अनिल ठाणेकर

ठाणे : ठाण्यातील घोसाळे तलाव हा कासव संरक्षण व संवर्धन तलाव म्हणून सुरक्षित करून, ठाणे महापालिकेने  पर्यावरण, जैवविविधता याबाबत, संपूर्ण भारतातील आगळेवेगळे स्थान निर्माण करण्याची संधी घालवू नये व ठाण्यातील नैसर्गिक जैवविविधतेची साखळी अबाधित रहाण्यास प्रयत्नपूर्वक काम करावे, अशी मागणी धर्मराज्य पक्षाचे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, ठाणे महापालिका आयुक्त सौरव राव यांना केली आहे.

केंद्र शासन पुरस्कृत अमृत-२ अभियानांतर्गत, ठाणे शहरातील घोसाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम मुदत संपली तरी चालू आहे. हा तलाव ऐतिहासिक असून, ठाणे गॅझेटमधे या तलावाचा उल्लेख असून, ८२५ फूट लांब आणि ४९५ फूट रुंद असलेल्या या तलावाची  जास्तीतजास्त खोली १६ फूट आहे. या तलावात  वर्षभर पाणी असते व सिंचनासाठी यातील पाण्याचा उपयोग होत असतो. मात्र, महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने, अनैसर्गिकरित्या घोसाळे तलावाचे सुशोभीकरण केल्यामुळेच, यातील कासवांचा नैसर्गिक अधिवास धोक्यात आला असल्याने, या तलावाला कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी घोषित करण्यात यावे, अशी मागणी ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरव राव यांच्याकडे लेखी पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, ‘धर्मराज्य पक्षा’चे उपाध्यक्ष नितीन देशपांडे यांनी, महापालिका आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, २३ मे हा दिवस, ‘कासव दिन’ म्हणून भारतासह, संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. दुर्दैवाने गेल्या काही वर्षांपासून, मोठ्याप्रमाणावर कासवांची तस्करी होत असल्यामुळे, काही दुर्मिळ प्रजाती धोक्यात आल्या आहेत. निसर्ग आणि जैवविविधतेचे महत्त्व, काळाची गरज आणि पर्यावरण-साखळी अबाधित राहावी म्हणून कासव वाचविणे व संवर्धन करणे महत्त्वाचे असून, भारतीय संविधान ५१-अ (जी) नुसार नैसर्गिक जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करणे शासनास कटिबद्ध रहाणे बंधनकारक असल्याचे त्यांनी आपल्या पत्रात ठामपणे नमूद केले आहे. दरम्यान, कासवांमध्ये नैसर्गिकरीत्या पाणी स्वच्छ व निर्मळ करण्याची क्षमता प्रचंड असून, भविष्यात पाणी स्वच्छ रहाण्यासाठी विजेवर चालणारी उपकरणे लावण्याची गरजही भासणार नाही. घोसाळे तलावात प्रचंड प्रमाणात कासवे असणे याचा, जैवविविधता व पर्यावरणीय संबंध आहे व त्याचे संरक्षण व संवर्धन करणे हे आपले घटनात्मक कर्तव्य असल्याचे, नितीन देशपांडे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. यावेळी आयुक्तांचे लक्ष वेधताना, देशपांडे यांनी पुढे म्हटले आहे की, तलावात केलेल्या पिचिंग कामामुळे एकाच बाजूला कासवे दिसत आहेत, याची गंभीर दखल घ्यावी. सुशोभीकरणाच्या नावाखाली आपण कासवांच्या नैसर्गिक अधिवासावर गदा आणत आहात, हेच यावरून स्पष्ट होत असून, संविधानानुसार ही बाब अजिबात मान्य नसल्याने, याची तत्काळ दखल घेण्यात यावी आणि सुशोभीकरण करताना, कासवांच्या व इतर जलचरांच्या संरक्षण, संवर्धनासाठी ठाणे महानगरपालिका प्रशासनाने नेमकी काय व्यवस्था केली, याची माहिती जाहीर करावी वा तशी केली नसल्यास, तत्काळ तज्ज्ञाकडून सल्ला घेऊन अंमलात आणावी व कासवांची शिकार होऊ नये म्हणून, तत्काळ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे आणि सुरक्षा व्यवस्था लागू करण्यासोबतच, घोसाळे तलाव हा कासव संरक्षण व संवर्धन तलाव म्हणून सुरक्षित करावा असे नितीन देशपांडे यांनी ठामपा आयुक्त सौरभ राव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *