स्वाती घोसाळकर

मुंबई : लोकसभा निकाल येत्या ४ जून रोजी लागणार आहे, पण त्याआधीच भाजपाप्रणित महायुतीत शा‍ब्दिक चकमकी वाढू लागल्या आहेत. मुंबईतील मतदानाच्या दिवशी गजानन किर्तीकरांनी मुलगा अमोल किर्तीकरच्या विजयाची भविष्यवाणी वर्तवल्याने वाद उफाळाल होता. हा वाद संपत नाही तोच आता भिवंडीचे भाजपा खासदार कपिल पाटील यांनी आपल्याच पक्षाचे आमदार किसन कथोरेंवर गद्दारीचा शिक्का मारत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचा इशारा दिला आहे. लोकसभा निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप महायुतीचे उमेदवार कपिल पाटलांनी केला.

भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये 20 मे रोजी मतदान झालं असून महायुतीचे कपिल पाटील आणि महाविकास आघाडीचे बाळ्यामामा म्हात्रे यांच्यात लढत आहे.

खासदार कपिल पाटील आणि आमदार किसन कथोरेंतील वाद सर्वश्रृत आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी भिवंडी लोकसभेच्या प्रचारादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार किसन कथोरेंची भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीत कथोरे हे कपिल पाटलांना मदत करतील अशी गॅरंटीही घेतली होती. मात्र फडणवीसांनी गॅरंटी घेऊनही कथोरे शब्दाला जागले नाहीत असा आरोप कपिल पाटील यांनी केला आहे. गॅरंटी फेल घालवणाऱ्या माणसाला फडणवीसही माफ करणार नाहीत असं कपिल पाटील म्हणाले.

आमदार किसन कथोरे यांनीही याबाबत आपली भुमिका मांडली आहे. कपिल पाटलांनी आपल्या नावाचा थेट कुठेही उल्लेख केला नसल्यामुळे आपण या संदर्भात बोलणे योग्य नाही. मला जर विरोधात काम करायचे असते तर मी उघड काम केले असते आणि मी जर विरोधात काम केले असते तर त्याचे काय झाले असते ते सर्वांना माहीत आहे.

चार जूनला निकाल कपिल पाटीलांच्या विरोधात गेल्यास भाजपा पक्षांतर्गत वाद उफाळून येईल. तुर्तास किसन कथोरे यांनी सबुरीची भुमिका घेतल्याचे दिसून येतेय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *