भव्या सोळंकी विजेता
मुंबई : अमृत महोत्सवी गोविंदराव माहिते चषक १९ वर्षाखालील मुलामुलींच्या विनाशुल्क कॅरम स्पर्धेचे विजेतेपद विवा कॉलेज-विरारचा राष्ट्रीय ज्युनियर कॅरमपटू भव्या सोळंकीने पटकाविले. चुरशीच्या अंतिम सामन्यात प्रथमपासून अचूक फटकेबाजीसह आघाडी घेत भव्याने त्याचाच कॉलेज सहकारी जोनाथन बोनालचा ८-२ असा पराभव केला. परिणामी मुंबई उपनगरचा सबज्युनियर विजेता पार्ले टिळक हायस्कूलचा सार्थक केरकर व राष्ट्रीय सबज्युनियर कॅरमपटू डॉ. दासिल्व्हा हायस्कूलचा ध्रुव भालेकर यांना सहज हरवून विजयीदौड करणाऱ्या जोनाथनला अंतिम उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गौरवमूर्ती क्रीडापटू गोविंदराव मोहिते यांच्या हस्ते संपन्न झाला.
आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी-ग्रुप व राष्ट्रीय मिल मजदूर संघ आयोजित परेल येथे झालेल्या उपांत्य फेरीत भव्या सोळंकीने मयुरेश पवारला १४-१० असे तर जोनाथन बोनालने सार्थक केरकरला १४-२ असे नमविले. उपांत्यपूर्व उपविजेतेपदाचे मानकरी कौस्तुभ जागुष्टे, प्रसन्ना गोळे, ध्रुव भालेराव व मिहीर शेख ठरले. उपउपांत्यपूर्व उपविजेतेपद समीर खान, अथर्व म्हात्रे, अमेय जंगम, निधी सावंत, तन्वी परब, पृथ्वी बडेकर, रुची माचीवले, नेहाल उस्मानी यांनी मिळविले. याप्रसंगी छबिलदास हायस्कूलचे माजी प्राचार्य सतीश इनामदार, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण व मीनानाथ धानजी, क्रीडा शिक्षक प्रॉमिस सैतवडेकर व सुनील खोपकर आदी उपस्थित होते. कॅरमपटू चंद्रकांत करंगुटकर, प्रशिक्षक सचिन शिंदे, क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक व क्रीडापटू ओमकार चव्हाण यांनी पंचाचे कामकाज केले.
