ठाणे : मध्य रेल्वे मार्गावरील दादर रेल्वे स्थानकानंतर ठाणे हे दुसऱ्या क्रमांकाचे गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जाते. या स्थानकाची प्रवाशांची गर्दी सामावून घेण्याचे क्षमता संपल्याने रेल्वे प्रशासनाकडून स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक पाच अणि सहाच्या रुंदीकरणाच्या कामाला गती देण्यात आली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या बाजूने सुमारे पाच ते दहा फूट रुंदी वाढवली जाणार आहे. जूनच्या सुरुवातीला हे रुंदीकरण सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या रुंदीकरणामुळे लोकल आणि मेल एक्सप्रेसच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
ठाणे स्थानकात दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढत आहे. सद्य:स्थितीत येथे सात ते साडेसात लाख प्रवाशांची गर्दी असते. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत ठाणे स्थानकात प्रवाशांची तुडुंब गर्दी झालेली पाहायला मिळते. विशेषतः प्लॅटफॉर्म क्रमांक पाच अणि सहावर तुफान गर्दी असते. लोकल पकडण्यासाठी प्रवासी उभे असतात; मात्र प्लॅटफॉर्मची रुंदी कमी असल्याने प्रवाशांसाठी धोका वाढला आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्मची रुंदी वाढवण्याच्या दृष्टीने रेल्वेकडून हालचालींना वेग आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला प्लॅटफॉर्मचे काम सुरू होणार आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक पाच अणि सहावरून लोकलबरोबर लांबपल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस गाड्या थांबतात. २४ डब्यांची ट्रेन थांबणाऱ्या या प्लॅटफॉर्मची रुंदी कमी आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत पाच अणि सहा प्लॅटफॉर्मवर लोकल गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागते; मात्र आता प्लॅटफॉर्म क्रमांक चार अणि पाचच्या मधोमध मोठी जागा आहे. त्यामुळे प्लॅटफॉर्म क्रमांक पाचच्या बाजूने कमाल रुंदी तीन मीटरने वाढवण्यात येणार आहे.
प्रवाशांची तारांबळ
प्लॅटफॉर्म क्रमांक पाच अणि सहावर २४ डब्यांच्या ट्रेन थांबतात. त्यामुळे अरुंद प्लॅटफॉर्ममुळे प्रवाशांची तारांबळ उडत असते. या प्लॅटफॉर्मवर बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असते. हातात मोठ्या प्रमाणात सामान असते. तसेच वृद्ध आणि लहान मुलेही असतात. त्यांना या रुंदीकरणाचा फायदा होणार आहे.
७२ तासांचा मेगाब्लॉक
प्लॅटफॉर्म रुंदीकरणाच्या कामासाठी साधारणतः ७२ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली. प्लॅटफॉर्म रुंदीकरणासाठी लागणारे साहित्य आणण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे मेगाब्लॉकच्या दिवशी पाच क्रमांकावरून धावणाऱ्या लोकल गाड्या रद्द अथवा धीम्या रुळावर वळवण्यात येण्याची शक्यता आहे.
