांनी स्टेट बँकेत कबड्डी खेळाडू म्हणून भरती केले. कबड्डी खेळाबद्दल ते खूप आत्मीयतेने बोलत. सद्या ते ओम् कबड्डी प्रबोधिनी या संघटनेच्या माध्यमातून तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम करीत होते. आजच रात्री १-३०च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर भोईवाडा स्मशान भूमीत करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *