ठाणे : जिल्हा सामान्य रुग्णालय गरीब आणि गंभीर आजार असणाऱ्या रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. महागड्या आणि अवघड शस्त्रक्रिया यशस्वी करून या रुग्णालयातील डॉक्टर मोलाची कामगिरी बजावत आहेत. केवळ जिल्हा आणि महाराष्ट्र राज्यातीलच नव्हे; तर इतर राज्यातील गरजू रुग्णांनादेखील हे रुग्णालय आधार देत आहे. गुजरातमधील अशाच एका गरजू रुग्णावर मोठी शस्त्रक्रिया करून येथील डॉक्टरांनी त्याचा जीव वाचवला आहे. या रुग्णाच्या यकृतावर आठ फोड आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात पू तयार झाला होता.
महाराष्ट्रातील काही राजकीय नेते गुजरात मॉडेलचे कौतुक करत असतात; मात्र याच राज्यातून एका रुग्णाने गंभीर आजारावर योग्य उपचार व्हावेत, यासाठी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचा आधार घेतला. गुजरातमधील सुरत शहरात वाहन चालवण्याचे काम करणाऱ्या या रुग्णावर तेथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते; मात्र तेथे त्याच्यावर योग्य उपचार होत नव्हते. त्याच्या पोटात दुखत असल्याने त्याला तेथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शिवाय रुग्णाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्याला तेथील खर्चदेखील परवडणारा नव्हता. त्यामुळे शांताराम चव्हाण (३०) नामक रुग्णाला या आजारावर ठाणे जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात चांगले उपचार होतात, याची माहिती मिळताच त्याने ठाणे या रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला. जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार अणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णाच्या सर्व तपासण्या केल्या असता त्याच्या यकृतावर आठ फोड झाल्याचे निदान झाले. शिवाय या फोडांमध्ये पू देखील झाला होता. ते फोड आतच फुटले तर रुग्णाच्या जीविताला मोठा धोका होता. त्याच्या छातीतही पाणी झाले होते. तज्ज्ञ डॉक्टरांनी सुरुवातीला त्याच्या छातीमधील पाणी काढून नंतर मोठ्या कौशल्याने अवघड शस्त्रक्रिया केली. तसेच त्याच्या यकृतावरील आठही फोड काढून टाकले. शस्त्रक्रियेनंतर त्याची योग्य काळजी घेऊन पंधरा दिवसांच्या उपचारानंतर त्याला घरी सोडून देण्यात आले, अशी माहिती डॉ. निशिकांत रोकडे यांनी दिली. रुग्णावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय पथकात वरिष्ठ सर्जन डॉ. निशिकांत रोकडे, डॉ. विश्वास वासनिक, डॉ. श्रीजित शिंदे, डॉ. प्रतीक बिश्वास आदी होते.
