भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांचे प्रतिपादन, ओमकार चव्हाण यांचाही वाढदिवसही साजरा

ठाणे : ठाणे शहरात विविध क्षेत्रात सामाजिक कार्याचा आदर्श तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेकडून प्रस्थापित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांनी नुकतेच येथे केले. या वेळी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेचा वर्धापनदिन व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार चव्हाण यांचा वाढदिवसही साजरा करण्यात आला.

भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण यांच्या तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेचा १९ वा वर्धापनदिन व भाजयुमोचे प्रदेश चिटणीस ओमकार भरत चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात श्री.वाघुले बोलत होते.

कोपरी परिसरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि सामान्यजनांच्या हितासाठी तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेकडून सातत्याने विविध उपक्रम राबविले जातात. कोपरीतील नागरिकांना आरोग्य सुविधा व महापालिकेच्या माध्यमातून दर्जेदार नागरी सुविधांसाठी भरत चव्हाण व ओमकार चव्हाण यांच्याकडून यशस्वी प्रयत्न केले जात आहेत. या उपक्रमांना मिळणारा प्रतिसाद हा उल्लेखनीय आहे. कोपरीवासियांच्या सातत्याने ते पाठीशी राहत आहेत, याबद्दल जिल्हाध्यक्ष वाघुले यांनी कौतुक केले. गेल्या वर्षी ताारामाऊली संस्थेने वाटप केलेल्या शिलाई मशीनच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगार मिळाला, याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. या वेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक भरत चव्हाण, सौ. भावना चव्हाण, भाजयुमोचे चिटणीस ओमकार चव्हाण, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सुरज दळवी, अशोक जग्याशी, सौ. सुचित्रा भोईर आदी उपस्थित होते.

कोपरीवासियांना सेवा पुरविण्यासाठी कायम कटीबद्ध असल्याचे भरत चव्हाण यांनी सांगितले. तर तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेकडून कोपरीबरोबरच शहापूर तालुक्याच्या ग्रामीण भागातही सुविधा पुरविल्या जात आहेत, असे ओमकार चव्हाण यांनी नमूद केले.

या वेळी दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेले गुणवंत विद्यार्थी, कोपरीतील महिला बचत गटांचा सन्मान, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्ड आदींचे वाटप करण्यात आले. तर २४ कॅरट योगा मेडिटेशन क्लास व १२ बंगला संगीत कट्टा यांच्या वतीने वृक्षारोपण व अष्टविनायक चौकात बलराज रेड्डी व मुरली रेड्डी यांच्या वतीने वृद्धांसाठी मोफत छत्री वाटप करण्यात आले. त्याचबरोबर अभिनव कट्टा येथील दिव्यांग कला केंद्रामधील विशेष विद्यार्थ्यांसमवेत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांसाठी भाजयुमोचे कोपरी मंडलातील पदाधिकारी व कार्यकर्ते, महिला मोर्चाच्या पदाधिकारी व सदस्य आदींसह तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या सदस्यांनी मेहनत घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *