नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनापासून सुरु करण्यात आलेल्या आंब्याच्या कोयी (Mango Seeds) संकलन उपक्रमात नवी मुंबईकर नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून सोसायट्या, ज्यूस सेंटर, रेस्टॉरंट व हॉटेल्स या ठिकाणाहून 50 हजारपेक्षा अधिक कोयी संकलित करण्यात आलेल्या आहेत. यामध्ये सर्व वयोगटातील नागरिकांचा उत्स्फुर्त सहभाग लाभला असून विशेषत्वाने महिलांनी यामध्ये पुढाकार घेतला आहे.
या शैक्षणिक वर्षाला नुकतीच सुरुवात झाली असून शाळा, महाविद्यालये सुरु होत आहेत. त्यामुळे या मोहीमेत विद्यार्थीही उत्साहाने सहभागी होत असून आपला घरातून आंब्याच्या सुकवलेल्या कोयी आणून त्यासाठी निर्माण केलेल्या विशेष वाहनात दिल्या जात आहेत.
अशाचप्रकारे सेक्टर 14, वाशी येथील अँकरवाला एज्युकेशन ॲकेडमीच्या विद्यार्थांनी संकलित केलेल्या आंब्याच्या कोयी नवी मुंबई महानगरपालिकेच्या कोयी संकलन करणा-या विशेष वाहनात दिलेल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थांच्या मनावर पर्यावरण संवर्धनाचे संस्कार नकळतपणे केले जात आहेत.
रेड एफएम वाहिनीच्या “गुटली रिटर्न्स” या उपक्रमालाही नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत सहकार्य केले जात असून नागरिकांनी आंब्याचा आस्वाद घेऊन झाल्यानंतर उरलेल्या कोयी एका भांड्यात स्वच्छ पाण्याने धुवून ऊन्हात सुकवाव्यात व महानगरपालिकेच्या कोयी संकलनासाठी फिरत असलेल्या विशेष वाहनात द्याव्यात आणि सक्रिय सहभागातून पर्यावरणशील दृष्टीकोन जपावा असे आवहान नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.
००००००
