६५ किलो फ्रीस्टाइल गटात करणार भारताचे प्रतिनिधित्व; ‘शिवसेना विथ जेन झी’ उपक्रमातून सत्कार
कल्याण : कल्याण पूर्व, नांदिवली येथील जय बजरंग कुस्ती आखाड्याची युवा कुस्तीपटू वैष्णवी पाटील हिची अमेरिकेतील लास वेगास येथे होणाऱ्या २३ वर्षांखालील वरिष्ठ जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. ६५ किलो फ्रीस्टाइल गटातून वैष्णवी भारताचे प्रतिनिधित्व करणार असून, ही स्पर्धा १२ ते १८ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होणार आहे.
वैष्णवीच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि कल्याण व उल्हासनगर विधानसभा संपर्कप्रमुख महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येणाऱ्या ‘शिवसेना विथ जेन झी’ उपक्रमाच्या माध्यमातून तिचा सत्कार करण्यात आला. चिंचपाडा शिवसेना विभागाच्या वतीने शिवसैनिक दुर्गेश बागुल आणि संतोष माने यांनी वैष्णवीचा गौरव करून आगामी जागतिक स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
वैष्णवीच्या यशामागे कल्याण-डोंबिवली कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष पंढरीनाथ ढोणे, हाडवैद्य वसंत साळुंखे, राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रज्वलदीप ढोणे, नांदोली गावचे माजी सरपंच विलास ढोणे, शिवसैनिक श्वेता ढोणे, समाजसेवक पंकज ढोणे आणि गणेश पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले आहे. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर वैष्णवीने मिळवलेले हे यश कल्याण पूर्वसह संपूर्ण कल्याण-डोंबिवलीसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. लास वेगास येथे होणाऱ्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करताना वैष्णवीने देशाचा तिरंगा अभिमानाने उंचावावा, अशा शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
00000
