बापाने दिला होता ड्रायव्हरला दम
बिल्डर अग्रवालचे आंधळंपुत्र प्रेम
दोन निष्पांच्या मृत्यूस जबाबदार
दोन पोलिस अधिकारी निलंबित
पुणे : पुणे कार अपघातकांडमध्ये रोज नवनवे खुलासे समोर येत आहे. पुण्यातील ब्लेक बारमध्ये दारूपार्टी झाल्यानंतर ड्रायव्हर गंगाराम पुजारीने बिल्डर विशाल अग्रवालला फोन केला होता. तुमचा मुलगा दारूच्या नशेत आहे, गाडी चालवू शकत नाही असे त्यांनी फोन करून अग्रवाल यांना सांगितले होते. पण पैशांचा माज असणाऱ्या बिल्डर विशाल अग्रवालने आंधळ्या पुत्रप्रेमापोटी उलट ड्रायव्हरलाच दम देत पॉर्शे कार मुलालाच चालवायला देण्याचा आदेश दिला. त्यानंतर दारुच्या नशेत झिंगणाऱ्या अग्रवालच्या मुलाने कार चालवत बाईकवर असणाऱ्या दोघांना जोरदार धडक देत चिरडून ठार मारले होते.
या अपघातानंतर अजित पवार राष्ट्रवादी गटाचे स्थानिक आमदार सुनिल टिंगरे यांनी पोलिस स्टेशन गाठत प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या भीषण अपघातानंतर या बिल्डर पुत्रांना पोलिसस्टेशनमध्ये पिझ्झा खाऊ घालण्यात आला होता. रक्त तपासणीस दिरंगाई करण्यात आली होती. यासगळयाप्रकरणावरून पोलिसांवरही टिका झाली होती. याची गंभीर दखल पुणे पोलिस आयुक्तांनी घेत दोन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. तपासात दिरंगाई आणि वरिष्ठांना माहिती न दिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
पोलिस निरीक्षक राहुल जगदाळे आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वनाथ तोडकरी अशी या दोघांची नावं आहेत,
निलंबित करण्यात आलेले राहुल जगदाळे आणि विश्वनाथ तोडकरी हे दोन्ही अधिकारी हे येरवडा पोलिस ठाण्यातील असून अपघात झाला त्या रात्री हे दोघे त्या ठिकाणी ड्युटीवर होते. अपघात झाल्यानंतर त्यांनी कंट्रोल रूमशी संपर्क साधला नाही, तसेच नाईट राऊंडवर असलेल्या पोलीस उपायुक्तांनाही याची माहिती दिली नाही. त्यामुळे या दोघांचा हेतू नेमका काय होता, त्यांनी ही माहिती का लपवून ठेवली याचीही चौकशी करण्यात येणार आहे.
विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
पुण्यातल्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या अपघातप्रकरणी बिल्डर विशाल अगरवाल याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या अपघातात विशाल अगरवालच्या अल्पवयीन मुलानं दारूच्या नशेत भरधाव वेगाने गाडी चालवली आणि दोघांना कारखाली चिरडलं.
या घटनेवेळी विशाल अगरवालचा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता. पण ‘गाडी तू चालवत होतास हे पोलिसांना सांग’ असं विशाल अग्रवाल यांनी आपल्याला सांगितलं असल्याचं ड्रायव्हर गंगाराम पुजारीने जबाबात म्हटलं आहे.
अपघात घडला तेव्हा विशाल अग्रवालचा अल्पवयीन मुलगा गाडी चालवत होता, पाठीमागे त्याचा दोन मित्र बसले होते आणि ड्रायव्हर गंगाराम पुजारी शेजारच्या सीटवर बसला होता. ब्लेक बारमधून बाहेर पडल्यावर ड्रायव्हरने मुलाच्या वडिलांना म्हणजे विशाल अग्रवाल यांना मुलगा कार चालवण्याच्या स्थितीत नाही हे सांगितले होते, पण तरीही त्याला गाडी चालवायला दे असं विशाल अग्रवाल यानी म्हटल्याचं त्यांच्या ड्रायव्हरने कबुली जबाबात म्हटलं आहे. कलम 201 अंतर्गत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा आता विशाल अग्रवालवर दाखल करण्यात येणार.
विशाल अगरवालवर आरटीओच्या तक्रारीनंतर कलम 420 च्या अंतर्गत दुसरा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. पोर्शे कारची नोंदणी झालेली नसताना त्याची नोंद झाल्याची खोटी माहिती दिल्याबद्द्ल हा गुन्हा दाखल करण्यात येणार.
पुणे पोलिसांनी अपघाती गाडीचा संपूर्ण मार्ग तपासला आहे. 19 मे रोजी ती गाडी अग्रवाल यांच्या घरातून किती वाजता बाहेर पडली याचा देखील तपास केला. घरातून कोसी, तिथून ब्लॅक आणि तिथून अपघात स्थळापर्यंत संपूर्ण मार्गाचे सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी पूर्ण करण्यात आली आहे. अपघात झालेली महागडी गाडी ही अग्रवाल याच्या कंपनीच्या नावावर आहे. ती गाडी सध्या येरवडा पोलिसांच्या ताब्यात आहे.
