कल्याण : कल्याणमधील अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या वतीने कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे. कल्याण येथे आयोजित मेळाव्यामध्ये हा पाठिंबा जाहीर करण्यात आला. याबद्दल खासदार शिंदे यांनी क्षत्रिय समाजाचे आभार व्यक्त केले आहेत.
कल्याण शहर आणि आसपासच्या परिसरात उत्तर भारतीय क्षत्रिय समाज मोठ्या संख्येने वास्तव्याला आहे. या समाजासाठी कल्याणमध्ये हिंदी भाषी भवनाची निर्मिती केली जात असून त्याचे काम सध्या प्रगतीपथावर असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी दिली. या भावनात उत्तर भारताच्या संस्कृतीचे दर्शन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मागील १० वर्षात आपणा सर्वांच्या पाठबळाने कल्याण लोकसभेत रस्ते, उड्डाणपूल, रेल्वेसंबंधी कामे, आरोग्य सेवांचे बळकटीकरण यासह अनेक विकासकामे केली असून आता तर कल्याण डोंबिवलीत मेट्रोचे काम देखील सुरू झाल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. भविष्यात कल्याण लोकसभेचा चेहरामोहरा बदलणार असून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प पूर्ण झाल्यावर नागरिकांना मोठ्या प्रमाणात सुविधा मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पाठबळाने कल्याण लोकसभेची ही विकासाची घोडदौड सुरू असून त्यामुळे येत्या २० मे रोजी धनुष्यबाणासमोरील बटन दाबून महायुतीला मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी केले. याप्रसंगी भाजपाचे माजी नगरसेवक कमलेश राय, शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, युवासेनेचे विनीत पांडे, उपनेत्या विजया पोटे यांच्यासह संदीप सिंह, सुनील सिंह, पी.पी. सिंह, बी.पी. सिंग, राजेंद्र सिंह, कमलेश सिंह, राणाप्रताप सिंह, सुभाष सिंह, ए.जी. सिंह आणि उत्तर भारतीय क्षत्रिय समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
