खर्डी : शहापूर नगरपंचायत हद्दीतील संत ज्ञानेश्वरनगर, समर्थनगर व सरकारी गोडाऊन परिसरात कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. तसेच सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याने येथील रहिवाशी गेल्या दोन वर्षांपासून हैराण झाले आहेत. ऐन उन्हाळ्यातही वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत असल्याने येथील स्थानिक रहिवाशांनी शहापूर येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढला. महावितरणचे सहायक अभियंता प्रकाश मालखेडे यांची भेट घेत येथील विजेच्या समस्या पावसाळा सुरू होण्यापूर्वी दूर कराव्यात, यासाठी निवेदन दिले आहे.
समर्थ नगरमधील ट्रान्स्फार्मर (रोहित्र) हा ३२५ केव्हीचा आहे. येथील वाढती लोकसंख्या पाहता येथे ५०० केव्हीचा रोहित्र पाऊस सुरू होण्यापूर्वी बसवावा. तसेच येथील रोहित्राच्या लोखंडी सांगाड्याचे पोल खिळखिळे झाले आहेत. येथे अपघात होण्याची शक्यता असल्याने त्याची दुरुस्ती करावी. तसेच वीज गेल्यावर कार्यालयात संबंधित कर्मचाऱ्यांना संपर्क केला असता प्रतिसाद मिळत नाही, अशा कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, पावसाळ्यापूर्वी यापरिसरातील झाडांच्या फांद्या छाटणे व इतर कामे करून येथील वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. यावेळी विजय देशमुख, मंदार धानके, बाळा निमसे, स्वप्नील शिरसाट, वालचंद वाघचौरे, किरण हिंदुराव, आशिष तावडे व विजय वाघचौरे यांनी महावितरणचे अधिकारी प्रकाश मालखेडे याना निवेदन देऊन समस्याबाबत चर्चा केली. यावर लवकरच उपाययोजना करण्यात येतील, असे प्रकाश मालखेडे यांनी या वेळी सांगितले.
