Author: bittambatami.com

सी-व्हिजिलवर आचारसंहितेच्या २४५ तक्रारी

मुंबई : लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाच्या तक्रारी नोंदवण्यासाठी आणि ट्रॅक करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने ‘सी विजिल’ हे नवीन ॲप सुरू केले आहे. या ॲपच्या माध्यमातून मुंबई उपनगर जिल्ह्यात १६ मार्च ते २३ एप्रिल या कालावधीत २४५ तक्रारी प्राप्त झाल्या. या सर्व तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. यातील १३५ तक्रारींचे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या मुदतीत निपटारा करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली. आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन व्हावे, निवडणुका शांततेत आणि मुक्त वातावरणात पार पाडण्याचे भारत निवडणूक आयोगासमोरचे मुख्य उद्दिष्ट आहे. आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱ्या अनुचित प्रकारांची तक्रार ‘सी विजिल’ ॲपच्या माध्यमातून नागरिकांना थेट ऑनलाईन करता येते. या ॲपमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तक्रारी स्वीकारणे, या तक्रारीवर अवघ्या १०० मिनिटांत कार्यवाही करणे अपेक्षित असते. या पद्धतीने निवडणूक यंत्रणेने आणि सी- व्हिजिल कक्षाने कार्यवाही करून १३५ तक्रारींचे निवारण केले. शंभर मिनिटांपेक्षा थोड्या जास्त कालावधीत उर्वरित १८३ तक्रारीचा निपटारा करण्यात आला. जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचे उल्लंघन होत असेल तर नागरिकांनी तिथला फोटो काढावा आणि तात्काळ सी व्हिजील ॲपवर अपलोड करावा, असे आवाहन जिल्हा निवडणूक यंत्रणेने केले आहे. मतदारसंघनिहाय तक्रारी अंधेरी पूर्व- १६, अंधेरी पश्चिम- ८, अणुशक्तीनगर- ७, भांडुप पश्चिम- ५, बोरिवली- १३, चांदिवली- २६, चारकोप- १४, चेंबूर- १४, दहिसर- ८, दिंडोशी- ५, घाटकोपर पूर्व- ३, घाटकोपर पश्चिम-२, गोरेगाव-१०, जोगेश्वरी पूर्व-५, कलिना-८, कांदिवली पूर्व-८, कुर्ला-५, मागठाणे-२४, मालाड पश्चिम -११, मानखुर्द शिवाजीनगर-१, मुलुंड- १६, वांद्रे पूर्व- ७, वांद्रे पश्चिम- ८, वर्सोवा- ३, विक्रोळी- १६, विलेपार्ले- ५ अशा एकूण २४५ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या.

घाटकोपरमध्ये फेरीवाल्‍यांना हटवले

पोलिस प्रशासन पालिकेची संयुक्‍त कारवाई मुंबई : मुंबईतील अनेक रस्ते अनधिकृत फेरीवाल्‍यांनी व्यापल्याने नागरिकांना चालणे खूपच कठीण झाले आहे. यासंदर्भात बेकायदा आणि विनापरवाना विक्रेत्यांवर कारवाई करा, असे आदेश उच्च न्यायालयाने महानगरपालिकेला दिले आहेत. त्‍यामुळे पोलिस प्रशासन आणि पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संयुक्‍त कारवाई करीत फेरीवाल्‍यांना हटवले. घाटकोपर पश्चिम श्रद्धानंद रोड आणि हिराचंद देसाई रोडवरील अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई करण्यात आली. पदपथावर बसणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेकडून कारवाई करण्यात येते. वारंवार कारवाई होऊनही फेरीवाले हटत नाहीत. याबाबत नागरिक सातत्याने स्‍थानिक पोलिस, पालिका विभाग कार्यालयात तक्रारी दाखल करतात. घाटकोपरमध्ये फेरीवाल्यांविरोधात नागरिकांनी एकत्र येत कारवाईसंदर्भात मोहीम सुरू केली आहे. रेल्वे प्रवाशांना फेरीवाल्यांची अडचण घाटकोपर रेल्वे प्रवासी आणि मेट्रो स्थानकातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना स्‍थानक परिसरात अनधिकृतरीत्या बसणाऱ्या फेरीवाल्यांचा मनस्ताप सहन करावा लागतो. संध्याकाळच्या वेळेस फेरीवाले रस्ते आणि पदपथ अडवत असल्याने प्रवाशांना रेल्वे स्थानकातून बाहेर पडताना नाकीनऊ येते. मागच्या काही महिन्यांपासून पालिकेने स्‍थानक परिसरात ‘नो हॉकर्स झोन’चे फलक परिसरात लावले आहेत. तरीदेखील फेरीवाले बिनधास्त आपले बस्तान मांडून असतात. त्‍यामुळे फेरीवाल्‍यांविरोधात कडक कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. नागरिकांच्या वारंवार तक्रारी येत आहेत. रेल्‍वे स्‍थानक परिसरात बस्तान मांडून बसलेल्या फेरीवाल्यांवर संयुक्तरीत्या कारवाई करत रस्ते मोकळे केले आहेत. – शरद शेटे, पोलिस उपनिरीक्षक

वाढत्या उन्हाचा पक्ष्यांनाही फटका

वाशी –  दिवसेंदिवस वाढत्‍या उष्णतेचा त्रास अनेक नागरिकांना होत असताना, पक्ष्यांनादेखील त्‍याचा फटका बसत आहे. तापमानात वाढ होत असल्‍याने पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होत असून हवेत उडताना ते गळून कोसळण्याचे प्रकार नवी मुंबईत घडत आहेत. मागील काही दिवसांत नवी मुंबईतील तापमान ४० अंश इतके होते. त्‍यामुळे वाढत्‍या उष्मामुळे याचा अनेक नागरिकांना त्रास झाला होता, तर पक्ष्यांनादेखील या गरमीचा फटका बसत आहे. गेल्‍या काही दिवसांपासून बदलत्या हवामानाचा फटका पक्ष्यांना बसत असल्याचे दिसून येत आहे. पक्ष्यांच्या पोटात पाण्याचे प्रमाण कमी होऊन हवेत उडताना ते गळून कोसळण्याचे प्रकार घडत आहेत. पक्षी उष्ण रक्ताचे असून त्यांच्या शरीराचे तापमान १०४ ते १०५ पिरॅमिड अंश इतके असते. शरीरातील उष्णतेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी पक्षी पंख पसरवून तोंडाने श्वसनक्रिया करतात. त्यामुळे ते उन्हाळ्यात बऱ्याचदा आपली चोच उघडून बसलेले असतात. त्यांचे शरीर अनेक प्रकारच्या पिसांनी आच्छादलेले असले तरी दुपारच्या वेळेत त्यांच्या शरीरातील उष्णतेचे प्रमाण वाढते. अशा वेळी त्यांच्या शरीराची ऊर्जा कमी होते आणि ते गळून पडतात. गेल्‍या काही दिवसांपासून नवी मुंबईत पक्षी गळून पडण्याचे प्रमाण वाढल्‍याचे पक्षीप्रेमी विशाल मोहिते यांनी सांगितले. पशूदया महत्त्वाची पोटातील पाण्याचा अंश कमी झाला की हवेत उडताना पक्षी खाली कोसळतात. रस्त्यात एखादा पक्षी मुर्च्छीत होऊन पडलेला असेल किंवा जखमी असेल तर अशा पक्ष्यांना सावलीच्या ठिकाणी ठेवून शक्य झाल्यास टरबूज वा कलिंगडासारखी फळे खायला द्यावीत. पक्ष्यांना पिण्यासाठी पाणी मिळावे यासाठी बाल्कनी, टेरेस अथवा जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी पाणवठे तयार करावेत, असे आवाहन निसर्गप्रेमी सागर कांबळे यांनी केले आहे.

आचारसंहितेचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करा

रवी कटकधोंड, राजकीय पक्षांना निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी तथा ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी रवी कटकधोंड यांनी केले आहे. लोकसभा निवडणूक प्रक्रिया आणि राजकीय पक्षांनी पाळावयाची आचारसंहिता याबाबत माहिती देण्यासाठी ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक कटकधोंड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी उपजिल्हाधिकारी स्वप्नील कापडणीस, सहायक पोलिस आयुक्त अनिल देशमुख यांच्यासह नोंदणीकृत राष्ट्रीय व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी कटकधोंड म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार निवडणूक प्रक्रिया पार पडावी, यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी सहकार्य करावे. तसेच प्रचारासाठी नियमाप्रमाणे परवानगी घ्यावी. सभा, पदयात्रा, रॅलीबाबत निर्धारित वेळ पाळावी आणि त्यासाठी पोलिसांचीही परवानगी घ्यावी. उमेदवारांनी दैनंदिन खर्च अहवाल सादर करणे अत्यावश्यक असून निवडणूक अर्ज भरण्याअगोदर स्वतंत्र बॅंक खाते उघडावे लागणार असल्याचे कटकधोंड यांनी या वेळी सांगितले. अधिसूचना शुक्रवारी निघणार ३१-मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघासाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी निर्गमित होणार आहे. या मतदारसंघात एकूण १५ लाख २४ हजार ९३९ इतके मतदार असून यामध्ये पुरुष मतदारांची संख्या ८ लाख २७ हजार १७८, महिला मतदार ६ लाख ९७ हजार ७१८ आणि इतर ४३ मतदार आहेत; तर मतदान केंद्र १,५२७ आहेत.

माथेरान प्राथमिक शाळेला टीव्हीसंच व मुलांना शालेय साहित्याचे वाटप

माथेरान : माथेरान मध्ये प्राथमिक शाळेला कैलासवासी जश मिलन गांधी यांच्या स्मरणार्थ तिचे वडील  मिलन गांधी यांनी 43 इंची स्मार्ट टीव्ही व शालेय वस्तू तसेच खाऊचे वाटप करून कै.जश याचा स्मृतिदिन विद्यार्थ्यांबरोबर साजरा केला. कै. जश गांधी याचे 2020 मध्ये अल्पशा आजाराने निधन झाले होते.तरुण वयामध्ये आपला मुलगा जाण्याचे दुःख  मिलन गांधी यांनी सोसले आहे परंतु त्या दुःखाने खचून न जाता त्याच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात याकरता स्मृती दिनाचे औचित्य साधून मिलन गांधी हे दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या मित्रमंडळी सह जाऊन  गरजूंना मदत करीत असतात यावर्षी त्यांनी माथेरान मध्ये प्राथमिक शाळेला प्राधान्य दिले आहे.येथील गरजू विद्यार्थ्यांना आवश्यक असलेला 43 इंची स्मार्ट टीव्ही शाळेला  भेट स्वरूपात दिला तर उपस्थित विद्यार्थ्यांना गरजेचे शालेय साहित्य व खाऊचेही वाटप केले त्याचप्रमाणे शाळेचे मुख्याध्यापक दिलीप अहिरे यांना शाळेसाठी लागणारी कोणतीही मदत असल्यास संपर्क करण्याचा शब्दही दिला येथील विद्यार्थ्यांना पाहून या शाळेसाठी आपणास जे काही करता येईल ते करण्यास आपण तयार आहोत असे त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यावेळी सांगितले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता माथेरानचे नितीन शेळके यांनी विशेष प्रयत्न केले.

संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर कापूरबावडी-कोलशेत-ढोकाळी रोड वाहतुकीसाठी पुन्हा खुला

ठाणे : वाहतुकीला शिस्त लावण्याच्या नावाखाली गेल्या एक वर्षापासून कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्ग प्रशासनाने भिंत घालून बंद केला आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेऊन माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालिका आयुक्त आणि वाहतूक विभागाच्या उपायुक्तांकडे पाठपुरावा केल्यानंतर आज अखेर ही भिंत जेसीबीच्या सहाय्याने हटवून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला केला आहे. हा मार्ग पूर्ववत झाल्याने स्थानिक नागरिकांनी संजय भोईर यांचे आभार मानले आहेत. ठाणे शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तसेच वाहतुकीला शिस्त लागण्यासाठी मागील वर्षी ठाणे शहरातील अनेक रस्त्यांवर बदल केले. कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा उजवीकडील मार्गही वाहतूक विभाग आणि ठाणे मनपा प्रशासनाने बंद केला होता. हा मार्ग बंद झाल्याने कोलशेत, ढोकाळी, मनोरमानगर, मानपाडा, आझादनगर, ब्रह्मांड, लोढा अमारा येथील सुमारे पावणे दोन लाख रहिवाशांची यामुळे फरफट होत होती. हा मार्ग बंद झाल्याने हायलँड अथवा बाळकूम येथील राम मारुती रोडने रहिवाशांना प्रवास करावा लागत होता. परिणामी या रस्त्यांवर देखिल प्रचंड वाहतूक कोंडी होत होती. कापूरबावडी पूलाखालून कोलशेत-ढोकाळी कडे जाणारा हा मार्ग जरी बंद केला असला तरी कापूरबावडीच्या विरुध्द दिशेने या मार्गावर अनेक जण वाहतूक प्रवास करत असल्याने कापूरबावडी येथे वाहतूक कोंडी पूर्वीप्रमाणेच होत होती. तसेच वयोवृध्द नागरिक, महिला आणि शालेय मुलांना यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. तसेच अपघाताचीही भिती होती. स्थानिक लोकप्रतिनिधी या नात्याने माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर, माजी विरोधी पक्षनेते देवाराम भोईर, मा. नगरसेविका उषा संजय भोईर, मा. नगरसेवक भुषण भोईर आणि युवा नेते विकेश भोईर यांनी ठाणे महपालिका आयुक्त, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेही याबाबत चर्चा करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी हायलंड येथील मैदानात शिवसेनेने आयोजित केलेल्या महोत्सवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. तेव्हाही संजय भोईर यांनी या रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. आज अखेर संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर हा रस्ता खुला करण्यात आला.

बुक कल्चरच्या वाचनप्रिय बालकांचा सन्मान 

प्रत्येक महिन्याला ‘बुक कल्चर’मार्फत बालवाचक कट्टा आयोजित करण्यात येईल – संदीप माळवी ठाणे : लहान मुलांच्या माध्यमातून बुक कल्चरने वाचनाची नवीन चळवळ ठाण्यात सुरु केली आहे. सविता राणे यांच्या बुक कल्चर मधील एक लहान मूल वर्षाला १०० पुस्तके वाचत आहे. ही चळवळ ठाण्यापुरती न राहता त्याचा प्रसार होणे आवश्यक आहे. वाचनप्रिय बालकांच्या पाठीवर थाप मारतांनाच मुलांना वाचनासाठी प्रोत्साहन देणाऱ्या पालकांचेही कौतुक करायला हवे. प्रत्येक महिन्याला बुक कल्चर मार्फत बाल वाचक कट्टा आयोजित करण्यात येईल, असे ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी जाहीर केले. ठाणे, आभासी जगातून मुलांना बाहेर काढून वाचनाची आवड लावण्याचा विडा बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी उचलला आहे. याचाच एक भाग म्हणून जागतिक पुस्तक दिनाचे औचित्य साधून बुक कल्चरने मंगळवार, दि. 23 एप्रिल रोजी सायंकाळी ठाणे महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे वर्षभर सर्वाधिक पुस्तके वाचणाऱया वाचनप्रिय बालकांचा सन्मान केला. प्रमुख पाहूणे म्हणून ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त गझलकार संदीप माळवी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी प्रसिद्ध कवी अशोक बागवे आणि कवी अरुण म्हात्रे यांनीही सविता राणे सुरु केलेल्या बुक कल्चर चळवळीचे त्यांनी कौतुक केले. बुक कल्चरच्या संचालिका सविता राणे यांनी संस्थेची माहिती यावेळी दिली. आज बुक कल्चरमध्ये दोन हजाराहून अधिक बालवाचक आहेत. या उपक्रमात पालकांचेही योगदान असल्याचा उल्लेख करत सविता राणे यांनी करत भविष्यात हेच वाचक आपल्या देशाचे जगात उत्तम नेतृत्व करतील यात शंकाच नाही असे मत शेवटी व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. सेशा अय्यर हिने पहाडी आवाजात शिवगर्जना सादर केली. बुक कल्चरच्या वेबसाईटचेही उद्घाटन यावेळी संपन्न झाले.

अथर्व, अर्जुन, आर्यन चमकले

ठाणे : अथर्व अधिकारी, अर्जुन बागायतकरची दमदार शतके आणि आर्यन दलालच्या पाच विकेट्सच्या जोरावर यजमान स्पोर्टींग क्लब कमिटीने मांडवी मुस्लिम संघाचा १८९ धावांनी धुव्वा उडवत ३७ व्या श्रीधर देशपांडे स्मृती समरलीग टी २० क्रिकेट स्पर्धेत विजयी आगेकूच केली. अथर्वच्या नाबाद १०३ आणि अर्जुनच्या १०४ धावांच्या जोरावर २० षटकात २ बाद २४८ धावांचा डोंगर उभारला. त्यानंतर आर्यन दलालने आपल्या भेदक गोलंदाजीने मांडवी मुस्लिम संघाला अवघ्या ५९ धावांवर गुंडाळत संघाच्या मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले. प्रथम फलंदाजी करताना अथर्व आणि अर्जुनने मोठ्या खेळी करत संघाच्या धावसंख्येत मोलाचे योगदान दिले.या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १८० धावांची शतकी भागीदारी केली. अथर्वने आक्रमक खेळी करताना ५७ चेंडूत १४ चौकार आणि तीन षटकार मारत नाबाद शतक झळकवले. तर अर्जुनने ३० चेंडूत ११ चौकार आणि पाच षटकार ठोकत आपले शतक पूर्ण केले. या डावात प्रशांत मोरे आणि प्रशांत ठोंबरे यांनी प्रत्येकी एक विकेट मिळवली. विजयाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नांत आर्यनच्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीसमोर मांडवी मुस्लिमच्या फलंदाजानी अक्षरशः शरणगती पत्करली .आर्यनने  ४ षटकात २ निर्धाव षटकांसह अवघ्या ७ धावांमध्ये प्रतिस्पर्ध्यांचा अर्धा संघ गारद केला. निरेक गावंड आणि  यश जठारने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक : स्पोर्टींग क्लब कमिटी : २० षटकात २ बाद २४८ (अथर्व अधिकारी नाबाद १०३, अर्जुन बागायतकर १०४, प्रशांत मोरे ४-३५-१, प्रशांत ठोंबरे ३-२९-१) विजयी विरुद्ध मांडवी मुस्लिम क्लब : १३.१ षटकात सर्वबाद ५९ (आर्यन दलाल ४-२-७-५,निरेक गावंड २.१-१-१३-२, यश जठार ३-१४-२).

‘मतदान जनजागृती सेल्फी स्टॅण्ड’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात ठाणे : ‘उत्सव निवडणुकीचा अभिमान देशाचा’, ‘मतदान राजा ठेव कर्तव्याचे भान’, ‘सशक्त लोकशाहीसाठी कर मतदान’ असे आवाहन सेल्फी स्टॅण्डच्या माध्यमातून जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी नागरिकांना केले आहे. नागरिकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी हातभार तक्रारीचा, बोटभर उपाय असा जनजागृती करणारा सेल्फी स्टॅण्ड ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला असून कार्यालयात येणारे नागरिक या ठिकाणी सेल्फी घेत आहेत. देशभरात सुरू असलेल्या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांनी सक्रिय सहभाग घेवून मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे यासाठी ठाणे जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृतीवर विविध उपक्रम राबविण्यात येत असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेला सेल्फी स्टॅण्ड या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘तुमचे मत तुमचा अधिकार’, ‘वृद्ध असो किंवा जवान’, ‘सर्वजण करा मतदान, तुमचे मत खरा आधार लोकशाहीचा’ आदी घोषवाक्यांच्या माध्यमातून नागरिकांमध्ये मतदानाविषयी जनजागृती करण्यात येत आहे. जिल्हानिवडणूक कार्यालयाकडून लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेत मतदारांचा सहभाग वाढविण्यासाठी स्वीपअंतर्गत मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.‍ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दर्शनी भागात लावण्यात आलेला हा सेल्फी स्टॅण्ड नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून याठिकाणी नागरिक सेल्फी देखील काढत आहे. सेल्फी स्टॅण्डवर मतदारांना ऑफलाईन माहितीसाठी मतदार मदत क्रमांक देण्यात आला आहे. नागरिकांनी या सेल्फी स्टॅण्डचा लाभ घेवून मतदान प्रक्रियेत स्वत: सहभागी व्हावे व आपल्या परिसरातील नागरिकांनाही मतदानासाठी प्रवृत्त करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्‍हा निवडणूक अधिकारी अशोक शिनगारे यांनी केले आहे.

आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी नियंत्रण कक्ष-अजित नैराळे

कर्जत : आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर झाला असून दि. १६ मार्च २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यांत आली आहे. ३३ मावळ लोकसभा मतदार संघामधील १८९ कर्जत विधानसभा मतदार संघामध्ये नागरिकांकडून येणाच्या आदर्श आचारसंहिता भंगाविषयक तक्रारीचे निवारण करण्यासाठी, १८९ कर्जत विधानसभा मतदार संघात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून दुरध्वनी क्रमांक ०२१४८ – २२२०३७, ९३७३९२२९०९ आहे अशी माहिती उपविभागीय अधिकारी कर्जत तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी १८९ कर्जत, अजित नैराळे यांनी दिली आहे.