ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेशोत्सव पर्यावरण पूरक असावा यासाठी ठाणे महापालिका प्रयत्नशील आहे. त्याबाबत पर्यावरण क्षेत्रातील संस्था व तज्ज्ञ आणि पारंपरिक मूर्तिकार संघटना यांच्याशी संवाद साधण्यात येत असल्याची माहिती ठाणे महापालिकेचे अतिरीक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिली.
अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांच्या दालनात यासंदर्भात गुरूवारी बैठक झाली. या बैठकीस, स्वंयसेवी संस्थेतर्फे रोहित जोशी, मूर्तिकार संघटनेचे प्रतिनिधी मंगेश पंडित, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, उपमुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत आदी उपस्थित होते. या बैठकीमध्ये पर्यावरणस्नेही गणेशोत्सव २०२४ साजरा करण्यासाठीची पूर्वतयारी आणि नागरीकांचा सहभाग वाढविण्याच्या अनुषंगाने विविध उपक्रमांवर चर्चा झाली. महापालिका क्षेत्रातील शाळांमध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणारे कार्यक्रम आणि शाडू मातीच्या मूर्ती बनवण्यासाठी स्वयंसेवी संस्थांकडून कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आणि सजावटीचे साहित्य यांचे भव्य प्रदर्शन आणि विक्री आयोजित करण्यात येणार आहे. पर्यावरणपूरक गणपती मुर्तीसाठी जनजागृतीकरता, महिती पत्रके, फलक व ध्वनीफित याद्वारे करण्यात येईल. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन ठाणे महापालिकेने केले आहे. पर्यावरण पूरक मूर्ती बनवून, प्लास्टिक आणि इतर हानिकारक साहित्याचा वापर टाळून आपण सर्वांनी मिळून पर्यावरणाचे रक्षण करूया, असेही आवाहन महापालिकेने केले आहे. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी कृपया ठाणे महानगरपालिका मुख्यालय, पर्यावरण विभाग येथे संपर्क साधावा.
