स्वाती घोसाळकर
मुंबई : लोकसभा निवडणूकीत गळ्यातगळे घालून युतीधर्म निभावण्याच्या आणाभाका घेणारी महायुती आणि महाविकास आघाडीत विधान परिषद निवडणूकीवरून धुसफूस सुरु झाली आहे. ४ जूनला लोकसभेच्या निवडणूकीचा निकाल लागणार आहे. पण त्यापुर्वीच महायुती आणि महाविकास आघाडीत स्वतंत्र चुली मांडण्यास सुरुवात झाली आहे.
शिवसेनेने मुंबईत पदवीधर मतदार संघातून अनिल परब यांना तर पदवीधर मतदार संघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी दिली आहे. मुंबईच्या या पदवीधर मतदार संघात इंडिया आघाडीला पाठींबा देणाऱ्या विद्यमान आमदार असणाऱ्या कपिल पाटील यांनी स्वता उभे न राहता आता शिक्षक भारती संघातर्फे सुभाष मोरे यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे राज ठाकरे यांनीही कोकण पदवीधर मतदार संघातून अभिजीत पानसे यांना उमेदवारी दिली आहे. तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने चारही जागा लढवण्याचा निर्णय जाहिर केला आहे. कोकण पदवीधर मतदार संघातून सद्या भाजपाचे निरंजन डावखरे आमदार आहेत.
कपिल पाटील यांच्या समाजवादी गणराज्य पक्षाने लोकसभा निवडणूकीत इंडिया आघाडीला पाठींबा दिला होता. आणि पक्षाच्या धारावीतील पहिल्या सभेच्या व्यासपीठावर उध्दव ठाकरेंना आमंत्रित केले होते. तरीही ठाकरेंनी कपिल पाटील यांच्या उमेदवाराविरोधात उमेदवार दिला आहे.
मुंबई शिक्षक मतदारसंघाचा मी गेले 18 वर्षे आमदार आहे, माझा शिक्षक 58 व्या वर्षी निवृत्त होतो, तोच निकष शिक्षक आमदाराला का नको? या भूमिकेतून तीन टर्म झाल्यानंतर मी निवडणूक न लढवण्याचा ठरवलं आहे असे कपिल पाटील यांनी स्पष्ट केले आहे. शिक्षक भारती संघटनेने सुभाष मोरे यांची उमेदवार म्हणून निवड केली आहे आणि आमचा विश्वास आहे की पुढचे आमदार हे सुभाष मोरे असतील. लोकसभेला कोणतीही शर्त न ठेवता आम्ही त्यांना साथ दिली आहे. आघाडीचा एक धर्म असतो, ज्याची सीटिंग सीट असते, त्याला ती मिळते. मागील तीन टर्म आम्ही ही सीट लढत आलेलो आहोत आणि जिंकलेलो आहोत. आम्ही आधी इतर सर्व उमेदवारांना या मतदारसंघांमध्ये हरवलेलं आहे. आता धर्म पाळला की नाही, त्यांनी उमेदवार का दिला हा प्रश्न त्यांना विचारायला हवा, असंही कपिल पाटील यांनी म्हटलं आहे. मुंबई शिक्षक मतदारसंघात जे आम्हाला पाठिंबा देतील, त्यांना आम्ही आता इतर तीन मतदारसंघात पाठिंबा देऊ, अन्यथा संघटना पुढचा विचार करेल, असा इशारा कपिल पाटील यांनी ठाकरे गटाला दिला आहे.
