Author: bittambatami.com

मुंबईत २१ जूनला डाक अदालतीचे आयोजन

तक्रार ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी-सुनिल थळकर अशोक गायकवाड रायगड : मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथे २१ जून रोजी डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले असून ७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे. मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स, चौथा माळा, मुंबई यांच्या कार्यालया‌द्वारे दि.२१ जून २०२४ रोजी, दुपारी ३.०० वाजता १२७ वी डाक अदालत आयोजीत करण्यात आली आहे. इछुक ग्राहकांनी आपली तक्रार २ प्रतीत असिस्टंट डायरेक्टर पोस्टल सर्विसेस (पीजी) अँड सेक्रेटरी, डाक अदालत ०/० मुख्य पोस्ट मास्टर जनरल, महाराष्ट्र सर्कल, अनेएक्स बिल्डिंग, जीपीओ कॉम्प्लेक्स चौथा माळा, मुंबई ४००००१ यांच्याकडे दि.०७ जून २०२४ पर्यंत पोहचेल अशा रितीने पाठवावी, यामध्ये महाराष्ट्र सर्कल विभागातील डाक सेवेसंबंधीत तक्रार/ समस्या ज्याचे निवारण ६ आठवडा कालावधीत झालेले नाही, अशा टपाल, स्पीडपोस्ट, काऊंटर सेवा, बचत बँक, मनीऑर्डर संबधित तक्रारी विचारात घेतल्या जातील.तक्रारीत सविस्तर माहिती जसे दिनांक, ज्या अधिकाऱ्याकडे मूळ तक्रार दाखल केली त्या अधिकाऱ्याचे नाव व हु‌द्दा इ. असणे आवश्यक आहे., असे आवाहन अधीक्षक डाकघर रायगड विभाग सुनिल थळकर यांनी केले आहे.

साडेचार लाख रुपयांना बाळाची विक्री

तृतीयपंथीयांसह सहा जणांना अटक, आरोपींमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश मुंबई : दीड वर्षाच्या मुलाची साडेचार लाख रुपयांना विक्री केल्याच्या आरोपाप्रकरणी दोन तृतीयपंथीयांसह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. आरोपीमध्ये मुलाच्या आई-वडिलांचाही समावेश आहे. याप्रकरणी डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरोधात भादंवि कलम ३७०, ३४ सह अल्पवयीन न्याय (काळजी व संरक्षण) कायदा कलम ८० व ८१ अंतर्गत सहाजणांविरोधात डीएन नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सीमा खान (३२) या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तक्रारीनुसार, हुसैन शेख या एक वर्ष सात महिन्यांच्या मुलाची विक्री करण्यात आली. मुलाची आई नाजमीन शेख व वडील मोहम्मद शेख मालाड मालवणी परिसारीतल अब्दुल हमीद रोड परिसरातील वास्तव्यास आहेत. या दाम्पत्याने स्वतः आपल्या बाळाची विक्री केली. त्यासाठी अंधेरी पश्चिम इंदिरा नगर येथील तृतीयपंथी सायबा अन्सारी, त्याच परिसरात राहणारी राबिया अन्सारी व सकीना बानू शेख यांच्या मध्यस्थीने या बाळाची विक्री करण्यात आली. साकीना शेख ही या दाम्पत्याची परिचित आहे. सायबा अन्सारीच्या परिचयातून ठाण्यातील इंद्रदीप ऊर्फ इंदर व्हटवार (४३) याला बाळाची विक्री करण्यात आली. व्हटवार हा चांगल्या कुटुंबातील असून समलिंगी आहे. त्याला मुलगा दत्तक घ्यायचा होता. वैद्यकीय खर्चासह चार लाख ६५ हजार रुपयांना बाळाची विक्री करण्यात आली. आरोपींच्या तावडीतून बाळाची सुटका करण्यात आली असून त्याला सध्या अंधेरी पश्चिम येथील सेंट कॅफरीन सुरक्षागृहात ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. अपहरणाच्या बनावामुळे बिंग फुलले मुलाची आत्या घरी आली असता मुलगा दिसून आला नाही. अखेर तिने भावाला विचारले असता एका व्यावायिकाने त्याचे अपहरण केल्याची खोटी माहिती सांगितली होती. त्यानंतर मुलाच्या आत्याने तात्काळ भावाला व त्याच्या पत्नीला मालवणी पोलीस ठाण्यात घेऊन गेली होती. त्यावेळी त्यांनी जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी घेऊन गेल्याचे सांगून वेळ मारून नेली. पण त्याने बनवलेल्या कथेमध्ये अनेक चुका दिसू लागल्या त्यातून हा संपूर्ण प्रकार उघड झाला. आई-वडिलांनीच मुलांची विक्री केल्याची ही पहिली घटना नाही.

कल्याण-सीएसएमटी वातानुकूलित लोकलमधील शीत यंत्रणा बंद

प्रवासी उकाडा, घामाने हैराण कल्याण : कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस लोकलमधील काही डब्यांमधील वातानुकूलित यंत्रणा दोन दिवसांपासून बंद असल्याने प्रवासी लोकलच्या डब्यात बटाट्यासारखे उकडून निघत आहेत. उकाड्यामुळे बहुतांशी प्रवासी वातानुकूलित लोकलला आता पसंती देत आहेत. डब्यात घुसल्यानंंतर काही क्षणात प्रवाशांना डब्यातील वातानुकूलित यंत्रणा बंद असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांचा संताप होत आहे. अगोदरचा उकाड्याने नागरिकांचा घामटा निघाला आहे. सकाळची वेळ असली तरी उकाडा प्रवाशांची पाठ सोडत नाही. सकाळची वेळ असूनही घाम पुसून पुसून प्रवाशांंचे रुमाल ओलेचिंब होत आहेत. अशा परिस्थितीत वातानुकूलित लोकलमधून मस्त समाधानाने प्रवास करून या विचाराने या लोकलमध्ये चढून मुंबईपर्यंतचा प्रवास करणारे प्रवासी लोकलमधील वातानुकूलन यंत्रणा बंद राहत असल्याने संताप व्यक्त करत आहेत. वातानुकूलित लोकलमधील शीत यंत्रणा सुरू आहे की नाही हे लोकल सुरू करण्यापूर्वी कारशेडमध्ये तपासले जाते की नाही, असे प्रश्न प्रवासी उपस्थित करत आहेत. कल्याणमधून सकाळी सुटणारी वातानुकूलित लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर सकाळी नऊ वाजता येते. ही लोकल मुंबईत कार्यालयीन वेळेपूर्वी पोहोचत असल्याने बहुतांशी प्रवाशांची या लोकलला पसंती असते. गेल्या दोन दिवसांपासून प्रवासी या लोकलमध्ये चढत आहेत. लोकलमध्ये चढल्यानंतर काही डब्यांमधील वातानुकूलन यंत्रणा बंद असल्याचे प्रवाशांच्या निदर्शनास येत आहे. शीत यंत्रणा बंद असेल तर प्रवाशांना डब्यामध्ये सूचना करणारे एक लाल बटन आहे. ते दाबल्यानंतर मोटरमन, गार्डकडून त्याची दखल घेतली जाते. हे सूचना बटन दाबूनही त्याची मोटारमन, गार्डकडून दखल घेतली जात नाही, असे डोंबिवलीतील एक प्रवासी तुषार साठे यांनी सांगितले. एकदा वातानुकूलित लोकलमध्ये चढल्यानंंतर पुन्हा ती लोकल सोडून दुसऱ्या लोकलमध्ये चढणे प्रवाशांना शक्य होत नाही. त्यामुळे कोंडमारा करत, गुदमरत प्रवासी वातानुकूलित लोकलमधून प्रवास करत आहेत. अनेक प्रवाशांंना अती उकाड्यामुळे डब्यात अस्वस्थ वाटू लागले की ते पुढील रेल्वे स्थानकात उतरत असल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. प्रवासी वातानुकूलित लोकलचे दरवाजे उघडण्याचा प्रयत्न करतात. पण दरवाजेही उघडत नसल्याने जीव गुदमरत प्रवाशांना प्रवास करावा लागत आहे. मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी सोशिक आहेत, असे समजून वातानुकूलित लोकलमधील बिघाड नाही काढला तरी चालेल असा विचार रेल्वे अधिकाऱ्यांनी करू नये. अन्यथा, रेल्वे प्रवाशांच्या उद्रेकाला एक दिवस रेल्वे प्रशासनाला सामोरे जावे लागेल, असा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

‘डोंबिवलीतील उद्योजक म्हणजे शासनाला कल्हईवाले वाटले का?’

डोंबिवलीतील उद्योजकांचा संतप्त सवाल डोंबिवली : डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान रासायनिक कंपनीत स्फोट झाला आहे. कामगारांचा नाहक जीव गेले आहेत. अनेक जखमी झाले आहेत. आजुबाजुच्या कंपन्या बेचिराख झाल्या आहेत. याचे दुःख सर्वच उद्योजकांना आहे. आता स्फोटानंतरची सर्व परिस्थिती सुव्यवस्थित होण्यासाठी सर्व उद्योजक प्रयत्नशील आहेत. या चिंताग्रस्त वातावरणात डोंबिवली एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी डोंबिवली एमआयडीसीतील सर्वच उद्योजकांना कंपनी स्थलांतर संमतीपत्रावर स्वाक्षऱ्या करून ती पत्र तात्काळ एमआयडीसी कार्यालयात जमा करण्याचे फर्मावले आहे. हा प्रकार पाहून डोंबिवलीतील उद्योजकांनी आम्ही म्हणजे कल्हईवाले आहोत का? असा संतप्त सवाल केला आहे. अमुदान कंपनी आणि परिसरातील रासायनिक कंपन्यांच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे. तेथे अग्निशमन, आपत्कालीन विभागाचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्यांंना उद्योजक सूचना करतील त्याप्रमाणे काम बचावाचे काम करावे लागते. चौकशी अधिकारी उद्योजकांना बोलावून काही अत्यावश्यक माहिती घेत आहेत. ही सर्व धावपळ सुरू असताना डोंबिवली एमआयडीसीतील अधिकाऱ्यांनी उद्योजक म्हणजे चोर समजून, ते उद्या कंपन्या सोडून पळून जातील या भावनेतून आम्ही आमची कंपनी स्थलांतरास तयार आहोत की नाही, अशा आशयाचे एमआयडीसीचे शीर्षक नसलेले, तळाला कोणत्याही जबाबदारी अधिकाऱ्याचे स्वाक्षरी नसलेले संमतीपत्र उद्योजकांना देऊन त्यावर तातडीने स्वाक्षऱ्या करून ते पत्र एमआयडीसी डोंबिवली कार्यालयात जमा करण्याचे फर्मान काढले आहे. अटींमुळे उद्योजक हैराण कंपनीच्या नावावर जलमापक करायचे असेल तर ते मुद्रांक शुल्कावर हवे. कंपनी प्रायव्हेट असेल तर संचालक मंडळाचा ठराव हवा. फॅक्टरी प्लान असुनही बीसीसी द्यायला दिव्य करावे लागते. संमतीपत्राची घाई करताना ते कोणाकडून पाठविले गेले आहे. पाठविणाऱ्याची स्वाक्षरी, शिक्का त्या पत्राखाली नको का, असे प्रश्न उद्योजकांनी केले आहेत. डोंबिवली एमआयडीसीतील औद्योगिक भूखंडांवरील बेकायदा इमले तोडायची हिम्मत एमआयडीसी अधिकाऱ्यांमध्ये नाही. उद्योजक काही बोलत नाहीत म्हणून त्यांच्यावर दबाव आणि भूमाफिया बळाचा वापर करतात त्यांच्या समोर शरणागती. हे दुटप्पी धोरण अधिकाऱ्यांनी सोडावे, असा इशारा उद्योजकांनी दिला आहे. उद्योजकांकडून तातडीने स्थलांतराची संमतीपत्रे घेताना जशी जबरदस्ती केली जाते. त्याचप्रमाणे अधिकाऱ्यांनी औद्योगिक भूखंडांवरील बेकायदा निवासी इमले तोडण्यासाठी तेवढीच ताकद लावावी म्हणजे एमआयडीसीतील एक मोठा प्रश्न मार्गी लागेल, अशी भूमिका उद्योजकांनी मांडली.

“बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर कारवाई करा”

ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे आदेश कल्याण : ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बारवर तातडीने कारवाई सुरू करा. या कारवाईत कोणीही पोलीस अधिकाऱ्याने हलगर्जीपणा केला तर, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणे पोलीस आयुक्त डॉ. आशुतोष डुंबरे यांनी मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्तालयात घेतलेल्या परिमंडळातील पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिला. पुणे येथील एका धनाढ्याच्या मुलाने दोन संगणक अभियंत्यांना मद्यसेवन करून वाहन चालविताना उडविले. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डुंबरे यांनी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील कल्याण, भिवंडी, उल्हासनगर परिमंडळ क्षेत्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची मंगळवारी बैठक घेतली. या बैठकीत परिमंडळ हद्दीत बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्सबार रात्री उशिरापर्यंत सुरू राहत असतील तर त्यांच्यावर तातडीने कारवाई सुरू करावी. कोणीही अधिकारी या कारवाईत कुचराई करत असेल, याची माहिती मिळाल्यास संबंधितावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त डुंबरे यांनी दिला. रात्री उशिरपर्यंत नृत्यगाणी ठाणे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील भिवंडी परिसर, कल्याण शिळफाटा, नेवाळी, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात अधिक संख्येने डान्सबार आहेत. काही ठिकाणी पब्ज, बेकायदा हॉटेल्स, ढाबे आहेत. ढाब्यांवर चोरून मद्य विकले जाते. या ढाब्यांना शासनाची परवानगी नाही. डान्सबार बंद असताना ते रात्री उशिरापर्यंत चालविले जात असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याविषयी ठाणे पोलीस आयुक्तालयापर्यंत अनेक तक्रारी गेल्या आहेत असे समजते. पोलीस मुख्यालय, परिमंडळातील काही पोलीस अधिकारी वरिष्ठांचे ‘कलेक्टर’ म्हणून परिसरात काम करतात. ते अधिकारी या बेकायदा उद्योगांची पाठराखण करत असल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. असे जुने ‘कलेक्टर’ शोधून आयुक्त डुंबरे यांनी या अधिकाऱ्यांना पालिका मुख्यालय किंवा नियंत्रण कक्षात पदस्थापना देण्याची मागणी काही पोलीस अधिकारीच करत आहेत. अशा ‘कलेक्टर’ अधिकाऱ्यांची एक यादीच काही पोलीस अधिकाऱ्यांच्या ताब्यात आहे. हे अधिकारी वर्षानुवर्ष पोलीस आयुक्तालय क्षेत्रात असून त्यांची काही वरिष्ठांशी संबंध असल्याने या विषयावर उघडपणे बोलण्यास कोणीही अधिकारी तयार नाही. आता या अधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील बेकायदा हॉटेल्स, पब्ज, डान्स बार अशा बेकायदा व्यवहारांची पाठराखण करण्याचा प्रयत्न केला तर या अधिकाऱ्यांची यादी आयुक्त डुंबरे यांना देण्याच्या विचारात काही पोलीस अधिकारी आहेत. कल्याण परिमंडळातील एका वरिष्ठाचा एक कलेक्टर अन्य भागात बदलीने गेला. पण वरिष्ठाने अथक प्रयत्न करून त्या ‘कलेक्टर’ची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करून घेऊन आपले कार्य अबाधित चालू राहिल याची काळजी घेतल्याची चर्चा पोलिसांमध्ये आहे.

वाशी विभागात अनधिकृत झोपड्यावर धडक कारवाई

नवी मुंबई : महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सी विभाग वाशी कार्यालयाअंतर्गत वाशीगांव  व सेक्टर- ३१ येथे बेकायदेशीर / ‍अनधिकृत झोपडपटटया  वसलेल्या आहेत तसेच वाशीगांव परिसरातील नमुंमपा   ‍व सिडकोच्या जागेवर अनधिकृत झोपडया वसलेल्या आहेत. केरळा भवन ते वाशी हायवे पर्यंत, वाशी येथील उद्यानाकरीता आरक्षीत असलेल्या मोकळ्या भूखंडावर, वाशी सायन पनवेल हायवे लगत  तसेच वाशीगांव खाडी  किनारी  लगत उभारण्यात आलेल्या झोपडपटटयांवर तोडक कारवाई  करुन एकूण ६३८ अनाधिकृत झोपड्या निष्कासित  करण्यात आल्या. या धडक मोहिमेसाठी वाशी विभाग कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी,  सुरक्षा रक्षक, मजूर व जेसीबी च्या सहाय्याने निष्कासित करण्यात आले. यापुढे देखील अशा प्रकारे कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.

होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत ठाण्यात भाजपा आग्रही

 माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन ठाणे : घोडबंदर रोड परिसरात मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकात उभारण्यात आलेल्या होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबरोबरच बेकायदा होर्डिंग तत्काळ काढून टाकावीत. त्याचबरोबर होर्डिंगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात महापालिकेने नियमावली तयार करावी, अशी मागणी भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. या वेळी भाजपाचे माजी ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार, भरत चव्हाण यांचीही उपस्थिती होती. घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील मुख्य रस्ते, इमारती, इलेक्ट्रिक टॉवर आणि महत्वाच्या चौकामध्ये उभारलेल्या होर्डिंगची तपासणी करण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत जाहिरातीला आलेल्या महत्वामुळे ठिकठिकाणी होर्डिंग उभारली गेली. काही ठिकाणी महापालिकेच्या नियमाची पायमल्ली करीत बेकायदा पद्धतीने होर्डिंग थाटली गेली. काही ठिकाणी कमी जागेची परवानगी घेऊन मोठी होर्डिंग लावण्यात आली असल्याच्या तक्रारी आहेत. शहरातील काही ठिकाणी अनधिकृत व धोकादायक इमारतींवरही होर्डिंग असल्यामुळे नागरिकांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो, अशी भीषण परिस्थिती आहे. घोडबंदर रोडवर दोन इलेक्ट्रिक टॉवरला वेल्डिंग करून होर्डिंग उभारण्यात आला आहे, याकडे आयुक्त राव यांचे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्यात आले. या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून तपासणी करावी. तसेच बेकायदा होर्डिंग काढून टाकून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून उंचावरील होर्डिंगची नियमित तपासणी करावी. तसेच भविष्यात होर्डिगपासून नागरिकांच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमावली तयार करावीत, अशी मागणी माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली.

स्वातंत्र्यवीर सावरकरांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

ठाणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेला त्यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात तहसिलदार संजय भोसले यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

ई रिक्षाच्या सोडतीमध्ये वीस जणांना लाभ

माथेरान : सनियंत्रण समितीने सध्या वीस ई रिक्षांना पायलट प्रोजेक्ट वर परवानगी दिली होती परंतु यामध्ये एकूण २३ जणांनी आपले फॉर्म भरले होते.याकामी वीस जणांना अधिकृतपणे या ई रिक्षा मिळण्यासाठी नगरपरिषदेच्या कार्यालयात प्रशासक तथा मुख्याधिकारी राहुल इंगळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये दि.२७ रोजी सायंकाळी पाच वाजता सोडत काढण्यात आली यामध्ये वीस जणांना सध्या सुरू होणाऱ्या पायलट प्रोजेक्ट साठी लाभ मिळाला आहे.यावेळी नगरपरिषदेचे अंकुश इचके, सदानंद इंगळे उपस्थित होते तर २३ हातरीक्षा चालक, मालक सुध्दा सोडतीच्या वेळी समक्ष हजर होते. अनेक दिवसांपासून ई रिक्षाचा प्रश्न मार्गी लागत नव्हता. सुरुवातीला सनियंत्रण समितीने वीस ई रिक्षासाठी पायलट प्रोजेक्ट म्हणून परवानगी दिली होती त्यावेळी पंधरा ई रिक्षा शालेय विद्यार्थ्यांना आणि उर्वरित पाच ई रिक्षा पर्यटकांना, स्थानिक,आबालवृद्ध,दिव्यांग यांना वापरण्यात याव्यात असे सूचित केले होते. त्यावेळी आपला यामध्ये तोटा होणार आहे ही बाब लक्षात घेऊन काहींनी अंग काढले होते तर आज ना उद्या सर्वांना ई रिक्षा मिळणार आहेत त्यामुळे डेरिंग करून वीस जणांनी हा कोटा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेतला होता      फॉर्म भरण्यात आले होते.अखेरीस यातील वीस जणांना लाभ झाला असून उर्वरित ७४ जणांना ह्या पायलट प्रोजेक्ट नंतर टप्प्याटप्प्याने लाभ घेता येणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे  हात रिक्षा चालकांची अमानवीय प्रथेतून मुक्ती च्या दृष्टीने महत्वपूर्ण पाऊल असल्याचे हात रिक्षा चालकांचे मत व्यक्त केले. हात रिक्षाच्या अमानवीय प्रथेतून मुक्ती होणार असून ई रिक्षा मुळे आमच्या जीवनात बदल होणात आहे तसेच माझे अन्य हात रिक्षा बांधव त्यांना देखील लवकर ई रिक्षाचा परवाना मिळावा…