भिवंडी : ठाणे-घोडबंदर रस्ता बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक भिवंडी-नाशिक महामार्गाद्वारे चिंचोटीकडे वळविण्यात आली आहे. यामुळे ठाणे-भिवंडी महामार्गासह चिंचोटी-अंजूरफाटा मार्गावर मागील तीन दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या मार्गावर शनिवारी (ता. २५) सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्याचप्रमाणे रविवारीदेखील (ता. २६) वाहतूक कोंडी झाली होती.
महामार्गावर वाहतूक कोंडी होत असल्याने छोट्या वाहनचालकांनी शहरातील अरुंद रस्त्यावरून आपला मार्ग वळवला. परिणामी शहरात देखील मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. मानकोली, वसई रोड, ठाणे, पडघा, भिवंडी अशा अनेक मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक आणि वाहनचालकांना या कोंडीचा प्रचंड त्रास सहन करावा लागला. मुंबईहून अहमदाबाद-गुजरातला जाण्यासाठी जड व अवजड वाहने घोडबंदर मार्गाचा अवलंब करतात; परंतु ठाणे-घोडबंदर मार्ग बंद केल्याने ही सर्व वाहने मुंबई-नाशिक महामार्गावर वळविण्यात आली.
सध्या या मार्गावर रस्तारुंदीकरणाचे काम सुरू आहे. अशा स्थितीत या जादा वाहनांची भर पडल्याने या मार्गावर सकाळपासून वाहनांचा वेग कमी होऊन कोंडी झाली होती. तसेच ही वाहने वसईमार्गे वळविण्यासाठी माणकोली-अंजूरफाटा-चिंचोटी या महामार्गावर पाठविण्यात आली; परंतु चिंचोटी मार्गावरदेखील अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे असल्याने वाहनांचा वेग कमी होऊन सुमारे पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रंग लागल्या होत्या. भिवंडीत सध्या जड-अवजड वाहनांना बंदी आहे. असे असताना या दरम्यान काही वहानांनी शहरात प्रवेश घेतल्याने शहरातील वाहतूक विस्कळित झाली. रस्ते वाहतूक प्रशासनाने कोणताही रस्ता बंद करताना पर्यायी रस्त्यांची स्थिती पाहणे आवश्यक आहे, तसेच त्या रस्त्यामध्ये दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया अनेक चालकांनी दिली.
