जलजीवन योजनेचा फज्जा
राजीव चंदने
मुरबाड : मुरबाड तालुक्यात जल जीवन मिशनची १८३ योजनांची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना पाण्याची समस्या जाणवू नये यासाठी दोन वर्षांपासून ‘जल जीवन मिशन’ ची कामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र दरवर्षी मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. या वर्षी सुद्धा ४१ गाव पाड्यात टँकरने पाणीपुरवठा केला होता. टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरी तो पुरेसा नसल्याने पाणी टंचाई भासते. तालुक्यातील नागरिकांना रोज पाण्यासाठी वणवण फिरावे लागत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. जलजीवन मिशन मध्ये घरात थेट नळाद्वारे पाणी पुरवठा होईल अशा पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. परंतु अतिशय संथगतीने कामे सुरू आहेत. ३१ मार्च २०२४ रोजी या योजनांची कामे पूर्ण करण्याची मुदत संपली आहे. तरीही जलजीवन मिशनची एकही योजना पूर्ण झाली नसून कामे पूर्ण झाल्याशिवाय ठेकेदारांना अपूर्ण कामांचे बिल देण्यात येऊ नये अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते दिनेश जाधव यांनी संबंधित अधिकारी यांच्याकडे केली आहे.
00000
