युवा सेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे व्यवस्थापनावर कारवाईची मागणी

अनिल ठाणेकर

ठाणे : शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याविरोधात ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनावर कारवाई करावी आणि विद्यार्थ्याना न्याय द्यावा यासाठी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे मागणी करणार असल्याची माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली आहे.

शालेय नवीन वर्षाची सुरूवात विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचा दिवस असतो. पण आज शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी खारखर आळी येथील ठाणे पोलीस शाळेत जवळपास ११२ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला. निराश पालकांनी याबाबत संपर्क करुन माहिती दिली असता त्यांना आणि त्यांच्या मुलांना झालेल्या वेदना ऐकून घेताना खूप वाईट वाटले  ॲडव्हान्स फी भरण्याची शेवटची तारीख १२ जून आहे तरी ठाणे पोलीस शाळेच्या व्यवस्थापनाने, शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतील प्रवेश नाकारण्यात आला. या विद्यार्थ्यांना सकाळी ७.३० वाजल्या पासून शाळेबाहेर उभे करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर या घटनेचा काय प्रभाव पडेल ह्याचा जरा देखील विचार शाळा व्यवस्थापनाने केला नाही. यावेळी पोलीस शाळेला भेट देऊन विद्यार्थी आणि पालकांच्या समस्या जाणून घेतल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका यांना देखील भेटलो. याप्रकरणी लवकरात लवकर विद्यार्थ्यांच्या समस्या सोडविण्यात येतील. विद्यार्थ्यांच्या समस्यांचे पूर्णपणे निराकरण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत आहे. यासंबंधी ठाणे पोलीस शाळा व्यवस्थापनावर कार्यवाहीसाठी पाठपुरावा करत राहणार आहे. विद्यार्थ्यांना पुन्हा आनंदात शाळेत जाताना पाहण्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे ठाणे पोलीस शाळा व्यवस्थापनावर कारवाईची व विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणी केली असल्याचे पूर्वेश सरनाईक यांनी सांगितले आहे.

यावेळी युवासेना ठाणे लोकसभा अध्यक्ष नितिन लांडगे, ठाणे लोकसभा अध्यक्ष विराज निकम, युवासेना ठाणे शहर विधानसभा अध्यक्ष जितेश गुप्ता, स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख निखिल बुडजूडे, नितेश पाटोळे, युवासेना विधानसभा उपाध्यक्ष निखिल वाडेकर, सुशांत मयेकर,अशफाक शेख, ओम पवार, अखिल माळवी, साई ढवळे, अमित यादव, विराज कोकाटे, प्रसाद वाघ, संदीप तिवारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *