ठाणे : शिक्षण हे सामाजिक बदलाचे साधन आहे हा विचार बाळगून आंतरराष्‍ट्रीय पर्यावरण दिनाच्‍यानिमित्‍ताने सिग्‍नल शाळेने अभिनव उपक्रम राबविला असून शाळा परिसरात जवळपास तीन हजार रोपे लावून सिग्‍नल शाळेला हरित शाळेचे रूप दिले आहे. वृक्षरोपनासोबतच शाळेतील ओला कच-याचे खत व सुका कचरा पुनर्प्रक्रियेसाठीच्‍या उपक्रमाचा देखील शुभारंभ करण्‍यात आला. लायन्‍स क्‍लब ऑफ मांडवी इस्‍ट, ठाणे महानगरपालिका व समर्थ भारत व्‍यासपीठ यांच्‍या सहकार्याने हरित शाळा उपक्रम राबविण्‍यात आला आहे.
तीन हात नाका परिसर हा ठाण्‍यातील सर्वांधिक वाहनांची वर्दळ असलेला परिसर आहे. वाहनांच्‍या धुराने व धुळीने होणारे प्रदुषण कमी व्‍हावे तसेच पुलाखाली असलेल्‍या शाळेतील मुलांना हवा प्रदुषणाचा त्रास होऊ नये म्‍हणून सिग्‍नल शाळेला हरित शाळेचे स्‍वरूप देण्‍यात आले आहे. शाळा परिसरात मुंबई व ठाणे दिेशेला असलेल्‍या दोन्‍ही रस्‍त्‍यावर ‘व्‍हर्टीकल गार्डन’ची निर्मिती करण्‍यात आली आहे. या व्‍हर्टीकल गार्डनमध्‍ये जवळपास तीन हजार रोपांची लागवड करण्‍यात आली असून यामुळे वाहनांच्‍या आवाजाचा त्रास कमी होऊन हवा प्रदुषण देखील रोखले जाणार आहे. व्‍हर्टीकल गार्डन सोबतच शाळाच्‍या आवारात, वर्गखोल्‍याच्‍या बाहेर मोठया प्रमाणावर कुंडयाची आरास केली आहे. यामुळे प्राण वायुचा पुरवठा देखील वाढणार आहे. हरित शाळेतील रोपांची देखभाल करण्‍यासाठी विदयार्थ्‍यांचे प्रशिक्षण घेण्‍यात आले असून या माध्‍यमातून जीवशास्‍त्राचे प्रत्‍यक्ष ज्ञान मुलांना अनुभवता येणार आहे. रोप लागवड, बोन्‍साय निर्मिती, एका रोपापासून अनेक रोपे तयार करणे, कुंडीतील निगा व देखभाल याचे देखील प्रशिक्षण या उपक्रमाच्‍या माध्‍यमातून विदयार्थ्‍यांना दिले जाणार आहे.
‘माझी वसुंधरा व स्वच्छ भारत’ अभियानाचा भाग म्हणून ठाणे महानगरालिकेच्यावतीने संपूर्ण शहारात  हरित शहर व कचरा मुक्त शहरासाठी अभिनव उपक्रम राबविले जात आहेत. याचाच भाग म्हणून शहरातील शाळा हरित व कचरा मुक्त व्हाव्यात यासाठी आवाहन करण्यात येत आहे. याला प्रतिसाद म्हणून ठाणे महानगरपालिका पुरस्कृत व समर्थ भारत व्यासपीठ संचलित सिग्नल शाळेने हरित व कचरा मुक्त शाळेचा हा उपक्रम राबविला आहे.
रोप लागवडी सोबतच रोपांना कायम उत्‍तम दर्जाचं खत पुरवठा व्‍हाव म्‍हणून शाळेत तयार होण्‍या-या ओल्‍या कच-यापासून खत निर्मिती करण्‍याचा उपक्रम सुरू करण्‍यात आली असून खत निर्मितीचे काम देखील विदयार्थ्‍यांच्‍या सहकार्याने केले जाणार आहे. ओल्‍या कच-यासोबत कच-याचे वर्गीकरण करणे, टाकाऊ पासुन टिकाऊ वस्‍तू बनवणे, सुका कचरा समर्थ भारत व्‍यासपीठाच्‍या प्रकल्‍प पुनर्निमाण या सुका कचरा व्‍यवस्‍थापनाच्‍या प्रकल्‍पास पाठवून शाळा ‘शून्‍य कचरा’ करण्‍यात आली आहे.
सिग्‍नल शाळेने रस्‍त्‍यावरील निर्वासित मुलांच्‍या शिक्षणाला हिरवा सिग्‍नल दिला. लायन्‍स क्‍लबने हा वसा पुढे नेत शाळा हरित करण्‍याचा उपक्रम राबविला याबद्दल क्‍लबच्‍या अध्‍यक्षा लायन धारिका गडा व निधीदात्‍या चंदा कारटेला यांचे लायन्‍स क्‍लबचे वाईस डीजी १ लायन फीरोज कात्रक, माजी डीजी लायन दिनेश शहा यांनी कौतुक केले. यावेळी समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक उल्‍हास कार्ले, लायन शांती सावला सह लायन्‍स क्‍लबचे सदस्‍य उपस्थित होते.  पाटील इंटरप्रायजेसचे संकेत पाटील व प्रवीण जाधव यांचे या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभले.
लायन्‍स क्‍लबचे वाईस डीजी १ लायन फीरोज कात्रक, माजी डीजी लायन दिनेश शहा, लायन्‍स क्‍लब मांडवी इस्‍टच्‍या अध्‍यक्षा लायन धारिका गडा, या उपक्रमासाठी ज्‍यांनी अर्थसहाय्य केले त्‍या लायन चंद्रा कारटेला, समर्थ भारत व्‍यासपीठाचे संचालक उल्‍हास कार्ले यांच्‍या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ करण्‍यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *