ठाणे, : ज्युपिटर हॉस्पिटलजवळ ठाणे महापालिकेने बांधलेल्या पार्कींग प्लाझाचे रुग्णालयात रूपांतरण करण्याचा राज्यकर्त्यांचा डाव हाणून पाडण्यात प्रशासनाला यश आले आहे. ठाणे पालिका आयुक्त सौरभ राव यांनी पार्कींग प्लाझाचा वापर वाहनतळासाठीच अबाधित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या तीन महिन्यांत ते कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या दहा मजली पार्कींग प्लाझामध्ये एकावेळी सुमारे १,६०० वाहने उभी करणे शक्य होणार आहे. परिणाम, येथील सर्व्हिस रोडला लागलेले बेकायदा पार्कींगचे ग्रहणही दूर होणार आहे. तसेच वाहतुकीचा अडथळा कमी होण्यास मदत होणार आहे.

कोरोना काळात हजारो ठाणेकरांचा जीव वाचवण्यासाठी वरदान ठरलेले ज्युपिटर रुग्णालयाजवळील पार्कींग प्लाझा गेल्या काही वर्षांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. वाहनतळाची व्यवस्था व्हावी, यासाठी दहा मजली उभारण्यात आलेल्या या पार्कींग प्लाझाचे रूपांतरण रुग्णालयात करण्याच्या हालचाली सुरू होत्या. एका खासगी संस्थेला हे पार्कींग प्लाझा आंदण देऊन रुग्णसेवा चालवण्याचा घाट होता. याला सर्वस्तरातून विरोधही दर्शवण्यात आला. या वादात ही वास्तू गेल्या दोन ते तीन वर्षांपासून धूळखात पडली आहे. तर दुसरीकडे पार्कींगची व्यवस्था नसल्याने त्याच मार्गावरील सेवा रस्त्याचा ताबा बेकायदा वाहनतळांनी घेतला आहे. वास्तविक ठाण्यातून घोडबंदरमार्गे जाताना माजिवडा पोखरण रोड नंबर एक आणि दोन तसेच सर्व्हिस रोडवर पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.

वास्तविक या परिसरातील वर्तकनगर, लोकमान्यनगर, शास्त्रीनगर, शिवाईनगर, गांधीनगर, सुभाषनगर, नळपाडा आणि लक्ष्मी-चिराग नगर या परिसरात मोठ्या प्रमाणात रिक्षाचालक-मालक राहतात. त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या रिक्षा रस्त्याच्या दुतर्फा लावल्याने वाहतुकीला फार मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होतो. तसेच या परिसरात मोठमोठी गृहसंकुले असल्याने त्या ठिकाणी राहणाऱ्या रहिवाश्यांच्या गाड्याही रस्त्याच्या दुतर्फा पार्क केल्या जातात. विवियाना मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या आणि ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटावयास येणाऱ्या नातेवाइकांच्या गाड्याही मोठ्या प्रमाणात सेवा रस्त्यावर पार्क केल्या जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. त्यामुळे धूळखात पडून असलेले पार्कींग प्लाझा सुरू करण्याच्या मागणीला जोर धरू लागला आहे.

रुग्णालयासाठी इमारत अयोग्य

माजिवडा परिसरामध्ये पार्किंग प्लाझाची निर्मिती तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांनी शेठ ग्रुपच्या विकास प्रकल्पाच्या माध्यमातून केली होती; परंतु २०२० मध्ये आलेल्या कोरोना महामारीत या पार्कींग प्लाझाचे रूपांतर तात्पुरत्या कोविड सेंटरमध्ये केले. कोरोना गेल्यानंतरही येथे आरोग्य सामग्री तशीच ठेवली. उलट या वास्तूचा वापर कायमस्वरूपी हॉस्पिटलमध्ये करण्याचा विचार पुढे आला; पण पार्किंग प्लाझाची प्रत्येक मजल्याची उंची ही आठ फुटांपेक्षा कमी असून या जागेची निर्मिती पार्किंग प्लाझाच्या नियमानुसार करण्यात आली आहे. हॉस्पिटलसाठी ही जागा नियमानुसार वापरता येऊ शकत नसल्याची बाबही पुढे आली आहे. कायद्याच्या कक्षेत प्रस्तावित रुग्णालय बसत नसल्याने महापालिकेच्या या चुकीच्या प्रस्तावाला नगरविकास विभाग मान्यता देण्याची शक्यताही मावळली आहे.

रिक्षा, टॅक्सीसाठी स्वतंत्र व्यवस्था

दहा मजल्याच्या या पार्कींग प्लाझामध्ये सुमारे १,६०० वाहने पार्क करता येतील इतकी क्षमता आहे. यात रीक्षा, ओला, टॅक्सीसाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. याशिवाय दुचाकी व खासगी चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. त्यामुळे रीक्षा, टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या चालक- मालकांना मोठा सुरक्षित दिलासा मिळणार आहे. तर सर्व्हिस रोडवरील बेकायदा पार्कींगची समस्याही दूर होण्यास मदत मिळणार आहे.

किरकोळ डागडुजीनंतर सेवेत

पार्कींग प्लाझाची पाहणी काही दिवसांपूर्वी पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केल्याचे समजते. सध्या या येथील सहा मजले पार्कींगसाठी सज्ज आहेत; पण सात ते दहा मजल्यापर्यंत फ्लोरिंगचे काम करण्याची गरज आहे. याशिवाय सीसीटीव्ही यंत्रणा, एण्ट्री व एक्झिट पॉईंट इत्यादी काही किरकोळ; पण महत्त्वाची कामे शिल्लक आहेत. ही कामे तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानंतर पावसाळ्याच्या सुमारास हे पार्कींग प्लाझा सेवेत दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *