महिला गटात चार व व पुरुष गटात चार संघांचा उपांत्य फेरीत प्रवेश

ठाणे : श्री मावळी मंडळ आयोजित ९९ व्या शिवजयंतीउत्सवानिमित्त ७१ व्या राज्यस्थरीय कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या दिवशी  महिला गटात प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन (पुणे), स्वराज्य स्पोर्ट्स क्लब (मुंबई उपनगर), कर्नाळा क्रीडा (रायगड) व शिवशक्ती महिला संघ (मुंबई शहर)या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला. तर पुरुष गटात मिडलाईन कर्जत (ठाणे), विजय काल्हेर (ठाणे), शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) व स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) ह्या संघानी उपांत्य फेरीत प्रवेश केला.

महिला गटातील पहिल्या उप-उपांत्य लढतीत मुंबई उपनगरच्या स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाने धुळ्याच्या शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाचा अटीतटीच्या लढतीत ३३-३१ असा २ गुणांनी पराभव करून  उपांत्य फेरीत प्रवेश केला. सदर सामन्यात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब संघाच्या याशिक पुजारीने उकृष्ट चढाया करीत आपल्या संघाला मध्यन्तराला १९-१० अशी ९ गुणांची आघाडी मिळवून दिली. तिला समृद्धी मोहितेने पक्कडीत सुरेख साथ दिली. मध्यन्तरानंतर   शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब संघाच्या विद्या दोलताडे व ज्योती उफळे यांनी चतुरस्त्र खेळ करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवण्यात यश मिळवले. परंतु शेवटच्या दोन मिनिटात  राज्य स्पोर्ट्स क्लब संघाने अतिशय परिपक्व खेळाचे प्रदर्शन करीत सामना आपल्या बाजूने झुकवला .

महिला गटातील दुसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या लढतीत पुण्याच्या प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने ठाण्याच्या आर एफ नाईक  संघाचा ४९-१८ असा ३१ गुणांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. ह्या सामन्यात  प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघानेसुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करीत मध्यन्तराला २३-८ अशी १५ गुणांची घेतली ती अंकिता पिसाळ व हर्षी शेट्टी यांच्या उत्कुष्ट खेळामुळे.  मध्यन्तरानंतरही   प्रकाश तात्या बालवडकर स्पोर्ट्स फाउंडेशन संघाने सामन्याची पक्कड घट्ट ठेवीत सामना ३१ गुणांनी जिंकला .

महिला गटातील तिसऱ्या उप-उपांत्य फेरीच्या सामन्यात ताकदवर अश्या मुंबई शहरच्या शिवशक्ती महिला संघाने ठाण्याच्या होतकरू मित्र मंडळाचा २८-२० असा ८ गुणांनी पराभव करीत गेल्या अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवीत श्री मावळी मंडळ स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली. ह्या सामन्यात दोन्ही तुल्यबळ संघानी सुरुवातीपासूनच अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन करीत सामन्यात रंगत आणली. मध्यन्तराला शिवशक्ती महिला संघाने प्रतीक्षा तांडेल व समृद्धी भागात यांच्या अष्टपैलू खेळामुळे १४-११ अशी ३ गुणांची नाममात्र आघाडी घेतली.  होतकरू मित्र मंडळाच्या   प्राजक्ता पुजारी व चैताली बोराडे यांनी खोलवर चढाया करीत आपल्या संघाची गुणसंख्या वाढवली. परंतु या दोघी आपल्या संघाचा पराभव टाळू शकल्या नाहीत.

पुरुष गटातील उप-उपांत्य फेरीच्या लढतीत ठाण्याच्या मिडलाईन कर्जत संघाने वाशिंदच्या जय बजरंग क्रीडा मंडळाचा २४-२० असा ४ गुणांनी पराभव करीत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सुरुवातीपासून सामना अतिशय दोलायमान असा झाला व गुणसंख्येचे पारडे दोन्ही संघाकडे फिरत होते. मिडलाईन कर्जत संघाच्या पवन अडेच्या  उत्कुष्ट चढाया, वैभव पाटील व वैभव मोरे ह्यांच्या सुंदर पक्कडीमुळेमध्यंतराला मिडलाईन कर्जत संघाने  १२-१० अशी २ गुणांची नाममात्र आघाडी घेतली.  मध्यन्तरानंतर दोन्ही संघानी अतिशय सावध खेळ करीत आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न करीत होते. जय बजरंग क्रीडा मंडळाच्या दर्शन पवार व आशिष पाटील यांनी आपल्या संघाला आघाडी मिळवून देण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. परंतु आपल्या संघाचा पराभव टाळू शकले नाहीत.

उत्कुष्ट चढाईपट्टू (पुरुष) : आर्यवर्धन नवले (ओवळी क्रीडा मंडळ,मुंबई उपनगर), उत्कुष्ट पक्कड (पुरुष)  : वैभव मोरे (मिडलाईन कर्जत, ठाणे), उत्कुष्ट चढाईपट्टू (महिला)  : विद्या दोलताडे (शिवशक्ती स्पोर्ट्स क्लब, धुळे), उत्कुष्ट पक्कड (महिला )  : समृद्धी मोहिते (स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, मुंबई उपनगर)

शिव शंकर क्रीडा मंडळ (ठाणे) X  बंड्या मारुती सेवा मंडळ (मुंबई शहर)  ४१ X २७

स्वस्तिक क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) X ओवळी क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर)  ३७ X२२

विजय काल्हेर (ठाणे)  X  श्री विठ्ठल क्रीडा मंडळ (ठाणे) ४४ X ३९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *