प्रभादेवी : दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृहात शुक्रवारी रात्री ८ वाजता एकेएस क्रिएशन्स आणि रघुलीला एंटरप्रायझेस आयोजित ‘मेलोडिज ऑफ द मास्टर्स’ या आगळ्यावेगळ्या सांगीतिक मैफलीचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ओ. पी. नय्यर, शंकर जयकिशन यांना मानवंदना देण्यात येणार आहे. सुप्रसिद्ध गायिका केतकी भावे जोशी, सारेगमप लिटील चॅम्प स्वरा जोशी, गायक डॉ. जय आजगावकर, नचिकेत देसाई गाणी सादर करतील. कार्यक्रमाचे आरेखन कमलेश भडकमकर यांनी केले आहे; तर आदित्य बिवलकर, अभिजीत जोशी यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम सादर होत आहे. सागर साठे वाद्यवृंद संयोजन करणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या अॅकॉर्डियन वादनाची झलकसुद्धा रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. झंकार कानडे, दीप वझे, विजू तांबे, किशोर नारखेडे, आर्चिस लेले, नीलेश परब, हनुमंत रावडे, सिद्धार्थ कदम यांचा कार्यक्रमात सहभाग असणार आहे. अधिकाधिक रसिकांनी या सांगीतिक मैफलीत सहभागी व्हावे, असे आवाहन अभिजीत जोशी यांनी केले आहे.
