भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाचे पोलिसांना निवेदन

 

ठाणे : नौपाडा येथील शाळा- हाविद्यालयांच्या परिसरात थाटलेल्या पानटपऱ्या व सिगारेट विक्रीची दुकाने बंद करण्याची आग्रही मागणी भाजपा नौपाडा मंडल महिला मोर्चाकडून करण्यात आली आहे. महिला मोर्चाच्या मंडल अध्यक्षा वृषाली वाघुले-भोसले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नौपाडा पोलिसांना निवेदन देऊन कठोर कारवाईची मागणी केली.
शालेय मुलांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून भाजपातर्फे नौपाड्यातील अत्यंत गंभीर परिस्थितीकडे पोलिसांचे लक्ष वेधण्यात आले. या शिष्टमंडळात  मंडल सरचिटणीस भक्ती मोहिते, शिल्पा उतेकर, सई करूळकर, कविता यादव, वैशाली विधाटे, भाग्यश्री मुळे, सुनीता यादव, भाजपाचे कार्यकर्ते जगदीश मोहिते आदींचा समावेश होता.
राज्य सरकारच्या नियमानुसार, सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने विक्री कायदा २००३ मधील कलम ६ (ब) नुसार कोणतीही शाळा, महाविद्यालय आणि शिक्षण संस्थेच्या १०० मीटर परिसरामध्ये तंबाखूजन्य पदार्थ विक्री करण्यास बंदी आहे. मात्र, नौपाडा परिसरात सर्रासपणे शाळांपासून १०० मीटरच्या आत बेकायदा पान टपऱ्या उभारल्या जात आहेत. त्यावर अल्पवयीन मुलांना सिगारेट व अंमली पदार्थांची विक्री केली जात असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. या प्रकाराने परिसरातील नागरिक व पालक संतप्त आहेत.
तरी या प्रकरणी आपण गंभीर दखल घेऊन नौपाडा परिसरात शाळा व महाविद्यालयांच्या परिसरात उभारलेल्या पान टपऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. नौपाडा पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक श्री. दिनकर यांनी निवेदनाचा स्वीकार केला. तसेच योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *