जितेंद्र आव्हाड यांची संबंधितांवर कारवाईची मागणी

अनिल ठाणेकर

ठाणे : कल्याण लोकसभा अंतर्गत कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रातील मुंब्र्यातील बाबाजी पाटील शाळेत अतिशय संथगतीने मतदान सुरु असल्याचे दिसून आले. यामुळे एकाच जागेवर दोन दोन तास रांगेत मतदार उभे असलेले आढळून आले. तर अनेक ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याच्या घटनाही घडल्याचे मतदारांनी सांगितले. निवडणूक आयोगाच्या या कार्यपद्धतीवर मतदारांनी व स्थानिक आमदार डाॅ जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली.

कल्याण लोकसभा मतदार संघाअंतर्गत  मुंब्रा – कळवा विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २४३ या मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट (VVPAT)  मशीन बंद पडलेल्या आहेत, अशा स्वरुपाच्या सकाळी बातम्या प्रसारित झाल्या होत्या. या बाबींची दखल घेवून अतिरिक्त सहायक निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जावून खातरजमा केली असता व्हीव्हीपॅट (VVPAT) बंद पडल्याची बाब आढळून आली  नाही. सदर मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे निदर्शनास आले असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्यक्षात व्हीव्हीपॅट मशीन बंद पडल्याची कोणतीही घटना घडलेली नाही. तसेच इतर मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या, परंतु मतदान सुरळीत सुरू होते. त्या ठिकाणी देखील त्यांनी भेट दिली असून सदरच्या रांगा आटोक्यात आणल्या असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत सुरू  होते. सर्व झोनल अधिकारी व केंद्राध्यक्षांना मतदानाचा वेग वाढविण्याच्या सुचना दिल्या असून १४९ मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान व्यवस्थितरित्या सुरू असल्याचे अतिरिक्त सहायक  निवडणूक अधिकारी संदीप थोरात यांनी नमूद  केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *