सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेशोत्सवालाही संधी; अर्जाची अंतिम मुदत १६ व २० सप्टेंबर
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात उत्साहात साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवाला पर्यावरणपूरक, प्लास्टिकमुक्त आणि सामाजिक प्रबोधनाची जोड देण्यासाठी यंदा ‘नवी मुंबई महापौर चषक सार्वजनिक व घरगुती श्रीगणेशोत्सव स्पर्धा २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. महापौर श्रीमती सुजाता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीने पारंपरिक सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेला व्यापक स्वरूप देत यंदा घरगुती गणेशोत्सवाचाही समावेश केला आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे यांनी केले आहे.
गणेशोत्सव पर्यावरणाचा सन्मान राखून साजरा करण्याचे आवाहन महापौर श्रीमती सुजाता पाटील आणि आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे. त्यानुसार शाडूच्या मातीच्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना, मूर्तीची उंची सहा फुटांपर्यंत मर्यादित ठेवणे, विसर्जनासाठी महापालिकेने निर्माण केलेल्या १७० कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर करणे, सजावटीमध्ये प्लास्टिक व थर्माकोलचा वापर टाळून नैसर्गिक साहित्याचा वापर करणे, तसेच आरोग्य, स्वच्छता, पर्यावरण जागृती, संस्कृती संवर्धन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे.
स्पर्धेत उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ, उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव (५ दिवस), उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव (१० दिवस) आणि पर्यावरणपूरक उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अशा विविध प्रमुख पुरस्कारांचा समावेश आहे. याशिवाय उत्कृष्ट गणेशमूर्ती, उत्कृष्ट देखावा, उत्कृष्ट सजावट, उत्कृष्ट पारंपरिक गणेशोत्सव, उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पना, उत्कृष्ट सांस्कृतिक कार्यक्रम आणि उत्कृष्ट सामाजिक संदेश अशा विविध श्रेणींमध्ये उल्लेखनीय पुरस्कार दिले जाणार आहेत. एकूण चार लाख २७ हजार रुपयांच्या पुरस्कारांसह सन्मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र प्रदान करण्यात येणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.nmmcganesha.in या संकेतस्थळावर विहित नमुन्यात ऑनलाइन अर्ज भरणे आवश्यक आहे. उत्कृष्ट घरगुती गणेशोत्सव (५ दिवस) या श्रेणीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत १६ सप्टेंबर असून, इतर सर्व पुरस्कार श्रेणींसाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत. मुदतीनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
नवी मुंबईतील जास्तीत जास्त सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तसेच नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन क्रीडा, सांस्कृतिक कार्य व युवक कल्याण समितीचे सभापती गिरीश कान्हा म्हात्रे, उपसभापती राजू भालचंद्र मढवी आणि सर्व समिती सदस्यांनी केले आहे.
000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *