Author: bittambatami.com

निवडणूक निरीक्षक संजीवकुमार झा यांनी केली स्ट्रॉंग रूमची पाहणी

अशोक गायकवाड रायगड : ३२ रायगड लोकसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक सर्वसाधारण निरीक्षक म्हणून भारत निवडणूक आयोगाने संजीवकुमार झा यांची नियुक्त्ती केली असून त्यांनी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथील स्ट्रॉंग रूमची पाहणी केली. तसेच संबंधितांना येथील उपाययोजनांबाबत सूचना दिल्या. निवडणूक निरीक्षक झा यांनी महाड विधानसभा मतदार संघास भेट देऊन सहायक निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर सुरु असलेल्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी ज्ञानोबा बानापुरे, तहसीलदार महेश शितोळे, नायब तहसीलदार खोपकर उपस्थित होते. यावेळी झा यांनी महाड मतदार संघातील स्ट्रॉंग रूम ची पाहणी केली. तसेच मतदान यंत्र वितरण आणि संकलन केंद्राची पाहणी केली. मतदान यंत्र तयार करणे बाबत आवश्यक ती सर्व नियमानुसार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिली.

२५६ आरोपी गजाआड

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कारवाईत ७१ लाखाचा मुद्देमाल जप्त अशोक गायकवाड रायगड : लोकसभा निवडणूक सन २०२४ च्या अनुषंगाने रायगड जिल्हयात आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून १६ मार्च ते २२ एप्रिलपर्यत राज्य…

‘संवेदना’ उद्यानाबाबत महापालिका ‘असंवेदनशील’

नवी मुंबई : कोट्यवधी खर्च करून तयार केलेल्या सानपाडा सेक्टर १० येथील ‘संवेदना’ उद्यानाची दुरवस्था झाल्यामुळे दिव्यांगांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर तत्काळ कारवाई करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी निवेदन दिले. उद्यानांचे शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरात महापालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सानपाडा सेक्टर १० येथे ‘संवेदना’ उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. स्पर्शज्ञान, सुगंध, जाणीव, ध्वनी, चव या मानवाच्या पंचेंद्रियांवर आधारित संकल्पनेवर संवेदना उद्यान विकसित करण्यात आले असून राज्यातील हा पहिलाच उपक्रम आहे. उद्यानांमध्ये दिव्यांग मुलांसाठी खेळणी, व्हीलचेअरचा झोपाळा, वाळूचा हौद, बोगदा, लेस बांधण्यासाठी बूट, वेगवेगळ्या प्रकारची हिरवळ, दगड, लाकूड, लादी, गोटे बसविलेला मार्ग, सापशिडीचा खेळ, स्पिकिंग ट्यूब, बेल ट्री, फुली गोळ्याचा खेळ, सेल्फी फ्रेम, बुद्धिबळ चौकटी, सिंथेटिक जॉगिंग ट्रॅक इत्यादी सुविधांचा समावेश असून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहेत. प्रवेशद्वाराच्या उजव्या बाजूला ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्यासाठी जागा व लहान मुलांसाठी विविध खेळणी बसविण्यात आली असून विशेष सुविधेसह दोन स्वच्छतागृहे उपलब्ध करण्यात आली आहेत. सौंदर्याला बाधा उद्यानाच्या देखभाल-दुरुस्तीकडे महापालिका अधिकारी, ठेकेदार यांच्याकडून दुर्लक्ष होत असल्याने उद्यानाच्या सौंदर्याला बाधा पोहचत आहे. उद्यानातील लोखंडी फलक, लहान मुलांची तुटलेली खेळणी उद्यानात पडलेली दिसत आहेत. तसेच कारंजे बंद पडले असून पाण्याचे हौद पाण्याअभावी ओस पडले असून झाडेही सुकून गेली आहेत. विद्युत दिवेसुद्धा तुटले असून त्यांचा खच एका कोपऱ्यात पडलेला आहे. स्वच्छतागृहातील नळ खराब झाले असून शौचास बसण्यासाठी असलेले भांडेसुद्धा तुटून पडले आहे. पालिका अधिकारी व ठेकेदार यांच्या निष्काळजीमुळे उद्यानाचे सौंदर्य नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे उद्यानात सकाळ, संध्याकाळ फेरफटका मारण्यासाठी ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कोट सानपाडा येथील संवेदना उद्यानातील दुरुस्ती करण्याबाबत शहर अभियंता यांना पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे. त्यामुळे जी काही कामे आहेत ती अभियांत्रिकी विभागाकडून केली जातील. – दिलीप नेरकर, उपायुक्त, उद्यान विभाग

अंबरनाथमध्ये ९०० नव्या पुस्तकांचे प्रदर्शन

‘ग्रंथाभिसरण’ वाचनालयाची वाचकांसाठी साहित्‍यिक मेजवानी अंबरनाथ-  वाचनसंस्कृती वाढावी, यासाठी विविध उपक्रम राबविणाऱ्या येथील ग्रंथाभिसरण वाचनालयाने जागतिक पुस्तक दिनानिमित्त तब्बल ९०० नव्या कोऱ्या पुस्तकांच्या संचांचे प्रदर्शन आयोजित करून साहित्यिक मेजवानी दिली आहे. पुस्‍तक प्रदर्शनाला वाचकांनी…

पालिकेने हटविली निविदेतील ‘ती’ अट!

अखेर दोन दिवसात होणार नालेसफाईला सुरुवात ठाणे : पावसाळ्यापूर्वी नालेसफाईची कामे वेळेत व्हावी यासाठी महापालिकेने यंदा आधीच पावले उचलली होती. त्यानुसार निविदा प्रक्रियाही राबविण्यात आली. मात्र वारंवार मुदतवाढ देऊनही निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे निविदेतील अटी शर्ती शिथील केल्या. अखेर आता दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींमधून ठेकेदार पुढे आल्याने आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिकेने दिली. ठाणे महापलिका हद्दीतील कळवा प्रभाग समिती सर्वाधिक २०१ नाले असून त्याखालोखाल दिव्यात १३१, नौपाडा प्रभाग समितीत ४९, वागळे इस्टेटमध्ये ३८, लोकमान्य-सावरकरात ३४, उथळसमध्ये ३४, वर्तकनगरात २९, माजीवाडा- मानपाडा ४४, मुंब्रयात ८० नाले असल्याची नोंद आहे. यंदाही नालेसफाईच्या कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करून १५ एप्रिलपासून कामे सुरू करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले होते. यामुळे पालिकेने मार्च महिन्यातच नालेसफाईच्या कामांच्या नऊ प्रभाग समितीनिहाय निविदा काढल्या होत्या. महापालिकेने टाकलेल्या काही अटी आणि शर्तींमुळे ठेकेदारांनी नालेसफाईच्या कामांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. तसेच यंदा खर्चात देखील तीन कोटींची कपात केली होती. त्यामुळे देखील ठेकेदारांनी नकार घंटा वाजविली होती. त्यामुळे पालिकेने वारंवार निविदेला मुदतवाढ दिली. त्यानंतर वागळे इस्टेट आणि लोकमान्यनगर याठिकाणीच ठेकेदारांनी निविदा भरल्याचे दिसून आले. त्यानंतर महापालिकेने पुन्हा निविदेला मुदतवाढ देत २२ एप्रिल पर्यंत वाढविली होती. ही मुदतवाढ देत असतांना निविदेत असलेली आपत्कालीन परिस्थितीत वर्षभर नालेसफाई करण्याची अट शिथील करण्यात आली. ही अट शिथिल करण्यात आल्याने अखेर दिवा प्रभाग समिती वगळता उर्वरीत आठ प्रभाग समितींना ठेकेदार मिळाले आहेत. त्यानुसार आता शनिवार पासून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली. त्यानुसार माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधून नालेसफाईच्या कामांना सुरवात होणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.

उल्हासनगरात कलानी ताकदवान, श्रीकांत शिंदेंकडून टीम कलानीवर स्तुतीसुमने

उल्हासनगरः उल्हासनगर शहरात आपले वर्चस्व राखून असलेल्या टीम ओमी कलानीने यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही शिवसेनेच्या श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. गेल्या काही दिवसांपासून तीन वेळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी टीम ओमी कलानी यांची भेट घेतली असून शिंदेंसाठी कलानींनी दोन कार्यकर्ता मेळाव्याचेही आयोजन केले होते. तर एकदा घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटाशी जवळीक असूनही यंदाही कलानी श्रीकांत शिंदेंसाठी प्रचारात उतरणार आहेत. राजकीय युती – आघाड्यांना तिलांजली देत अनेकदा उल्हासनगर शहरात विचित्र राजकीय समिकरणे तयार झाल्याचे दिसून आले आहे. २०१७च्या पालिका निवडणुकांपर्यंत शिवसेना आणि भाजप यांची नैसर्गिक युती शहरात होती. २०१७ नंतर भाजपने एकहाती सत्ता मिळवण्यासाठी शिवसेनेला दूर करत टीम ओमी कलानीशी आघाडी केली होती. शहरात ओमी कलानी यांची वेगळी ताकद आहे. त्यांच्याशिवाय सत्तेचे समीकरण गाठणे शक्य होत नसल्याचेही बोलले जाते. २०१७ वर्षात ओमी कलानी यांनी आपले उमेदवार भाजपच्या चिन्हावर निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे पहिल्यांदाच भाजपचा महापौर उल्हासनगर पालिकेत निवडून आला होता. त्यानंतर अडीच वर्षानंतर शिवसेनेने टीम ओमी कलानीला आपल्याकडे वळवत पालिकेची सत्ता मिळवली होती. त्यानंतर शिवसेना भाजपात दुरावा होता. मात्र ओमी कलानीशी शिवसेनेचे चांगले संबंध होते. मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या फुटीनंतर कलानी यांचा कल शरद पवार यांच्या गटाकडे होता. शरद पवार, जितेंद्र आव्हाड यांनी कलानी महल येथे जात कलानी कुटुंबाची भेटही घेतली होती. त्यामुळे कलानी गट शरद पवार गटाकडे झुकणार याची दाट शक्यता होती. मात्र लोकसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर कलानी कुटुंबाने शिवसेनेला उघड पाठिंबा दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे संपूर्ण मतदारसंघ प्रचार करताना पिंजून काढत आहेत. या भेटीगाठींमध्ये कलानी गटाचे पदाधिकारीही हजेरी लावत आहेत. तर कलानी गटाने श्रीकांत शिंदे यांच्यासाठी दोन कार्यकर्ते मेळावे आयोजित केले होते. मंगळवारी कलानी महलात पुन्हा टीम ओमी कलानींच्या वतीने आयोजीत संघटना बैठकीला श्रीकांत शिंदे यांनी हजेरी लावली. यावेळी महायुतीला पाठिंबा जाहीर केल्याबद्दल त्यांनी कलानी टीमचे आभार मानले. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी ओमी कलानी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली. कलानी आणि शिवसेनेची मैत्री फार जुनी असून यापूर्वीही त्यांनी शिवसेनेला बिनशर्त मोठी मदत केल्याचे शिंदे यांनी सांगितले. टीम ओमी कलानीची उल्हासनगरमध्ये वेगळी ताकद असून ओमी कलानी एक उत्तम मित्र असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाशी जवळीक असली तरी टीम ओमी कलानी श्रीकांत शिंदे यांच्या पाठीशी आहे.

कोंडीस कारणीभूत बंद केलेला कापूरबावडी- ढोकाळी मार्ग खुला करण्याचा निर्णय

ठाणे : घोडबंदर मार्गालगत असलेल्या महत्त्वाचा कापूरबावडी ते ढोकाळी हा बंद मार्ग अखेर ठाणे महापालिकेने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या एक ते दोन दिवसांत हा मार्ग खुला होणार आहे. हा मार्ग खुला करण्यात यावा यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. मार्ग खुला झाल्यानंतर कोलशेत, हायलँड, कापूरबावडी, ढोकाळी येथील वाहन चालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. हा मार्ग एका ‘ सुमित बाबा’च्या आदेशाने बंद केल्याची चर्चा ठाण्यात सुरू होती. गेल्याकाही वर्षांमध्ये ठाण्यातील घोडबंदर, हायलँड, बाळकूम, कोलशेत, ढोकाळी आणि मनोरमानगर भागात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. या भागातून प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. घोडबंदर मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी ठाणे महापालिकेने कापूरबावडी आणि माजिवडा चौकात काही बदल सूचवले होते. या बदलाचा भाग म्हणून ठाणे महापालिकेने येथील ढोकाळी, कोलशेत मार्गाला जोडणारा कापूरबावडी ते ढोकाळी हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे या मार्गावरील वाहनांची वाहतुक कापूरबावडी येथून हायलँड, ढोकाळी मार्गे सोडली जात होती. या वाहतुक बदलामुळे कापूरबावडी चौकात मोठी वाहतुक कोंडी होत होती. काही महिन्यांपूर्वी कोलशेत भागात सेंट्रल पार्क आणि हायलँड भागात प्रशस्त मंदीर उभारण्यात आले आहे. त्यामुळे या पार्कमध्ये आणि मंदीरात येणाऱ्या वाहनांचा भार देखील मार्गावर वाढला होता. सुट्ट्यांच्या दिवसांत हायलँड, कोलशेत भागात मोठ्या वाहतुक कोंडीचा सामना ठाणेकरांना सहन करावा लागत आहे. हा मार्ग खुला करण्यासाठी वाहतुक पोलिसांकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून आणि नागरिकांकडून देखील हा मार्ग खुला करण्यासाठी मागणी केली जात होती. परंतु महापालिकेकडून हा मार्ग खुला केला जात नव्हता. त्यामुळे येथील कोंडी सोडविताना वाहतुक पोलिसांच्या नाकी नऊ आले होते. गेल्या आठवड्याभरात कापूरबावडी, हायलँड भागात वाहतुक कोंडीच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर अखेर उशीराने जाग आलेल्या ठाणे महापालिकेने येथील कापूरबावडी- ढोकाळी मार्गिका सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या भागातील दुभाजक हटविण्यात आले आहेत. येथे डांबरी रस्ता तयार करून येत्या एक ते दोन दिवसांत हा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. ठाणे शहरात ठिकठिकाणी मुख्य मार्गावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. कापूरबावडी-ढोकाळी हा मार्ग देखील बंद करण्यात आला होता. हे दुभाजक ‘सुमित बाबा’ नावाच्या व्यक्तीच्या सूचनेवरून बसविण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. हा रस्ता देखील त्यांच्या सांगण्यावरून केल्याची चर्चा ठाण्यात सुरू होती. त्यामुळे रहिवाशांकडून मागणी करूनही रस्ता खुला केला जात नसल्याची चर्चा रंगली होती. शिवसेना- भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई रस्ता खुला करण्यावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये श्रेयवादाची लढाई रंगली. दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांनीच पाठपुरावा केल्याने हा रस्ता खुला झाल्याचा दावा केला जात आहे. शिवसेनेचे माजी नगरसेवक संजय भोईर यांनी परिसरात मोठे फलक उभारले आहे. तर भाजपचे पदाधिकारी दत्ता घाडगे यांनी सहा महिन्यांपासून आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत असल्याचा दावा केला आहे. हा रस्ता खुला करण्यात यावा यासाठी नागरिकांकडून मागणी केली जात होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हायलँड येथे सभेला आले असताना, त्यांचासोबत आम्ही चर्चा केली. त्यामुळे हा रस्ता खुला झाला. परंतु काही लोक फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका संजय भोईर यांनी केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नामुळे हे शक्य झाले आहे असे म्हणत त्यांनी भाजपचे आमदार संजय केळकर यांचे नाव घेणे टाळले. मागील सहा महिन्यांपासून आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून रस्ता खुला करण्यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचे ठाणे शहर जिल्हा फ्रेंड्स ऑफ भाजपचे संयोजक दत्ता घाडगे यांनी सांगितले. राज्यात भाजपची युती आहे. तन-मन-धनाने ही युती असायला हवी. परंतु ठाण्यात हे चित्र कमी प्रमाणात दिसते. ठाणे महापालिकेत केवळ एकाच पक्षाची ‘दादा’गिरी सुरू आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एकी दिसून येत नाही असा आरोप त्यांनी केला.

उल्हास नदीचे ‘हिरवे’ रूप पाहिले का ?

जलपर्णीमुळे नदीपात्र हरवले, उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात बदलापूरः ठाणे जिल्ह्यातील बहुतांश शहरांची पिण्याच्या पाण्यासाठी जीवन वाहिनी असलेल्या उल्हास नदीला प्रदूषणाने ग्रासले असून त्याचे परिणाम अगदी गडदपणे दिसू लागले आहेत. बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवर जलपर्णीचा विळखा दिसून येत असून नदीचे पात्र दिसेनासे झाले आहे. जलपर्णीचा विळखा नदीपात्रात दिवसेंदिवस वाढत असून त्यामुळे नदीतील जलचर धोक्यात असून पाणी पातळी झपाट्याने कमी होते आहे. एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत घरोघरी उमेदवार आणि पक्षाचे पदाधिकारी फिरताना दिसत आहेत. मात्र नदी प्रदूषणाकडे सर्वांचाच कानाडोळा झाल्याचे दिसते आहे. उल्हास नदी ठाणे जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते. कर्जत तालुक्यातून वाहत येत वांगणीजवळ ही नदी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. नदी किनारी अनेक ग्रामपंचायती या नदीतून पिण्यासाठी पाणी उचलतात. बदलापूर शहरात बॅरेज बंधाऱ्यावर अंबरनाथ आणि बदलापूर शहराची पाणी योजना आहे. येथून पाणी उचलून त्यावर प्रक्रिया केली जाते. पुढे याच नदीला जांभूळ येथे बारवी नदी येऊन मिळते. यात बारवी धरणातून पाणी साोडले जाते. ते पुढे जांभूळ बंधाऱ्यावरून उचलून त्यावर अंबरनाथजवळील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रियेसाठी पाठवले जाते. पुढे मोठमोठ्या जलवाहिन्यातून हेच पाणी अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, ठाणे या शहरांना तर विविध औद्योगिक वसाहतींनाही पुरवले जाते. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीने उल्हास नदीचे मोठे महत्व आहे. मात्र तरीही गेल्या काही दिवसांपासून नदीच्या पात्राला जलपर्णीचा विळखा पडला आहे. बदलापूर पश्चिमेतील चौपाटी परिसरापासून थेट जांभूळ बंधाऱ्यापर्यंतच्या भागात संपूर्ण नदीचा पात्र जलपर्णीमध्ये हरवले आहे. जलपर्णी इतकी दाट आहे की काही दिवसांपूर्वी एका तरुणीने येथे आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र या जलपर्णीत अडकल्याने सुदैवाने बचावली. सध्याच्या घडीला हे पात्र जलपर्णीमुळे इतके गर्द झाले आहे की एखाद्या उद्यानातील हिरवा गालीचा असल्यासमान नदी भासते. नदी पात्रावर आलेल्या जलपर्णीमुळे खाली तळापर्यंत सुर्यप्रकाश पोहोचण्यास अडथळा होत असून त्यामुळे पाण्यातील जलचर धोक्यात आले आहेत. नदीच्या या प्रदुषणावर तातडीने तोडगा काढून उल्हास नदी पुन्हा जलपर्णीमुक्त करावी अशी मागणी होते आहे. प्रदुषण सुरूच उल्हास नदी पात्रात नागरी आणि औद्योगिक सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप वर्षानुवर्षे होतो आहे. कर्जतपासून थेट कल्याणपर्यंत नागरीकरण झालेली, नागरिकरणाच्या वाटेवर असलेली शहरे, गावांतून येणारे सांडपाणी थेट नदीत मिसळते आहे. त्याकडे कायमच कानाडोळा झाला आहे. नदीत कचरा मिसळण्यापासून रोखण्यासाठी स्थानिक पालिका प्रशासन फक्त फलकबाजी करण्यात धन्यता मानते आहे. त्यामुळे नदी प्रदूषण दिवसेंदिवस वाढतेच आहे. मोहीम थंडावली तीन वर्षांपूर्वी उल्हास नदी जलपर्णीमुक्तीसाठी सगुणा रूरल फाऊंडेशनच्या मदतीने विशेष मोहीम राबवण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी यात पुढाकार घेतला होता. मात्र त्यांच्या बदलीनंतर ही मोहीम थंडावली. चला जाणुया नदीला ही मोहीम राज्य सरकारने सुरू केली. मात्र तीचा प्रभाव पडू शकलेला नाही.

महाविकास आघाडीचा कार्यकर्ता मेळावा भायखळा येथील अण्णाभाऊ साठे नाट्यगृहात जल्लोषात पार पडला. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मधू चव्हाण, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे, खासदार अरविंद सावंत, काँग्रेसचे दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष रवी बावकर, अश्फाक सिद्दीकी महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नेते उपस्थित होते.

जनतेला निवडणुकीपुरता विकास कामाचं गाजर दाखवणारे  निष्क्रिय खासदार म्हणजे कपिल पाटील-सुरेश (बाळ्यामामा )म्हात्रे

राजीव चंदने मुरबाड : निवडणुकीचे रणशिंग फुकताच मुरबाड मधे महाविकास इंडिया आघाडीचा भव्य दिव्य प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा शहरातील खुले नाट्यगृहात संपन्न झाला, त्याप्रसंगी सुरेश (बाळ्या मामा)म्हात्रे यांनी आपल्या भाषणात खासदार कपिल पाटीलांवर  टीका करत म्हणाले की दहा वर्ष खासदार पदाची ज्याना संधी मिळाली तीन वर्ष राज्यमंत्री पद असतांना देखील कुठल्याही प्रकारचे विकास कामे केली नसून फक्त जनतेची दिशाभूल करत निवडणुकी पुरता विकास कामांचा गाजर दाखवायच काम केला आहे, कपिल पाटील हे निष्क्रिय खासदार आहेत, असा घणाघाती आरोप बाळ्या मामा यांनी महाविकास इंडीया आघाडीच्या मेळाव्यात केला, त्यानंतर ते पुढे म्हणाले की  खासदार पदाची संधी मला मिळाली तर अनेक वर्षापासून मुरबाडकरांचा रखडलेल्या रेल्वेचा प्रश्न,मार्गी लावणार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आजोळ असलेले आंबेटेंबे गाव येथिल अपूर्ण भीमाई स्मारकाचा काम पूर्ण करणार, यासर्व कामांचा आढावा प्रत्येक वर्षी पत्रकार परिषद घेऊन सादर करणार असे हि यावेळी ते म्हणाले त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा याकरिता त्त्यांच्या साठी वेगळी बाजार पेठ तयार करण्याचे आश्वासन हि दिले, त्याप्रसंगी राष्ट्रवादी(शरद पवार) गटाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, मुरबाड तालुका अध्यक्ष दिपक वाघचौडे, शहराध्यक्ष तेजस व्यापारी, शिवसेना उ.बा.ठा उपजिल्हा प्रमुख मधुकर घुडे, मुरबाड तालुका अध्यक्ष संतोष विशे, राजाराम  निचीते, गणपत टावरे, आम आदमी पार्टीचे  ऍड, नितीन देशमुख, भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या मुरबाड तालुका महिला अध्यक्षा कविता वारे, दिलीप कराळे,निलेश शिंदे,संजय चंदने, भाविक चंन्ने, अभिषेक डुंकवाल,यांच्या सह शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.