दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य करात १० टक्के सवलत
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील जे मालमत्ताधारक करदाते ३० जून २०२४ पर्यंत पहिल्या सहामाहीच्या करासोबत दुसऱ्या सहामाहीच्या कराची रक्कम महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहामाहीच्या सामान्य कराच्या रक्कमेत थेट १०% सवलत देण्यात येणार आहे.
सामान्य करातील सवलत योजेनस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी या कर सवलतीस अंतिम मुदतवाढ दिली आहे. तसेच, मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्रोत असल्याने मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करून करदात्यांनी महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले आहे.
ज्या करदात्यांनी ०१ एप्रिल ते १५ जूनपर्यंत पहिल्या सहामाहीच्या कराच्या रक्कमेसह दुसऱ्या सहामाहीचा कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा केला आहे त्यांना दुसऱ्या सहामाहीच्या रक्कमेतील सामान्य करामध्ये १० टक्के सवलत देण्यात आली आहे. या सवलतीला करदात्याचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. तसेच, करदात्यांकडून प्रशासनास होणाऱ्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर, सामान्य करातील १० टक्के सवलत ३० जून २०२४ पर्वत अंतिमतः वाढविण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ करदात्यांनी घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
