मुंबई : नाल्यांमधून गाळ काढण्याची कामे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे पूर्ण करावीत. रेल्वे, मुंबई महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण यांसह विविध विभागांशी योग्य समन्वय साधून ५ जूनपर्यंत नाल्यातील गाळ काढण्याची कामे पूर्ण करा, आवश्यक तेथे अतिरिक्त यंत्रणा, मनुष्यबळ नेमून कामांना वेग द्यावा, असे स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले. तसेच उपायुक्त, सहायक आयुक्तांनी आपल्या विभागात दररोज सकाळ, सायंकाळी विभागात नाल्यातील गाळ काढण्याची पाहणी करावी. पाणी साचण्याच्या ठिकाणांवर लक्ष केंद्रित करून पाण्याचा जलद गतीने निचरा होण्याकामी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.
यंदाच्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांची आढावा बैठक पालिका आयुक्त गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिका मुख्यालयात झाली. अतिरिक्त पालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, डॉ. अमित सैनी, अभिजीत बांगर, डॉ. सुधाकर शिंदे, सहआयुक्त चंद्रशेखर चोरे आदी अधिकारी बैठकीस उपस्थित होते. शहर, पूर्व उपनगरे आणि पश्चिम उपनगरे या तीनही विभागांमध्ये नाल्यातून गाळ उपशाची कामे जलद गतीने करण्यात येत आहेत. नाल्यांमधून उद्दिष्टाएवढे किंवा त्याहूनही अधिक गाळ काढण्याचे काम ५ जून अखेरपर्यंत पूर्ण करावे. या मुदतीत ही कामे पूर्ण होतील, त्या दृष्टीने नियोजन करून संपूर्ण यंत्रणेने कार्यवाहीला वेग द्यावा, अशा सूचना आयुक्त गगराणी यांनी दिल्या.
नाल्यातील गाळ काढण्याची कामे योग्यरीत्या सुरू आहेत, हे पाहण्यासाठी पालिकेच्या उपायुक्त, सहायक आयुक्तांनी नाल्यांच्या ठिकाणी भेट द्यावी, असे स्पष्ट करतानाच आयुक्त म्हणाले की, नाल्यालगतच्या रहिवाशांकडून नाल्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याच्या तक्रारी असल्या तरीदेखील तरंगत्या कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावावी. नाले तुंबता कामा नयेत, याची दक्षता घ्यावी, रुंद नाल्याच्या ठिकाणी ‘ट्रॅश बूम’चा वापर करावा. स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधींशी संवाद साधून त्यांचा सहयोग घ्यावा, असेही गगराणी यांनी नमूद केले.
रेल्वे हद्दीतील नाले साफ करा
रेल्वे प्रशासनासमवेत समन्वय साधून रेल्वे हद्दीतील व त्यालगतच्या वेगवेगळ्या नाल्यांमधून गाळ काढण्यासह कल्व्हर्ट स्वच्छता कामांची पाहणी करावी. विविध ठिकाणी पावसाळी पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप लावावेत, मुंबई शहरात पाणी साचू नये, त्याचा जलद गतीने निचरा व्हावा, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखाव्यात, असे निर्देश आयुक्त गगराणी यांनी दिले आहेत.
