महायुतीमध्ये ज्या मतदारसंघात उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्यावर सोडणार नाही – सुनिल तटकरे
शिर्डी : आपल्याला महायुतीत सर्वच ठिकाणी उमेदवारी मिळेल असे नाही मात्र ज्याठिकाणी उमेदवारी मिळणार नाही तिथे माझ्या कार्यकर्त्याला वार्यावर सोडणार नाही असा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी शिर्डी येथे दिला. आज राज्यव्यापी दौऱ्याचा दुसरा दिवस असून सकाळी साईबाबांचे दर्शन घेऊन शिर्डी विधानसभा मतदारसंघाचा आढावा सुनिल तटकरे यांनी घेतला.
येणार्या विधानसभा निवडणुकीत कार्यकर्ता जागरुक असला पाहिजे.आगामी विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जायचे आहे. त्यामुळे विरोधकांच्या अपप्रचाराला आपल्याला उत्तर देण्याचे काम करायचे आहे असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.
अहमदनगर जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. या जिल्हयाने अजितदादांना नेहमीच पाठबळ दिले आहे. हे भरभक्कम पाठबळ कायम मिळण्यासाठी प्रयत्न करायचे आहे. लोकसभा निवडणूकीत आणि आताही अजितदादांना सर्वाधिक टार्गेट करण्यात येत आहे. हे
आपला मित्रपक्ष करत नाहीय तर आपल्यावर सतत लक्ष ठेवून असलेले विरोधातील काहीजण ही बदनामीची मोहिम राबवत आहेत त्यांना सडेतोड उत्तर दयायचे आहे असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना केले.
जनसामान्यांचे पाठबळ कसे मिळेल अशी भूमिका घेतली तर पक्षसंघटना अजून मजबूत होणार आहे.जनसामान्यांचे प्रश्न घेऊन तुम्हाला संघटनेने दिलेल्या पदाचा उपयोग कसा करता येईल यावर काम करा असा सल्लाही सुनिल तटकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. या बैठकीत महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आपले विचार मांडले. शिर्डी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक शिर्डी येथे आज पार पडली.
या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र नागवडे, महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा नागवडे, उत्तर शिर्डी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, प्रदेश सचिव संग्राम कोतेपाटील, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
