पहिल्यांदाच स्मार्ट व्होटर स्लिप उपक्रम

मुंबई : देशभरात लोकसभा निवडणुकीचा उत्सव सुरू आहे. यात मतदान करण्यासाठी जाताना मतदारांना पूर्वी मतदार यादीत नाव शोधण्यासाठी खूप वेळ जात होता; परंतु आता मुंबईकरांना मतदार यादीत नावाची शोधाशोध करावी लागणार नाही. कारण यंदाच्या निवडणुकीत क्यूआर कोड स्कॅन करून माहिती मिळवता येणार आहे. मुंबईत महत्त्वाच्या ठिकाणी क्यूआर कोड लागणार आहेत, अशी माहिती मुंबई शहराचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

मुंबईत पहिल्यांदा या निवडणुकीत डिजिटल उपक्रम राबविला जाणार आहे. यासाठी स्मार्ट व्होटर स्लिप तयार करण्यात आली आहे. मुंबई शहरात विविध सार्वजनिक ठिकाणी बारकोड लावण्यात आले आहेत. यामुळे मतदारांना त्यांच्या स्मार्टफोनवर तो कोड स्कॅन केल्यानंतर मतदाराचे नाव, मतदान केंद्राचा तपशील (पत्ता आणि बूथ क्रमांकासह) आणि निवडणुकीची तारीख आणि वेळ यांसारखा तपशील मिळणार आहे. यापूर्वी मतदान केंद्राबाहेर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते मतदार यादीत नाव शोधून देण्यास मदत करत असत.

एकाच वेळी अधिक प्रमाणात मतदार तेथे आल्यास त्याचा वेळ वाया जात होता. तसेच काही जणांना तर वेळेत मतदान केंद्र न मिळाल्याने ते मतदानापासून वंचित राहत होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत डिजिटल व्होटर स्लिप हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यासाठी सर्वात प्रथम मोबाईलवर डिजिटल व्होटर स्लिप डाऊनलोड केरावी लागणार आहे. या स्लिपच्या मदतीने मतदान प्रक्रियेत वाया जाणारा वेळ कमी होण्यास मदत होणार आहे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *