भारतीय जनता पक्षाच्या पिछेहाटीची कारणमिमांसा.. भाग १
विशेष लेखमालिका…
अखेर १८ वी लोकसभा आता गठीत होणार हे निश्चित झाले आहे. निवडणुकीचे सर्व निकाल जाहीर झाले आहेत. विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांना भेटून आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा सोपवला आहे. त्याच दरम्यान राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला आहे. उद्या दि. ७ जून रोजी रा.लो.आ.च्या सर्व नवनिर्वाचित खासदारांची बैठक होणार असून त्यात मोदींना सांसदीय पक्षाचे नेते म्हणून निवडले जाणार असून लगेचच ते राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापनेचा दावा करतील. ९ जून रोजी नरेंद्र दामोदरदास मोदी पंतप्रधानपदाची शपथ घेणार हे निश्चित झाले आहे.त्यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडी आता तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन करणार, आणि नरेंद्र दामोदरदास मोदी लागोपाठ तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार ही बाब आता कोणीही नाकारू शकणार नाही.
असे असले तरी या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून ओळखला जाणारा भारतीय जनता पक्ष आपली अपेक्षित कामगिरी दाखवू शकला नाही हे देखील स्पष्ट झाले आहे. अर्थात कोणी याला मोदींचा पराभव म्हणेल मात्र मी तसे मानायला तयार नाही. मोदींच्या नेतृत्वात राष्ट्रीय लोकशाही आघाडीने निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला २९४ जागा म्हणजेच स्पष्ट बहुमत मिळाले आहे. हा मुद्दा जर लक्षात घेतला तर हा मोदींचा किंवा रा.लो. आ.चा पराभव निश्चितच नाही. मात्र सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची ही पीछेहाट निश्चित म्हणता येईल. यावेळी मतदारांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पुन्हा एकदा सरकार बनवण्यासाठी कौल दिला आहे. मात्र त्याच वेळी पूर्वीसारखे यश त्यांना दिले नाही. याचाच अर्थ तुम्ही आम्हाला गृहीत धरू नका, आम्ही तुम्हाला संधी देतो आहोत, मात्र तुम्ही चौकटीत राहून काम कराल, तर आम्ही पुढे तुम्हाला संधी देऊ, असा इशारा मतदारांनी भारतीय जनता पक्षाला यावेळी दिला आहे, असे निश्चित म्हणता येईल.
त्यामुळेच मी ही मोदींची हार मानायला तयार नाही. मात्र माझ्या मते ही भारतीय जनता पक्षाची पिछेहाट निश्चित झालेली आहे. १९५२ साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी बांधिलकी असलेल्या काही मंडळींनी एकत्र येत भारतीय जनसंघ या पक्षाची स्थापना केली. हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन हा पक्ष पुढे जात होता. हळूहळू हा पक्ष वाढत होता. १९६७ साली सार्वत्रिक निवडणुका
ंझाल्यानंतर काही राज्यांमध्ये संयुक्त विधायक दलाच्या माध्यमातून या पक्षाने सत्तेत शिरकावही केला होता.
त्यामुळेच हा पक्ष तत्कालीन इंदिरा काँग्रेसच्या हिटलिस्टवर कायम राहिला. १९७५ मध्ये या ज्यावेळी देशात आणीबाणी लागू झाली, त्यावेळी सर्वप्रथम या पक्षाच्या सर्व प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली होती. हे सर्व नेते जवळजवळ १८ महिने तुरुंगातच होते. आणिबाणी शिथिल झाल्यावर देशातील सर्व काँग्रेस विरोधी पक्ष लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात एकत्र आले. त्यात भारतीय जनसंघ ही त्यांच्यासोबत गेला, आणि १९७७ मध्ये गठीत झालेल्या जनता पक्षात या पक्षातील सर्व नेते सहभागी झाले.
१९७७ मध्ये जनता पक्षाला देशाची सत्ता मिळाली. मात्र अंतर्गत भांडणामुळे अवघ्या अडीच वर्षात हे सरकार पायउतार झाले. त्यावेळी जनसंघाच्या जुन्या मंडळींवर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असल्यामुळे दुहेरी सदस्यत्वाचा आरोप केला जात होता. त्याचा परिणाम १९८० मध्ये ही जनसंघाचे सर्व मंडळी जनता पक्ष सोडून वेगळे होण्यात आणि भारतीय जनता पक्ष नावाचा नवा पक्ष स्थापन करण्यात झाला. तेव्हापासून हा पक्ष हळूहळू वाढत गेला, आणि २०१४ मध्ये देशात स्पष्ट बहुमत मिळवणारा पक्ष म्हणून पुढे आला. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत या पक्षाने ५४३ पैकी २८२ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवले. त्यानंतर पाच वर्ष सरकार चालवल्यावर २०१९ मध्ये भाजप पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरा गेला. यावेळी त्यांनी ५४३ पैकी ३०३ जागा मिळवल्या. त्यानंतर या पक्षाच्या प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस वरच चढत होता. त्यामुळे की काय मात्र २०२४ च्या निवडणुकीत आम्ही ३७० हून अधिक जागा मिळवणार आणि आमचे मित्र पक्ष आणि आम्ही मिळून असलेली राष्ट्रीय लोकशाही आघाडी ४०० पार जाणार असा विश्वास भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष व्यक्त करीत होते. त्या तुलनेत यावेळी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला फक्त २९४ जागा मिळाल्या आहेत, आणि भाजपला २३९ जागांवर रोखले गेले आहे. आघाडीला २९४ जागा मिळाल्यामुळे त्यांचे सरकार बनवणार हे नक्की. मात्र त्याच वेळी भाजपची ही अशी पीछेहाट का झाली याचा विचार करणेही गरजेचे आहे. त्यामुळेच प्रस्तुत लेखमालिकेत भाजपच्या या पीछेहाटीच्या सर्वच मुद्द्यांची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न राहणार आहे.
यावेळी मतांच्या आकडेवारीचा दाखला देत भाजपच्या जागा कमी झाल्या तरी त्यांचा जनाधार वाढला असल्याचा दावा काही राजकीय विश्लेषक करतील. मात्र माझ्या मते लोकसभेच्या जागा कमी होणे ही पिछेहाटच म्हणावी लागेल.त्यामुळेच भारतीय जनता पक्षाची नेमकी पिछेहाट कशी झाली हे बघायचे झाले तर आकडे लक्षात घेता गेल्यावेळी या पक्षाने ५४३ पैकी ३०३ जागा मिळाल्या होत्या. यावेळी ही संख्या २३९ वर आली आहे. म्हणजेच ६४ जागा कमी झाल्या आहेत. तसा विचार केल्यास पक्ष नेतृत्वाने यावेळी ३७० जागा मिळवायच्या असा विश्वास व्यक्त केला होता. हा मुद्दा विचारात घेतला तर जवळजवळ १३१ जागांचा त्यांना तोटा झाला आहे. यात स्मृती इराणी सारखे सुमारे दहापेक्षा अधिक मंत्री देखील पराभूत झाले आहेत. ज्या उत्तर प्रदेशात भाजपाचा खरा जोर होता तिथेही समाजवादी पक्षाने भाजपला बाजूला सारत आघाडी घेतली आहे. तिथे भाजपाला फक्त ३२ जागांवर थांबावे लागले आहे, तर महाराष्ट्रातही २३ जागांवरून ११ जागांवर समाधान मानावे लागले आहे. इतरत्रही असेच कमी जास्त फटके त्यांना बसलेले आहेत.
असे असले तरी भारतीय जनता पक्षाने गेल्या दहा वर्षात काहीच केले नाही असे म्हणता येणार नाही. देशातील बहुसंख्य जनतेला हवे असलेले राम मंदिर त्यांनी उभारले आहे. काश्मीरचे ३७० कलम रद्द केले आहे.मुस्लीम महिलांना तिहेरी तलाक पासून मुक्ती दिली आहे.इतरही अनेक चांगली कामे केली आहेत. तरीही त्यांना अशी पीछेहाट स्वीकारावी लागते यावर विचार होणे गरजेचे आहे.
भाजपच्या या पीछेहाटीमागे
सुरुवातीला तर काही परकीय शक्तींचा हात असल्याचे बोलले जाते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत दहा वर्षाच्या काळात देशाची एकूणच परिस्थिती बऱ्यापैकी सुधारली आणि त्यामुळे जागतिक स्तरावर देखील देशाची पत आणि प्रतिष्ठा वाढली असे मानणारा एक वर्ग आहे. आज परदेशातील अनेक शक्तींना भारत असा बलशाली होणे मान्य नाही. त्यामुळेच त्यांनी विरोधकांना हाताशी धरून देशात मोदीविरोधी वातावरण तयार करणे आणि अस्थैर्य निर्माण करणे असे प्रकार केल्याचे बोलले जाते आहे. नुकतीच समाज माध्यमांवर एक ख्यातनाम पत्रकार बोलत असतानाची एक चित्रफीत व्हायरल होत असतांना बघण्यात आली आहे. यात सदर पत्रकाराने ही हाच मुद्दा मांडला आहे. देशातील विरोधी पक्षांना हाताशी धरून या परकीय शक्ती हे काम करत असून त्यासाठी त्यांनी पैसाही पुरवल्याचा आरोप केला आहे.
देशातील विरोधकांनी मोदींवर हुकुमशहा असल्याचा आरोप वेळोवेळी केलेला आहे. मोदींनी सी.बी.आय. इन्कम टॅक्स, एन आय ए , इडी अशा कथित स्वायत्त संस्थांना हाताशी धरून विरोधकांचे खच्चीकरण केल्याचाही आरोप त्यांच्यावर केला जातो आहे. मोदी विरोधी वक्तव्य जरी केले तरी त्या व्यक्तीला कुठेतरी अडकवले जाते आहे, देशातील माध्यमांचे तोंड बंद करून त्यांची गळचेपी केली जात असल्याचाही आरोप केला जात आहे.
ज्यावेळी नरेंद्र मोदींनी इस बार ३७० पार आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे ४०० पार ही घोषणा केली त्यावेळी विरोधकांनी देशभरात मोदी देशाचे संविधान बदलणार असल्याचा दावा करीत गोंधळ माजवून दिला आहे. त्यांनी तशा प्रकारचा नॅरेटिव सेट केला आहे असे म्हटले तरी वावगे ठरू नये. संविधान बदलून मोदी मुस्लिमांच्या सवलती बंद करणार आणि दलितांचे आरक्षण बंद करणार अशी हवा देखील निर्माण करण्यात आली होती.
भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ओळखला जातो या संघटनेचे स्वयंसेवक हे निष्काम कर्मयोगी म्हणून भाजपच्या सर्वच वाटचालीत सक्रिय असतात. आज भाजप जो वाढला तो या सर्व स्वयंसेवकांच्या पाठबळावरच, मात्र गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र मोदी आणि संघश्रेष्ठींचे फाटले आहे अशा चर्चा केल्या जातात. गत दहा वर्षात नरेंद्र मोदींनी एकदाही संघ मुख्यालयाला भेट दिली नाही आणि संघाच्या वरिष्ठांना भेटले नाही अशाही चर्चा आहेत.
आधी नमूद केल्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष हा मुळात संघ स्वयंसेवकांनी एकत्र येऊन उभा केलेला पक्ष, मात्र हा पक्ष जसा जसा सत्तेजवळ जाऊ लागला तसा तसा समाजातील इतर वर्गही या पक्षाशी जुळू लागला. गेल्या काही वर्षात या पक्षात इतर राजकीय पक्षांतून मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले. इतके की हे इनकमिंग म्हणजे पक्ष विस्तार नसून पक्षावर आलेली सूज आहे असे म्हटले जाऊ लागले. विशेषतः महाराष्ट्रापुरते बोलायचे झाल्यास गेल्या अडीच वर्षात सत्ता टिकवण्यासाठी जे दोन पक्ष फोडले गेले त्याचेही बरे वाईट परिणाम भाजपाच्या मतदारांवर झाले असल्याचे बोलले जाते.
भाजप सरकारने असे नवे लोक जोडताना त्यांना पक्षात येताच मोठेपणा दिला गेला .त्यात पक्षाचे जुने कार्यकर्ते कुठेतरी दुखावत गेले. नवीन जे कार्यकर्ते आले ते लगेचच नेते बनले आणि त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या कार्यकर्त्यांनाच महत्त्व दिले. भाजपचे जे जुने कार्यकर्ते होते ते सतरंज्या उचलण्यासाठीच राहिले. पक्षाच्या या पीछेहाटीला अशा कार्यकर्त्यांची नाराजी देखील कुठेतरी कारणीभूत ठरत असल्याची शक्यता बोलली जाते आहे.
याचा अर्थ गेल्या दहा वर्षात भाजपने काहीच चांगले केले नाही असा होत नाही. मात्र विरोधकांनी वाईट गोष्टी तेवढ्या शोधल्या, आणि वाईट नसल्या तरी त्या वाईट बनवल्या आणि तसे नॅरेटिव नेट केले. त्यांना तितक्या सक्षमपणे भाजपकडून उत्तरे कधीच दिली गेली नाही असेही बोलले जाते. दहा वर्षाची चांगली कामे केली त्यांचे योग्य पद्धतीने मार्केटिंग व्हायला हवे होते, ते कधीच झाले नाही असेही सांगितले जाते. अशा विविध कारणांमुळेच भाजपची ही पीछेहाट होते आहे.
मोदी सरकारला देशात दहा वर्षे पूर्ण झाली आहे. हा मुद्दा लक्षात घेत या निवडणुकीत अँटीइन्कमबन्सी हा मुद्दा पुढे येऊ शकतो अशीही चर्चा होती. मात्र या संदर्भात पक्ष नेतृत्वाने काहीच विचार केला नाही असेही सामान्य कार्यकर्त्यांचे म्हणणे असल्याचे कानावर येते आहे.
ही पीछेहाट रोखायची असेल तर वेळीच भाजप नेतृत्वाने सावध होऊन पावले उचलायला हवीत. याच पार्श्वभूमीवर भाजपचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एक अभ्यासक या नात्याने मी भाजपच्या या पीछेहाटीमागची कारणे शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आज ही प्राथमिक पार्श्वभूमी मांडली आहे. दररोज यातल्या काही मुद्द्यांवर मी विस्ताराने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. यातून कुठेही भारतीय जनता पक्षाला बदनाम करणे हा हेतू नसून या विचारमंथनातून काहीतरी चांगले निघावे हाच माझा प्रयत्न राहणार आहे. एकुण परिस्थितीचे वस्तुनिष्ठ मुल्यमापन करण्याचा हा प्रयत्न आहे.
अविनाश पाठक
(लेखक ज्येष्ठ पत्रकार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाचे अभ्यासक आहेत)
