काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटेंचा निर्धार
कल्याण : 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील चुकांमधून आपण भरपूर काही शिकलो आहोत. परंतू त्याच चुका आता पुन्हा होणार नाहीत. कल्याण पूर्वेतून विधानसभा निवडणूक लढविण्यास आपण इच्छुक आहोत. पक्षाने पश्चिमेचे तिकीट दिल्यास त्याची देखील तयारी आहे. 2024 च्या विधानसभेची गणिते तयार असून या निवडणूकीत पक्षाने तिकिट दिले नाही तर अपक्ष उभे राहण्याची देखील तयारी असल्याचे मत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केले.
कल्याण डोंबिवलीतील पत्रकारांची प्रमुख संघटना असलेल्या निर्भय जर्नलिस्ट फाउंडेशनच्या वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी डोंबिवलीत करण्यात आले होते. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार बोलून दाखविला.
या कार्यक्रमात सचिन पोटे यांनी आपली राजकीय कारकीर्द, लोकसभा निवडणुकीतील अनुभव, दबावाचे राजकारण, दहा वर्षांत पक्ष सोडून गेलेले नेते, कल्याण डोंबिवलीतील नागरी समस्या, कल्याण जिल्हा काँग्रेसची सद्यस्थिती अशा विविध विषयांवर मनमोकळेपणाने चर्चा केली.
महाराष्ट्रात महविकास आघाडीचेच सरकार पुन्हा येणार…
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात ज्या ज्या जिल्ह्यातून गेली, त्या सर्व ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार जिंकले आहेत. महाराष्ट्रामध्ये आम्ही नंबर एकचा पक्ष असून 100 ते 140 विधानसभा मतदारसंघात आम्हाला चांगला लीड आहे.
मात्र स्वबळावर लढण्याबाबत कुठेही चर्चा झाली नसून तिन्ही पक्षांना एकत्रित लढण्याशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा महविकास आघाडीचेच सरकार येणार असा ठाम विश्वास पोटे यांनी यावेळी व्यक्त केला.
