मुंबई, ता. २६ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांचा ४ जूननंतर मुखभंग होणार आहे, अशी बोचरी टीका भाजप नेते व विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
राऊत यांनी ‘सामना’ दैनिकातून भाजप नेत्यांवर भाष्य केले होते, त्यावर दरेकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा योगी आदित्यनाथ यांनी सभेतून गौरव केला होता; मात्र मोदी विरुद्ध योगी असे चित्र राऊतांनी उभे करू नये. राऊत यांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, कोणतीही वक्तव्ये करून प्रसिद्धीत राहण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न राऊत करत आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. नितीन गडकरी यांच्याबाबतीतले वक्तव्य म्हणजे राऊत यांचा दुटप्पीपणा आहे. त्यामुळे त्यांनी टीका करताना नेमके काय बोलायचे हे निश्चित करून घ्यावे, असा सल्लाही दरेकरांनी त्यांना दिला आहे.
