अनिल ठाणेकर
ठाणे :पांढऱ्या रेशनकार्डधारकांना महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेअंतर्गत ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली आहे.
मुख्यमंत्री या नात्याने राज्याची धुरा यशस्वीपणे सांभाळीत असून गोर-गरीब जनतेसाठी मुख्यमंत्री म्हणून आरोग्य सेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून गोर-गरीब रूग्णांना ५ लाखापर्यंत मोफत उपचार मिळत आहेत. या आरोग्य सेवेचा फायदा ज्यांचे वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असलेल्या पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना दिला जात आहे. त्यामुळे पांढर्या रेशनकार्डधारक या सुविधेपासून वंचित राहत होते. महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून ज्या पध्दतीने पिवळे व केशरी रेशनकार्डधारकांना जी आरोग्य सुविधा मिळते त्याचप्रमाणे पांढर्या रेशनकार्डधारकांना मिळावी, अशी मागणी जनतेतून होऊ लागली आहे. पांढरे रेशनकार्डधारक असलेले अनेक नागरिक या राज्यामध्ये असून त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्यावर मोफत वैद्यकिय उपचार होऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे जर पांढर्या रेशनकार्डधारकांची शिधापत्रिका आधारकार्ड क्रमांकाशी संलग्न करून महात्मा ज्योतीबा फुले जन आरोग्य सेवेच्या माध्यमातून पांढर्या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सुविधा दिल्यास याचा फायदा राज्यातील गोर-गरीब समाजाला होईल व त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतील. मुख्यमंत्री या नात्याने नागरिकांच्या भल्यासाठी अनेक महत्वाचे धाडसी निर्णय घेतले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील पांढर्या रेशनकार्डधारकांना ५ लाखापर्यंत मोफत आरोग्य सेवा देण्याचा हाही धाडसी निर्णय घ्यावा, अशी विनंती आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे.
०००००
