स्वाती घोसाळकर
मुंबई : लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात भाजपासह महायुतीचे पाणीपत झाल्यानंतर आता राष्ट्रीय स्वयंसेवक (आरएसएस) अक्शन मोडवर आले आहे. आरएसएसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महाराष्ट्रातील या अपयशाबाबत चिंतन बैठक झाली. तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीस स्वता देवेंद्र फडणवीस उपस्थित होते अशी खात्रीलायक माहिती आहे.
महाराष्ट्रात नेमके गणित कुठे चुकले याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. आगामी विधानसभेसाठी रणनीती ठरविण्याबाबतही चर्चा झाल्याचे कळते.
लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील २०१९ च्या लोकसभेतील जिंकलेल्या २३ पैकी फक्त ९ जागांवर यंदा भाजपला विजय मिळवता आलाय. महाराष्ट्रातील या अपयशाची जबाबदारी स्वीकारून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दाखवली आहे. सरकारमधून मुक्त होत पक्षकार्यासाठी झोकून देण्याची इच्छा फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.
फडणवीस यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविल्या गृहमंत्रीपदी कोण यावरही चर्चा सुरु आहे. दरम्यान राज्यातील या पराभवानंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत दाखल झाले आहेत. अमित शहा यांची ते भेट घेतील. फडणवीस दिल्लीत दाखल झाल्यामुळे राजकीय चर्चांना मात्र उधाण आले आहे.
केवळ भाजपच नव्हे तर महायुतीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेची कामगिरीही निराशाजनक झाली आहे. २०१९ च्या निवडणूकीत उद्धव ठाकरे सोबत असताना भाजपा २३ आणि शिवसेना १८ अशा एकुण ४१ जागांवर विजयी झाले होते. यंदा त्यांना फक्त १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिंदेच्या शिवसेनाला १५ पैकी ७ जागांवर तर अजित पवारांना चारपैकी एका जागेवर विजय मिळविता आला. त्यामुळेच लोकसभेच्या पराभवानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला पराभूत करु शकेल असा कोणता चेहरा असू शकतो याचाही शोध भाजप हायकमांड घेत असल्याचे सुत्रांनी सांगितले.
