अनिल ठाणेकर
ठाणे : पोलीस आणि प्रशासन यांच्या दादागिरीविरुद्ध तलासरी तहसील व पोलीस कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने, माकपचे पाॅलिट ब्युरो सदस्य डॉ. अशोक ढवळे, आमदार विनोद निकोले, जनवादी महिला संघटनेच्या राष्ट्रीय सरचिटणीस मरियम ढवळे, किसन गुजर, किरण गहला, रडका कलांगडा, लक्ष्मण डोंबरे, रामू पागी, सुनीता शिंगडा, नंदू हाडळ, लहानी दौडा, सुरेश भोये, चंद्रकांत घोरखाना यांच्या नेतृत्वाखाली हजारोंचा जबरदस्त धडक मोर्चा काढण्यात आला.
गेले काही महिने तलासरी तालुक्यात पोलीस आणि प्रशासन भाजप-आघाडीच्या राज्य सरकारने आणलेल्या दबावाला बळी पडून सामान्य आदिवासी, महिला यांवर दादागिरी करीत आहे. आपल्या कार्यकर्त्यांना त्रास देणे, त्यांच्या जमिनीवर अतिक्रमण करणे, त्यांच्यावर खोट्या केसेस करणे, त्यांनी केलेल्या तक्रारींची दखल न घेणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. कहर म्हणजे थेट तलासरी पंचायत समितीच्या सभापती सुनीता शिंगडा यांच्याच जमिनीवर अतिक्रमण करण्याची भाजपच्या गुंडांनी हिम्मत केली. याचा समाचार घेणे भागच होते. या त्यांच्या दादागिरीविरुद्ध जबरदस्त मोर्चा काढून त्यांना अद्दल घडवण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटना यांनी घेतला. आठवडाभर जोरदार प्रचार करून बुधवारो, १२ जून २०२४ रोजी हजारो महिला व पुरुषांचा मोर्चा दणकेबाज घोषणा देत तहसील आणि पोलीस स्टेशनच्या आतच घुसला. अखेर सर्व अधिकार्यांनी तातडीने शिष्टमंडळाला बोलावून चर्चा केली. सर्व तक्रारी ताबडतोब सोडवण्याचे आश्वासन दिल्यावरच मोर्चा संपला.
0000
