मुंबई : देशाच्या १८ व्या लोकसभेत आवाज कुणाचा असणार याचा फैसला आज मंगळवारी ४ जूनला होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात होईल. आधी पोस्टल मतांची मोजणी होईल आणि त्यानंतर ईव्हिएम मशिनची मोजणी होईल. देशातील ५४३ लोकसभेच्या जागांसाठी तब्बल ६२ कोटी लोकांनी केलेल्या मतदानाची आज मोजणी होणार आहे. एनडीएच्या नरेंद्र मोदींची गँरंटी चालते की राहुल गांधीची टका टका टक मदत योजना प्रभावी ठरते याचा फैसला आज होईल. पण त्यासोबतच अवघ्या देशाचे लक्ष असणार आहे ते महाराष्ट्रातील मतमोजणीवर. निवडणूक देशाची असली तरी महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष कुणाचे याचा फैसलाही मतदार राजा आज करणार आहे. त्यामुळे ही मतमोजणी लक्षवेधी ठरणारी आहे.

यंदाच्या या निवडणूकीत भाजपाप्रणिती एनडीए आणि काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीत थेट मुकाबला आहे. यंदाच्या निवडणूकीत मतदारांना आपल्याकडे ओढण्यासाठी मोदींकडून कधी धार्मिक ध्रुवीकरण घडवून आणणारी वक्तव्यं झाली, तर कधी जातींच्या अस्मितांना जागं करण्याचे प्रयत्न झाला. तर विरोधकांनी शेवटपर्यंत ही निवडणूक महागाई आणि बेरोजगारी या दोन मुद्द्यांवर लढविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळच चारशेपारचा नारा देणाऱ्या भाजपाला दहा वर्षांच्या ‘अँटी इन्कंबन्सी’ तोंड द्यावे लागले. तरीही एक्झिट पोलनुसार भाजपा २०१९ च्या ३०३ जागांपेक्षा अधिक जागा जिंकत असल्याचा अंदाच व्यक्त करण्यात आला आहे. एनडीए साडे तीनशे ते चारशे दरम्यान जागां जिंकेल असा अंदाज वर्तवण्याता आला आहे.

या उलट इंडिया आघाडीने हा एक्झिट पोल नसुन मोदी मीडिया पोल असल्याची टीका केली आहे.

दरम्यान राज्यात मतमोजणीची सर्व तयारी झाली असून अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

राज्यातील ४८ मतदार संघातील मतमोजणी केंद्रावर एकूण १४ हजार ५०७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. एकूण २८९ हॉल मध्ये ४३०९ मतमोजणी टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त सर्व मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील मुंबई दक्षिण व मुंबई दक्षिण मध्य या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची मतमोजणी शिवडी येथील वेअर हाऊस, गाडी अड्डा येथे होणार आहे. यासाठी मुंबई शहर जिल्हा निवडणूक प्रशासन सज्ज असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली.

मतमोजणी केंद्रात मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वस्तू आणण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. ईव्हीएम मतमोजणीसाठी विधानसभा क्षेत्रानिहाय प्रत्येकी १४ टेबल ठेवण्यात आले आहे. तर टपाली मतपत्रीकांच्या मोजणीसाठीही १४ टेबल लावण्यात आले आहे. मतमोजणी परिसरात कडक पोलीस बंदोबस्त राहणार आहे. उमेदवारांचे मतमोजणी प्रतिनिधी, मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल व इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर याबाबतची तपासणी करूनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

एक्झिट पोलचा फोलपणा

आजवर इंडिया टूडे – माय एक्सिस सर्व्हे हा अचुकतेच्या जवळ जाणार सर्व्हे मानला जायचा. यंदाच्या सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला ८-१० आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ९-११ जागा दर्शविल्या आहेत. गंमत अशी की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने लढवलेल्या एकुण १५ पैकी १३ जागा या उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेविरोधात आहे. थोडक्यात काय तर शिंदे ८-१० जाग जर जिंकत असतील तर मग ठाकरे कोणत्या ९ ते ११ जागा जिंकणार. एकतर ठाकरे जिंकू शकतात किंवा शिंदे जिंकू शकतात दोघेही ८ ते ९ जागा कशा जिंकू शकतात.

झी वृत्तवाहीनीच्या सर्व्हेमध्ये राजस्थामध्ये एकुण २७ जागा असताना भाजपाला ३३ जागा जिंकताना दाखविण्यात आल्या आहेत. या आकडेवारीतून एकुणच सगळ्या सर्व्हेंचा फोलपणा दिसून येतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *