अनिल ठाणेकर
ठाणे : बोगस बियाणे, खते व औषधे विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी दिला आहे.
ठाणे जिल्ह्यातील सन २०२४ मधील खरीप हंगाम पूर्व आढावा सभा जिल्हा परिषदेच्या सभागृहात दि. ७ मे रोजी पार पडली. जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी खते व बियाणे विक्रेत्यांनी कायदेशीर तरतुदींना अधिन राहून व्यवसाय करावा असे स्पष्ट केले. बोगस बियाणे, खते व औषधे विक्री करताना कोणी आढळल्यास त्यांच्याविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. क्षेत्रिय कर्मचाऱ्याच्या मार्फत रँडमली शेतकऱ्यांनी खरेदी केलेल्या खतांचे तपासणी करुन माहिती घ्यावी व पावत्यांना न देता विक्री करणाऱ्या विक्रेते व व्यक्तीविरुध्द सदरील खते बोगस आहेत असे समजून पोलीस कारवाई करणेत येईल. सर्व विक्री केंद्रांची हंगामपूर्व १०० % तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी सर्व क्षेत्रिय अधिकाऱ्यांना दिल्या. खरीप २०२४ हंगामात खताची टंचाई भासणार नाही व शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक खते रास्त दरात मिळतील या संदर्भात सर्वतोपरी काळजी घेण्याबाबत सर्व उपस्थितांना सांगितले. खरीप हंगाम सुरळीत जावा याकरिता सर्व यंत्रणांनी एकत्रित काम करावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे यांनी केले.
ठाणे जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी ठाणे जिल्ह्यासाठी १० हजार मेट्रिक.टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर झाल्याचे सांगितले. रासायनिक खतांचे शेतकऱ्यांना विक्री करतांना पॉस मशिनद्वारेच करावी. खत वाटप होत असताना शेतकऱ्यांना लिंकिंगच्या समस्येला तोंड देण्याच्या तक्रारी प्राप्त होतात, त्याकरिता अशा प्रकारच्या तक्रारीची गंभीर दखल घेण्यात येईल व खताबरोबर इतर अनावश्यक निविष्ठा शेतकऱ्यांना सक्तीने विकल्या जाणार नाहीत याबद्दल सर्व वितरकांना सक्त सूचना दिल्या. अन्यथा विक्रेत्यांविरूध्द कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला. जिल्ह्यामध्ये नॅनो युरिया व नॅनो डिएपी प्रभावीपणे वापराचे प्रोत्साहन देण्यासाठी विस्तार योजनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे व त्याचा वापर वाढविण्याकरिता भर देण्यात यावा अशा सूचना सर्व क्षेत्रिय अधिकारी व उपस्थितांना दिल्या. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दिपक कुटे, कृषि विकास अधिकारी रामेश्वर पाचे, उपविभागिय कृषि अधिकारी सुधीर नईनवाड, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी रूपाली काळे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, मुरबाड या तालुक्यांचे तालुका कृषि अधिकारी, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक सचिन फुले, बाळासाहेब माने, कृषि अधिकारी, जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालय, ठाणे, पंचायत समिती कडील सर्व कृषि अधिकारी, खते- बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी व जिल्हयातुन आलेले सर्व खते व बियाण्यांचे घाऊक विक्रेते उपस्थित होते. या सभेत IFFCO चे प्रतिनिधी निमिष पवार यांनी नॅनो युरीया व नॅनो डीएपी च्या वापराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नॅनो युरीयामुळे पिकांच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा नकारात्मक परिणाम होत नसल्याचे व उत्पादकतेमध्ये वाढ व खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वाढ होते. त्याचप्रमाणे पिकांच्या पौष्टीकतेमध्ये व गुणवत्तेमध्ये फरक पडतो. जमीन, हवा व पाणी यांची गुणवत्ता सुधारते. अशा प्रकारचे फायदे नॅनो युरीया व नॅनो डीएपीच्या वापरामुळे होतात अशी सविस्तर माहिती सभेत देण्यात आली.
