खासदार नरेश म्हस्के यांच्या प्रयत्नांनी
नवी मुंबई, नवी मुंबई महापालिका, सिडको आणि एमआयडीसी या तिन प्राधिकरणांमध्ये समन्वय राखला जावून मुलभूत नागरी सुविधा तातडीने नवी मुंबईकरांना मिळाव्यात, या उद्देशाने नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी गुरुवारी नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांची भेट घेत एका बैठकीचे आयोजन केले. बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करत तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी दिले. शिवसेना उपनेते विजय नाहटा, नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले आणि नवी मुंबई महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होता.
नवी मुंबई परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला तातडीने गती देण्याचे निर्देश बैठकीच्या प्रारंभीच खासदार नरेश म्हस्के यांनी दिले. नवी मुंबईमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा पुतळा उभारण्यासंदर्भात शिवसेना नवी मुंबई जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी आयुक्तांना बैठकीत निवेदन सादर केले. खासदार नरेश म्हस्के यांनी याविषयी आयुक्तांशी चर्चा करत पुतळा उभारण्याबाबत तातडीने पावले उचलण्याच्या सूचना केल्या. नवी मुंबईमध्ये सिडकोने उभारलेल्या अति अल्प आणि अत्यल्प उत्पन्न गटातील सोसायटीतील रहिवाशांना नागरी सुविधा मिळतांना अडचणी येत असल्याची बाब रहिवाशांनी खासदारांच्या निदर्शनास आणून दिली. या संदर्भात चर्चा करून या सोसायट्यांमध्ये नागरि सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात असे निर्देश खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना दिले. नवी मुंबईतील रहिवासी परिसर आणि शाळा असलेल्या ठिकाणी गतिरोधक नसल्याने कित्येक वेळा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. ही बाब लक्षात घेऊन अशा ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत अशी सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांना केली. नवी मुंबईतील बालवाडी शिक्षकांना नियमित करण्याचा प्रश्न प्रलंबित आहे, या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांनी आयुक्तांशी चर्चा करून पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले.
नवी मुंबई मनपा परिवहन सेवा आणि कर्मचाऱयांच्या वेतनासंदर्भात देखिल आयुक्तांशी चर्चा करून शहरातील नागरिकांना चांगली व दर्जेदार परिवहन सेवा देण्याची सूचना खासदार नरेश म्हस्के यांनी केली. नवी मुंबईत धोकादायक इमारतींना चांगला एफएसआय मिळतो. याचा फायदा घेऊन काही ठिकाणी दलालांच्या सांगण्यावरुन विनाकारण इमारती धोकादायक ठरवल्या जातात आणि नोटीसा दिल्या जात आहेत. यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. तरी महापालिकेने स्वत: सक्षम तांत्रिक सल्लागार नेमून अशा इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे जेणेकरून सर्वसामान्य रहिवाश्यांना दिलासा मिळेल असे खासदार नरेश म्हस्के यांनी यावेळी सांगितले. नवी मुंबई मनपा क्षेत्रातील नागरि सुविधा देण्यासंदर्भात, मैदाने, बगिचा उपलब्ध करून देण्यासाठी सिडकोकडील जागा महापालिकेकडे हस्तांतरित करणे, गटई कामगारांना व्यवसाय परवाने ताबडतोब देणे, पारसिक झील शेवटच्या टोकापासून परिवहन सेवा सुरू करणे, वाशी- नवी मुंबई गणेशकृपा भाजीपाला मंडई व मच्छीमार्केट येथे सोयीसुविधा पुरविणे, निलगिरी गार्डन ते बेलापूर किल्लापर्यंत अंडरपास तयार करणे आणि त्या ठिकाणी ध्वनीनिरोधक यंत्रणा बसविणे, पाणीपुरवठा सुरळीत करणे, नवी मुंबईतील नवीन कंत्राटी ठेकेदार हे कामगार कामावर ठेवताना जुन्या कामगारांना डावलत असून त्यांना न्याय मिळवून द्यावा, ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विरंगुळा केंद्रांमधील साहित्य नादुरुस्त झालेली आहेत, ती दुरुस्त करणे, पुनर्विकास योजनेसाठी एक खिडकी योजना राबविणे, स्थानिक भूमीपुत्रांच्या विद्यार्थ्यांना प्रलंबित शिष्यवृत्ती दोन महिन्यांत मिळवून देणे अशा विविध सामाजिक प्रश्नांवर आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यावेळी शहरप्रमुख विजय माने, उप जिल्हाप्रमुख रामशेठ वाघमारे, अजय सावंत, सरोज दळवी, रोहिदास पाटील, शिवराम पाटील, साईनाथ वाघमारे, संपर्कप्रमुख किशोर पाटकर, सरोज पाटील, नगरसेवक शिवराम पाटील, जगदिश गवते, सुरेश सपकाळ, रामसिंग यादव, प्रशांत पाटील, आंकाश मढवी, संजीव वाडे, युवा सेनेचे चेतन पाटील आदी उपस्थित होते.
00000
