नळाद्वारे दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात
मोखाडा : अर्धा मोखाडा तालुका पाणी टंचाई चा सामना करत आहे. तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतची ऐकमेव नळपाणीपुरवठा योजना यशस्वी आहे. मात्र, गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावाने तळ गाठला आहे. तलावात केवळ गाळाचे पाणी शिल्लक आहे. त्यामुळे नागरीकांना गाळ आणि चिखल मिश्रित पाण्याचा नळाद्वारे पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांना दुषित पाणी प्यावे लागते आहे. परिणामी नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मोखाड्यातील आदिवासी गावपाडे, वस्त्या पाणी टंचाई चा सामना करत आहेत. तालुक्यातील टंचाई ग्रस्त गावपाड्यांना शासनाने टॅंकरद्वारे पाणी पुरवठा सुरू केला आहे. तालुक्यातील विहीरी कोरड्या पडल्या आहेत, बोअरवेल आटल्या आहेत. तसेच पाणी साठा आटल्याने, बहुतांश नळपाणीपुरवठा योजना बंद पडल्या आहेत. त्यामुळे येथील नागरीकांची तहान भागवण्यासाठी टॅंकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतो आहे.
दरम्यान, शाश्वत पाणी साठा व योग्य नियोजनामुळे तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा ग्रामपंचायतीची नळपाणीपुरवठा योजना सुरू आहे. मात्र, गावाला पाणी पुरवठा करणारा गावतलावाने, तळ गाठला आहे. तलावात केवळ गाळ आणि चिखल मिश्रित पाणी शिल्लक राहिले आहे. याच पाण्याचा ग्रामस्थांना नळाद्वारे पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांना गाळ मिश्रित दुषित पाणी प्यावे लागते आहे. परिणामी नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून पोटाचे विकार तसेच साथींचे आजार बळावण्याची भिती निर्माण झाली आहे.
विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागते
नळाला दुषित पाणी येत असल्याने, टमटम अथवा पाणी पुरवठा करत असलेल्या, वाहनातील 50 लिटरच्या ड्रमच्या पाण्यासाठी 50 रूपये नागरीकांना मोजावे लागत आहे. तसेच एका 20 लिटर पाण्याच्या जार साठी 40 रूपये देऊन ग्रामस्थांना आपली तहान भागवावी लागत आहे. ज्यांची पाणी विकत घेण्याची ऐपत नाही. त्या गरीब कुटूंबातील महिलांना अर्धा ते एक किलोमीटर अंतरावरच्या विहीरीवरून पायपीट करत पाणी आणावे लागते आहे.
जलजीवन मिशन चे काम रखडले
जलजीवन मिशन योजनेंतर्गत संपूर्ण तालुक्याचे काम ईगल ईन्फ्रा ईडिया या कंत्राटदाराने घेतले आहे. मार्च 2024 पर्यंत काम पुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. मात्र, हे काम अजुनही पुर्ण झालेले नाही. त्यामुळे यावर्षी ही तालुक्याला पाणी टंचाई चा सामना करावा लागतो आहे. मुख्य बाजारपेठ असलेल्या खोडाळा गावाला देखील त्याचाच फटका बसल्याने, येथील नागरीकांना टंचाई ला तोंड देत, दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे.
