सुनिल इंगळे
उल्हासनगर : काही दिवसांपूर्वी घाटकोपर येथे बेकायदेशीर होर्डिंग कोसळल्याने 17 जणांना आपला जीव गमवावा लागला. या गंभीर घटनेनंतर महाराष्ट्रातील बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथे असलेले बेकायदा होर्डिंग हटवण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी उल्हासनगरमध्ये ‘होर्डिंग माफिया’ आणि मनपातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये असलेल्या अर्थपूर्ण संबंधामुळे ‘होर्डिंग माफियां’वर ठोस कारवाई करण्यात आली नाही.
कारवाईचा दिखावा म्हणून मनपाने एक-दोन होर्डिंग्ज काढले असले तरी, शहरात पसरलेल्या बेकायदा होर्डिंगच्या जाळ्यामागील सूत्रधारांच्या विरोधात कारवाई झालेली नाही.
मनपा मुख्यालयाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सर्वाधिक बेकायदा होर्डिंग्ज पंचशील जाहिरात कंपनीचे आहेत. मनपाच्या जाहिरात विभागातील काही कर्मचाऱ्यांनी कंपनीशी भागीदारी करून आपल्या वरिष्ठांना अंधारात ठेवून ‘पंचशील जाहिरात’ कंपनीवर खुलेआमपणे मेहरबानी केली आहे. यामुळे कंपनीचा झपाट्याने विस्तार झाला असल्याची चर्चा आहे.
गतवर्षी पंचशील जाहिरातीला कोणत्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पसंती दिली याची चौकशी करण्यासाठी मनपा आयुक्तांनी ‘फेव्हरेटिझम कमिटी’ स्थापन केली होती, मात्र निराशाजनक बाब म्हणजे समिती स्थापन होऊन तब्बल 8 महिने उलटून गेले तरी अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही अथवा त्या कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली नसल्याची माहिती समोर येत आहे. यासंदर्भात माहिती घेण्यासाठी मनपा आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
महाराष्ट्र राज्याच्या नगरविकास विभागाने ९ मे २०२२ रोजी जाहिराती आणि होर्डिंगशी संबंधित आदेश जारी केला होता ज्यामध्ये होर्डिंगशी संबंधित महत्त्वाचे नियम स्पष्ट केले होते परंतु उल्हासनगर मनपा प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, पंचशीलच्या जाहिरातीला मनपाने सपना गार्डन परिसरात 6 होर्डिंग्ज लावण्यास परवानगी दिली होती, मात्र कंपनीने तेथे 13 होर्डिंग्ज लावल्याने तत्कालीन उपायुक्त अशोक नाईकवाडे यांनी पंचशीलला नोटीस बजावुन 2,67,624 रुपये दंड ठोठावला होता.पंचशील कंपनीचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न कंत्राटदार आणि मनपाच्या काही कर्मचाऱ्यांनी केला गेला. पंचशील जाहिराती कंपनी सोबतच इतर अनेक जाहिरात कंपन्यांची चौकशी सुरू असून त्यात देखील अनेक गैरप्रकार उघडकीस येण्याची शक्यता आहे.
