जालना : बीडमधील जातीवाद थांबवा, जर हा जातीवाद थांबला नाही, तर आपल्यावरील अन्याय दुर करण्याठी आपल्याला सत्तेत जावं लागणार आहे. अन्यथा शांत राहून मराठ्यांवर अन्याय करणाऱ्या जातीच्या उमेदवाराला पाडायचे म्हणजे पाडायचे. माझ्या मराठा बांधवांच्या मागणीसाठी आता आरपारची लढाई सुरु झाली असून येत्या चार जूनपासून मी पुन्हा उपोषणाला बसणार असल्याचे मनोज जरांगे यांना सांगितले.

 विधानसभा जवळ आहेत, जी जात मराठ्यांच्या विरोधात जाईल त्याचा माणूस निवडून येऊ द्यायचा नाही. त्याला सत्तेत जाऊ द्यायचं नाही. कारण तो सत्तेत गेल्यास मराठ्यांवर अन्याय करतो. त्यामुळे जातीवाद थांबवावा असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आंदोलन हा संविधानाने दिलेला हक्क आहे. जातीय तेढ आणि आरक्षणाचं आंदोलन याचा संबंध नाही. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय. आरक्षणाच्या मागणीत मराठा-ओबीसी वाद आणण्याची गरज नव्हती. बीडमध्ये जातीयवाद हा महाराष्ट्रासाठी चांगला संदेश नाही. यावर सुधीर मुनगंटीवार, शंभुराज देसाई यांनी उत्तर द्यायला हवं. जातीवाद कुणी केला? आम्ही कधी जातीवाद केला? मराठ्यांनी जातीवाद कुठे केला, आम्ही कधीही जातीवाद केला नाही आणि करूही देणार नाही. बीड जिल्ह्यातील मराठ्यांनी शांत राहावे. लोकसभा गेली आणि आता विधानसभेला बघू असं त्यांनी म्हटलं आहे.

आम्ही सरकारच्या शब्दापुढे नाही. ४ जूनला उपोषण सुरू करणार आहे. सगेसोयरे अंमलबजावणीसाठी ५ महिने उलटून गेले. मी आरक्षण घेतल्याशिवाय कुणालाही सोडणार नाही. सरकारमध्ये तुम्ही आहात त्यामुळे तुम्हाला बोलावेच लागेल असं म्हणत जरांगे पाटील यांनी उपोषणावर ठाम असल्याचं सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *