Author: bittambatami.com

पत्रलेखनासारख्या अभिनव उपक्रमातून विद्यार्थ्यांनी पालकांना केले मतदानाचे आवाहन

नवी मुंबई : संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक नागरिकाने 20 मे रोजी होत असलेल्या ठाणे लोकसभा निवडणूकीत हक्काने बजावावा याकरिता विविध माध्यमांतून जनजागृती करण्यात येत असून मतदानविषयक प्रचार, प्रसाराच्या स्वीप कार्यक्रमांतर्गत 150 ऐरोली व 151 बेलापूर विधानसभा मतदारसंघ कार्यालयाच्या वतीने वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येत आहेत. लोकसभा निवडणूकीत मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध माध्यमांतून प्रयत्न करण्यात येत असून मुलांनी मागणी केलेल्या एखाद्या गोष्टीला पालकांकडून उत्तम प्रतिसाद मिळतो हे लक्षात घेत पत्रलेखन हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. याव्दारे विद्यार्थ्यांनी आपले आई-बाबा यांना पत्र लिहून त्यांनी येत्या लोकसभा निवडणूकीत संविधानाने दिलेला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन केले. नवी मुंबई महानगरपालिका शाळांप्रमाणेच  खाजगी शाळांतून हा उपक्रम उत्साहाने राबविण्यात आला. अनेक शाळांनी त्याकरिता आपल्या विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड, अंतर्देशीय पत्र उपलब्ध करून दिली होती. ‘माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी, लोकशाही बळकट करण्यासाठी नक्की मतदान करा’ असा आईबाबांना आग्रह करणारे हे पत्रलेखन मुलांकडून आपल्या पालकांना त्यांच्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव करून देणारे होते. या पत्रलेखनातून मुलांमार्फत मतदार पालकांना आवाहन तर करण्यात आलेच शिवाय सध्याच्या समाज माध्यमांतून संदेश आदानप्रदानाच्या तंत्रस्नेही युगात पत्रलेखनासारख्या दुर्मीळ होत चाललेल्या माध्यमाचा आनंदही याव्दारे विद्यार्थ्यांना घेता आला. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदाने पालकांनी मतदान करावे असे आवाहनपत्र लिहिले व पालकांनीही या पत्रलेखन उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महानगरपालिकेच्या शाळांसह खाजगी शाळांमध्येही शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

उमेदवारांनी निवडणुक प्रक्रिया व प्रचारादरम्यान आयोगाच्या सूचनांचे पालन करा-किशन जावळे

रायगड : भारत निवडणूक आयोगाने सार्वत्रिक निवडणुक कालावधीत उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधीने काय करावे काय करू नये याबाबत मार्गदर्शक तत्वे निश्चित केली आहे. या सर्व नियमानुसार प्रचार, त्या अनुषंगाने विविध प्रकारच्या परवानग्या, तसेच प्रचार खर्चा बाबत कार्यवाही करावी. तसेच प्रचारा दरम्यान निवडणूक आयोगाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे,असे प्रतिपादन निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी केले. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील उमेदवार व खर्च प्रतिनिधींचे प्रशिक्षण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृह मध्ये आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी निवडणूक निरीक्षक सर्वसाधारण संजीव कुमार झा , निवडणूक खर्च निरीक्षक धीरेंद्रमणी त्रिपाठी, अपर जिल्हाधिकारी सुनील थोरवे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी स्नेहा उबाळे, जिल्हा खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम, आदर्श आचारसंहिता कक्षाचा नोडेल अधिकारी श्रीमती जोत्स्ना पडीयार यांच्यासह राजकीय पक्षाचे उमेदवार व प्रतिनिधी उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी जावळे म्हणाले, निवडणूक शासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी सर्व राजकीय पक्ष व उमेदवारांसाठी सहकार्याच्या भूमिकेतून काम करतील. प्रशिक्षण काळजीपूर्वक समजून घेवून आयोगाच्या नियम पालनास प्राधान्य द्यावे. निवडणूक विषयक विविध शासकीय विभागाचे समन्वय अधिकारी नेमण्यात आले असून जिल्हा नियंत्रण कक्ष व तक्रार संनियंत्रण कक्ष, माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती (एमसीएमसी) तसेच खर्च पथक कार्यरत आहेत, प्रत्येक मतदारसंघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च पथक नेमण्यात आले आहेत असे जिल्हाधिकारी जावळे यांनी सांगितले. निवडणूक निर्णय अधिकारी पुढे म्हणाले, निवडणुक प्रचारासाठी वाहने, मिरवणूक, सभा आदी परवानगी अर्ज प्राप्त झाले नंतर ” प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य” तत्त्वानुसार कार्यवाही करण्यात येईल. सदर प्रचार दि. ६ रोजी सायंकाळी सहा वाजता थांबणार आहे. यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रचार करता येणार नाही परंतू वृत्तपत्रातून मतदान दिवशी व त्याच्या आदल्या दिवशी जाहिरात जिल्हा माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कडून प्रमाणित करून प्रसिद्ध करता येईल,असे जावळे यांनी म्हणाले. यावेळी आदर्श आचारसंहिता, होम व्होटिंग, माँक पोल, ई व्हो एम सरमिसळ, प्रचार खर्चासाठी विविध दरसुची, निवडणूक प्रचार कार्यालय, मतदानसाठी ओळखपत्र अथवा ओळखपत्राचे पर्यायी १२ पुरावे, मतदानाच्या दिवशी उभा करावयाची बूथ, मतदान केंद्र राजकीय प्रतिनिधी याबाबतची माहीती दिली. तसेच निवडणूक प्रचार कामासाठी बालकामगार ठेवू नये, प्रचारासाठी प्राण्यांचा वापर करू नये, अशा सूचना दिल्या. यावेळी निवडणूक खर्च सनियंत्रण समितीचे नोडल अधिकारी राहुल कदम यांनी सादरीकरण करून मार्गदर्शन केले. ते म्हणाले, खर्च संनियंत्रणासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या स्तरावर खर्च पथक नेमण्यात आले आहे. या पथकाचे काम अन्य विविध पथकांच्या समन्वयाने चालते. उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचे तपशील आयोगाच्या नियमानुसार तपासण्याचे काम खर्च पटकन द्वारे होत असून यासाठी दैनंदिन खर्च नोंदवही देण्यात आली आहे. यातील नोंदी हिशोब व बँक व्यवहाराची माहिती उमेदवारांना त्याच दिवशी नोंदवणे गरजेचे आहे. उमेदवारांसाठी येथील खर्च मर्यादा ९५ लक्ष रुपये असून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या दिवसापासून निकालाच्या दिवसापर्यंत सर्व प्रचार नोंदवला जाणे गरजेचे आहे. निवडणुकीचा निकाल नंतर तीस दिवसाच्या आत खर्च सादर करणे बंधनकारक आहे, असे कदम म्हणाले. आज उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षण सत्राच्या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी जावळे यांनी उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांच्या असणाऱ्या शंकांबाबत प्रश्नोत्तर घेवून शंकांचे निरसन करण्यात आले. या प्रसंगी विविध पोलीस व शासकीय अधिकारी, जिल्हा खर्च नियंत्रण समितीतील अधिकारी उपस्थित होते.

भरत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीत जप्त रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती

अशोक गायकवाड रायगड : मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाड यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती स्थापन करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्यासह अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य यांचा समावेश आहे. जप्त केलेली रोख रक्कम परत करण्यासाठी कार्यवाही समिती आगामी लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने ३२-रायगड लोकसभा मतदारसंघ अंतर्गत उमेदवारांची भरारी पथकाने जप्त केलेली रोख रक्कम परत करण्याबाबतची कार्यवाही करण्यासाठी पुढीलप्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे. भरत बास्टेवाड (भा.प्र.से.), मुख्य कार्यकारी अधिकारी, अध्यक्ष, राहुल केशव कदम, मुख्य लेखा व वित्त अधिकारी – निमंत्रक, देविदास टोंगे, जिल्हा कोषागार अधिकारी सदस्य. ही समिती उमेदरावांच्या जप्त केलेल्या रकमेचा कोणत्याही उमेदवाराशी किंवा राजकीय पक्षाशी किंवा कोणत्याही निवडणूक प्रचार, इत्यादीशी संबंध नाही असे दिसून आल्यास अशी रोख रक्कम ज्यांच्याकडून जप्त करण्यात आली होती, अशा व्यक्तींना देण्याबाबतचे वस्तूनिष्ठ मौखिक आदेश दिल्यानंतर ही रक्कम उमेदवारास परत करण्याची कार्यवाही करेल.

 जिम्नॅस्ट आध्यान देसाई याची भारतीय संघात निवड

 प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विले पार्लेचा मुंबई:मुंबईचे माजी महापौर माजी आमदार डॉ. रमेश यशवंत प्रभू यांनी १९९७ साली प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाची स्थापना केली तेव्हा त्यांच्या मनात एक मोठे स्वप्न होते. त्यांना जागतिक दर्जाच्या आणि सर्वांसाठी खुल्या अशा पायाभूत सुविधा निर्माण करायच्या होत्या. गेल्या काही वर्षांमध्ये, प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाने खेळाडूंसाठी जागतिक दर्जाचे इक्विपमेंटस् प्रदान केली आहे. यातील अनेक खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आपल्या खेळात ठसा उमटवला आहे. संकुलात खालील निरनिराळ्या क्रिडा प्रकारच्या  खेळांचे प्रशिक्षण तज्ज्ञ प्रशिक्षकांडून दिले जात आहे. जलतरण, पिकलबॉल, मल्लखांब, बुद्धिबळ, ज्युडो, जिम्नॅस्टिक्स, कराटे, तायकोंडो, व्यायामशाळा, रोलर स्केटिंग, टेबल टेनिस, झुंबा, रायफल शुटिंग ईत्यादी. प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या ७ हून अधिक खेळाडूंनी विविध खेळांमध्ये सर्वात प्रतिष्ठित शिवछत्रपती पुरस्कार जिंकला आहे. मल्लखांब खेळातील अतुलनीय कामगिरीबद्दल श्री गणेश देवरूखकर यांना यावर्षी द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अगदी अलीकडेच, जिम्नॅस्टिक्स ॲथलीट आध्यान देसाईची आगामी ज्युनियर एशियन ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक्स चॅम्पियनशिप २०२४ साठी हाँगकाँग, चीन येथे टीम इंडियाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवड झाली आहे. ही स्पर्धा मे महिन्यात होणार असून १० ते १२ मे २०२४ या कालावधीत होणार आहे. आध्यान हा माजी अंडर-१२ राष्ट्रीय चॅम्पियन देखील आहे आणि त्याने कोलकाता येथे नुकत्याच संपलेल्या सब ज्युनियर नॅशनल स्पर्धेत अनेक पदकेही जिंकली आहेत. हरियाणा येथील खेलो इंडियन युथ गेम्स २०२२ मध्येही त्याने भाग घेतला होता आणि सरकारी मंजूर योजनेअंतर्गत तो एक खेलो इंडिया ॲथलीट आहे. आध्यान गेल्या १० वर्षांपासून प्रबोधकार ठाकरे क्रीडा संकुल मध्ये सराव करत आहे. त्यांचे प्रशिक्षक श्री शुभम गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव श्री मोहन अ. राणे यांच्या पाठिंब्याने ही अतुलनीय कामगिरी केली आहे. अध्यक्ष श्री. अरविंद रमेश प्रभू आणि सचिव मोहन अ. राणे यांनी ही बातमी मिळाल्याने आनंद व्यक्त केला आणि आशियाई स्पर्धेसाठी आध्यानला शुभेच्छा दिल्या.

मुंबई वाय.एम. सी.ए.ची  मोफत उन्हाळी शिबिरे  २ मे पासून

मुंबई :  क्रीडा आणि सेवा क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या मुंबई वाय.एम.सी.ए.च्या वतीने २ मेपासून विविध खेळांच्या मोफत क्रीडा प्रशिक्षण शिबिरांना २ मे पासून प्रारंभ होणार आहे. यंदा १५० वर्षे पूर्ण करणारी वाय.एम. सी.ए. ही भारतातील सर्वात जुनी सेवाभावी संस्था (एन.जी.ओ.) असून त्याचेच निमित्त साधून त्यांच्या मुंबईतील सर्व शाखा आणि केंद्रांमधून संपूर्ण वर्षभर विविध खेळांच्या क्रीडा स्पर्धा आणि क्रीडा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे मुंबई वाय.एम.सी.ए.चे सरचिटणीस लेओनार्ड सॅलिन्स यांनी म्हटले आहे. सध्याच्या युवा पिढीला मोबाईल आणि सोशिअल मीडिया पासून दूर नेवून त्यांच्यात क्रीडा प्रेम रुजविण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्यांच्या मुंबईतील विविध केंद्रांमध्ये २ मे पासून बास्केटबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, लॉन टेनिस, रोलर स्केटिंग, कराटे, किक बॉक्सिंग,मिश्र  मार्शल आर्ट, बुद्धिबळ, बॅडमिंटन, धनुर्विद्या, रिदमिक जिम्नॅस्टिकस, जलतरण, फुटबॉल, कुस्ती, अॅथलेटिक्स  अशा विविध खेळांच्या शिबिरांसाठी मोफत तर काही खेळांसाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे.  या शिबिरासाठीचे प्रवेश अर्ज ३० एप्रिल पर्यंत स्वीकारण्यात येणार असून मुंबईतील वाय.एम.सी.ए. च्या कुठल्याही केंद्रात प्रवेश अर्ज स्वीकारण्यात येतील.  या सर्व शिबिरांसाठीच्या अधिक माहिती साठी www . ymcabombay .org  या संकेत स्थळावर अथवा वाय.एम.सी.ए. हेल्पलाईन ७२०८९२८८५३  किंवा मुंबई वाय.एम.सी.ए.चे सरचिटणीस लेओनार्ड सॅलिन्स यांच्याशी ९८९२४०२९२३ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.  या शिबिरांसह ८ ते १८ या वयोगटातील खेळाडूंना स्वयंपूर्ण आणि एक जबाबदार व्यक्ती म्हणून विकसित करण्यासाठी मुंबई बाहेरील शिबिरांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे.

कुख्यात गुंड अरुण गवळीच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या

मुदतपूर्व सुटकेचा मार्ग मोकळा मुंबई: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कुख्यात गुंड अरुण गवळीच्या मुदतपूर्व सुटकेचा मार्ग उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मोकळा केला असतानाच भाजपने गवळीच्या स्वागतासाठी पायघड्या घालण्यास सुरुवात केली. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गीता गवळी यांना बहीण संबोधून महापौर बनवण्यासाठी मदत करण्याचे दिलेले आश्वासन त्याचेच निदर्शक मानले जाते. नगरसेवक कमलाकर जामसंडेकर यांच्या २००७ मध्ये झालेल्या हत्येच्या आरोपावरून अरुण गवळीसह इतर ११ जणांना २०१२ मध्ये जन्मठेपेची शिक्षा झाली. चौदा वर्षे शिक्षा भोगली असून ६५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे असल्यामुळे जन्मठेपेच्या शिक्षेतून सुटका करावी, अशा मागणीची याचिका गवळीने केली होती. २००६ च्या माफी धोरणानुसार चौदा वर्षे प्रत्यक्ष कारावास भोगलेल्या, वयाची ६५वर्षे पूर्ण केलेल्या जन्मठेपेच्या कैद्यांची प्रकृतीच्या कारणास्तव सुटका करण्याची तरतूद आहे. २०१५च्या सुधारित धोरणानुसार त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र २००६च्या धोरणाचा लाभ घेण्यापासून गवळीला वंचित ठेवता येणार नाही, असे मत न्यायालयाने मांडले होते. याप्रश्नी सरकारला येत्या दोन आठवड्यात निर्णय घ्यावा लागणार आहे. लोकसभेच्या धामधुमीत ही घटना घडत असल्यामुळे तिचा लाभ घेण्यासाठी राजकीय चढाओढीची शक्यता होती. मुंबई दक्षिण मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी एका सभेत थेट गवळी कुटुंबालाच साकडे घातले. “मी अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही. डॅडींप्रमाणेच (अरुण गवळी) अ.भा.सेच्या कार्यकर्त्यांना प्रेम मिळेल. या परिवारात एक सदस्य आलाय, असं समजा. या बहिणीला (गीता गवळी) महापौर होईपर्यंत या भावाची साथ राहील”, असे आश्वासन नार्वेकर यांनी दिले. एकेकाळी अरुण गवळीचे शिवसेनेशी चांगले संबंध होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तर जाहीरपणे तुमचा दाऊद तर आमचा गवळी असे म्हटले होते. शिवसेनेपासून फारकत घेतल्यानंतर गवळीने स्वतःचा अखिल भारतीय सेना हा पक्ष स्थापन केला. अरुण गवळी आमदार झाला. कन्या गीता गवळीसह त्याची वहिनी वंदना गवळी आणि कार्यकर्ता सुनील घाटे महापालिका निवडणुकीत विजयी झाले. गीता गवळीची महापालिकेत शिवसेनेशी जवळीक होती, परंतु अलीकडच्या काळात भाजपशी जवळीक वाढली होती. न्यायालयाने सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारकडून विरोध मागे घेतला जाईल आणि अरुण गवळीची सुटका होईल,असा अंदाज व्यक्त होत आहे. गवळी भाजपसोबत जाणार की शिवसेनेला साथ देणार याचे उत्तर सुटकेनंतरच मिळणार आहे. राजकीय वाटचाल २००४ च्या लोकसभेला मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून अरुण गवळी ‘अभासे’कडून उभा होता, त्यावेळी ९२ हजार २१० मते मिळाली. चिंचपोकळी विधानसभा मतदारसंघातून २००४ रोजी अरुण गवळीने विजय मिळवला होता. त्याला ३१ हजार ९६४ मते मिळाली होती. २००९च्या निवडणुकीत गवळीचा काँग्रेसच्या मधू चव्हाण यांच्याकडून पराभव झाला. अरुण गवळीची कन्या गीता गवळी यांनी २०१४ आणि २०१९ची विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांना अनुक्रमे २० हजार ८९५ आणि दहा हजार ४९३ अशी मते मिळाली होती.

भाजपच्या दबावाला शिंदेंचा ‘खो’

ठाण्याची जागा शिवसेनाच लढवणार? ठाणे : आली लग्न घटीका समीप… तरीही नवऱ्या मुलाचा पत्ता नाही, अशी काहीशी अवस्था ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीची झाली आहे. आधी जागा वाटपासाठी चर्चांचे गुर्‍हाळ व त्यानंतर पसंत- नापसंतीचा रंगलेला खेळ यामुळे गेल्या महिन्याभरापासून मतदारसंघात बिनचेहऱ्याचा नुसताच प्रचार सुरू आहे. आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होण्यास अवघे चार दिवस उरले आहेत, तरी नावाची घोषणा झाली नाही. शिंदे गटाकडे ही जागा येणार हे निश्चित झाले आहे; पण भाजपप्रणित नावावर फुली मारत शतप्रतिशत शिवसेनेचाच उमेदवार निवडणूक रिंगणात पाठवण्यावर शिंदे गट ठाम आहे. त्यामुळे इच्छुकांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असला तरी खरी लढत ही शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट यांच्यातच होणार आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेनेचे विभागलेले दोन मावळे एकमेकांसमोर उभे राहणार असल्याने निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. त्यात मुख्यमंत्र्यांसाठी हा प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. त्यामुळे कोणत्याही बाबतीत या मतदारसंघासाठी तडजोड न करण्याच्या भूमिकेवर मुख्यमंत्र्यासह शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते ठाम आहेत. त्यामुळेच सुरुवातीपासून दावा करणाऱ्या भाजपला जागावाटपात एक पाऊल मागे टाकण्यास भाग पडले. चिन्ह तुमचे उमेदवार आमचा हा फॉर्म्युला देत सुरुवातीला संजीव नाईक यांचे नाव भाजपने पुढे केले. त्यांना तयारीला लागा, असे संकेत देताच नाईक थेट प्रचारालाही लागले; मात्र या नावाला शिंदे गटातून नापसंती मिळाल्याने नवीन उमेदवार देण्यात आला; पण या नवीन चेहऱ्याला जनाधार नसल्याचे सांगत मोठी फुली मारण्यात आल्याचे समजते. शिंदे गटात सुरुवातीपासूनच माजी महापौर नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक आणि माजी आमदार रवींद्र फाटक यांची नावे आघाडीवर आहेत. असे असताना भाजपकडून उमेदवार आयात केला असता मतदारांमध्ये चुकीचा संदेश जाण्याची शक्यता होती. महविकास आघाडीकडून विद्यमान खासदार राजन विचारे तिसऱ्यांदा निवडणुकीसाठी उभे आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ते ठाकरे गटाशी एकनिष्ठ राहिले, ही त्यांची जमेची बाजू आहे. त्यात त्यांच्या मेळावे आणि सामाजिक, धार्मिक उपक्रमांमध्ये होणारी गर्दी शिंदे गटाला आव्हान आहे. अशा घट्ट पाय रोवलेल्या मूळ ठाणेकर चेहऱ्याला टक्कर द्यायची असेल, तर महायुतीतील उमेदवारही तितकाच ताकदीचा पाहिजे. नुसता लोकप्रिय किंवा विचारवंत उमेदवार देऊन भागणार नाही. यावर शिंदे गटाचे एकमत झाले आहे. तसा संदेशही भाजपपर्यंत पोहोचल्याचे समजते. त्यामुळे नवीन ‘चेहऱ्या’पेक्षा चर्चेतल्याच नावाचा विचार होऊन तशी घोषणा होण्याची शक्यता आहे. प्रचारासाठी मिळणार कमी वेळ २६ एप्रिल ते ३ मेपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. त्यानंतर १८ मेपर्यंत प्रचार करता येणार आहे. विद्यमान खासदारांनी जोरदार प्रचार सुरू केला असताना महायुतीच्या उमेदवाराचे नाव अजूनही गुलदस्त्यात आहे. उद्या नाव जरी जाहीर केले तरी महायुतीच्या उमेदवाराला प्रचारासाठी अवघे २० ते २५ दिवस मिळणार आहे. नवी मुंबई ते मिरा- भाईंदरपर्यंत विस्तारलेल्या या मतदारसंघात प्रचाराचे आव्हान उमेदवाराला पूर्ण करावे लागणार आहे. दरम्यान, उमेदवार कोणताही असला तरी आमचा प्रचार सुरू आहे. यावेळी महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आणणे हे ध्येय असल्याने तशी अडचण भासणार नसल्याचे शिंदे गटाचे म्हणणे आहे.

कोचमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरूप सुटका!

इगतपुरी यार्डमध्ये रेल्वेची मॉकड्रील ठाणे : रेल्वे दुर्घटना, आगीच्या घटना, पूल कोसळण्याच्या घटना घडल्यानंतर सुरक्षा विभागाने कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे. याबाबत मध्य रेल्वेने कर्मचाऱ्यांना दरवर्षी प्रशिक्षण देत असते. सोमवारी मध्य रेल्वेने,इगतपुरी अप यार्डमध्ये राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (एनडीआरएफ) आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या यशस्वी मॉकड्रिल केली. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, आज इगतपुरी अप यार्ड येथे एनडीआरएफ आणि इतर आपत्ती व्यवस्थापन टीमसोबत संयुक्तरित्या यशस्वी मॉकड्रिल घेण्यात आली आहे. सर्वप्रथमक सकाळी ११.१० वाजता मॉकड्रिलची सुरुवात झाली. इगतपुरी अप यार्डमध्ये एक डब्या रेल्वे रुळावरून घसरून अचानक आग लागली. या अपघातांची माहिती मुंबई विभागाच्या नियंत्रण कक्षाला निरोप देण्यात आला. नियंत्रण कक्षाने तातडीने कार्यवाही करत एनडीआरएफ, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि रेल्वे अपघात मदत वाहन (एआरटी) आणि सर्व संबंधितांना संदेश पाठविला. सकाळी सव्वा अकरा वाजता रेल्वेची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली. तसेच एनडीआरएफची एक तुकडी सकाळी ११.१९ वाजता घटनास्थळी दाखल झाली आणि त्यांनी तत्काळ संरक्षण दलाच्या व अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. रेल्वेच्या कार्यरत कर्मचाऱ्यांकडून अग्निशामक यंत्रांचा वापर करून त्यांनी ११.२४ वाजता आग नियंत्रणात आणली.एनडीआरएफच्या पथकाने सकाळी ११.२५ ते १२.०६ या वेळेत एकूण १८ जखमींना वाचवले. त्याचवेळी एनडीआरएफ आणि एआरटी च्या पथकांनी सदर डब्याचे छत दोन्ही बाजूंनी कापून प्रत्येकी एक जीव वाचवला. रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी, एनडीआरएफला प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मदत केली.या पथकात ‘फेरो’ नावाचा आठ वर्षांचा कुत्रा देखील आपली भूमिका बजावत होता.संकटकाळातील तयारी आणि प्रभावी प्रतिसाद यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मध्य रेल्वेची वचनबद्धता या सरावातून दिसून आली. अपघाताची पूर्वतयारी आणि त्याच्या जलद प्रतिसादासाठी रेल्वेकडून संयुक्तपणे असे सराव सुरू राहतील. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या सुरक्षा विभागाने या सरावाचे संयोजन केले होते.

६७ दशलक्ष मुले लसींपासून वंचित

रमेश औताडे मुंबई : कोविड महामारी दरम्यान पाळण्यात आलेल्या लॉकडाऊन कालावधीत नियमित लसीकरणामध्ये घट झाली असून जवळपास 67 दशलक्ष मुले जीवनरक्षक लसींपासून वंचित आहेत. असे युनिसेफने सादर केलेल्या “द स्टेट ऑफ द वर्ल्डस चिल्ड्रन ” या अहवालात दिसून आले आहे. अशी माहिती मुंबई प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत जागतिक लसीकरण तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे प्रमुख  डॉ.जीनेंद्र जैन यांनी दिली. देशात गोवरच्या प्रकरणांमध्येही चिंताजनक वाढ होत आहे. 2022 मध्ये, अंदाजे 11 लाख मुलांनी भारतातील गोवर लसीचा पहिला डोस चुकवला, ज्यामुळे गोवर लसीकरणात सर्वात जास्त अंतर असलेल्या दहा राष्ट्रांमध्ये भारताची समावेश झाला आहे असे जागतिक आरोग्य संघटना आणि यूएस केंद्रांचा अहवाल रोग नियंत्रण आणि प्रतिबंध (CDC) अहवालात आढळून आले असे लहान मुलांचे तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे सहयोगी डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले. 2022 मध्ये 40,967 प्रकरणांची नोंद झाली असून 37 देशांपैकी भारत हा एक असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. रोगप्रतिकारशक्ती विषयी बोलताना डॉक्टरांनी स्पष्ट सांगितले आहे की , लसीकरण हा बालकांच्या संगोपनातील महत्त्वाचा घटक आहे. पोलिओ, क्षयरोग, गोवर, कांजिण्या अशा विविध आजारांपासून लहान मुलांचे संरक्षण व्हावे आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढावी, यादृष्टीने लसीकरण अत्यंत महत्त्वाचे ठरते. भारतात 26 रोगांसाठी लस आहेत परंतु सामान्यतः फक्त 10-12 रोगांवर लसीकरण केले जाते. पौगंडावस्था, गर्भवती महिला आणि 40 वर्षापेक्षा जास्त वयाच्या वयोवृद्धांसह सर्वच वयोगटातील लोकांसाठी लसीकरण महत्त्वपूर्ण आहे आणि इन्फ्लूएंझा, न्यूमोनिया आणि हिपॅटायटीस यांसारख्या विविध संक्रमणांपासून संरक्षण करण्यात मदत करते असे बालरोग तज्ञ व व्होकार्ट हॉस्पिटल लॅसिकरण जनजागृती मोहिमेचे सहयोगी डॉ बादशाह खान यांनी सांगितले. डिप्थीरिया, टिटॅनस आणि डांग्या खोकला (पेयुसिस) विरुद्ध लढण्यासाठी DTaP लस महत्त्वपूर्ण आहे, तर एमएमआर लस गोवर, गालगुंड आणि रुबेला विरुद्ध प्रभावी आहे. मेनिंजायटीस मेनिन्गोकोकल लसीने, व्हेरिसेला लसीमुळे कांजण्या, आयपीव्ही लसीने पोलिओ आणि न्यूमोकोकल लसीद्वारे न्यूमोनिया टाळता येतो. गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग प्रतिबंधाविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी सरकार एचपीव्ही लस देखील पुरवते असे डॉ. अंकित गुप्ता यांनी सांगितले. लसीकरणाचे दर देशभरात कमी होत आहेत मात्र  लसीकरणाबाबत जागरुकता नसल्यामुळे लहान मुले आणि प्रौढावर लसीकरणाचा परिणाम होत आहे. गालगुंड आणि एमएमआर लस वगळल्यामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. न्यूमोनियाची लस न घेतल्याने होणारी गुंतागुंतीची प्रकरणे वाढत आहेत. सरकार मोफत लस देत असूनही, अनेक लोक अजूनही लसीकरण करत नाहीत आणि त्यामुळे आरोग्यासंबंधी गुंतागुंत वाढते . कोविड-19 साथीच्या आजारापूर्वी किंवा त्यादरम्यान जन्माला आलेली लसीकरण न झालेली मुले आता विविध लस-प्रतिबंधात्मक आजारांनी ग्रस्त आहेत. असे डॉ बादशाह खान यांनी सांगितले. पर्यायी लस जसे की न्यूमोकोकल लस, फ्लू लस, कांजिण्यांसाठी व्हॅरिसेला लस, हिपॅटायटीस ए लस प्रौढांना द्यावी. फ्लू किंवा इन्फ्लूएंझा लस दरवर्षी सर्व वयोगटातील लोकांनी विशेषतः मधुमेह, मूत्रपिंड, हृदय आणि फुफ्फुसाचे आजार असलेल्या रुग्णांनी घ्यावी. न्यूमोकोकल लस देखील उच्च-जोखीम असलेल्या लोकसंख्येस किडनी, आणि हृदयरोग, केमोथेरपी घेत असलेल्या आणि प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांकरिका फायदेशीर ठरते. इम्युनोसप्रेसेंट असलेल्या लोकांमध्ये न्यूमोनिया घातक ठरू शकतो म्हणून एखाद्या समुदायात एखाद्‌या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी लसीकरण मोहिमांचं आयोजन केले आहे. असे  डॉ जिनेंद्र जैन यांनी सांगितले.

ठाणे महापालिकेतर्फे जागतिक वसुंधरा दिन साजरा

तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा यांचे आयोजन ठाणे : रायलादेवी तलाव परिसर स्वच्छता, खुली पर्यावरण कार्यशाळा, चित्रकला स्पर्धा आणि प्लास्टिक कचऱ्याचे संकलन अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून ठाणे महापालिकेतर्फे सोमवार, २२ एप्रिल रोजी जागतिक वसुंधरा दिन साजरा करण्यात आला. परिसर भगिनी विकास संघ या स्वयंसेवी संस्थेच्या स्वयंसेवकांनी रायलादेवी तलाव परिसराची स्वच्छता केली. या मोहिमेत भीम नगर येथील अभ्यास वर्गातील विद्यार्थी, कचरा वेचक महिला, महापालिका कर्मचारी यांनी सहभाग घेतला. त्यांनी या अभियानात परिसरातून २५ किलो प्लास्टिक कचरा संकलित केला. याप्रसंगी, विद्यार्थ्यांना वसुंधरा दिनाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर, या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे महापालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळ यांनी नागरिकांना पर्यवरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ऑनलाईन खुल्या पर्यावरण शाळेचा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमात, २२ एप्रिल रोजी डॉ. संजय जोशी यांचे व्याख्यान झाले. त्यांनी पर्यावरण चळवळ, त्याची सुरूवात, वसुंधरा दिनाचा इतिहास याची माहिती दिली. यंदाच्या वसुंधरा दिनाची संकल्पना ग्रह वि. प्लास्टिक अशी आहे. त्याअनुषंगाने, डॉ. जोशी यांनी प्लास्टिकचा वाढता वापर, त्याच्या विविध प्रकारांमुळे होणारे प्रदूषण आणि त्याचा पर्यावरणावर होत असलेला परिणाम याची माहिती उदाहरणांसह दिली. तसेच, दैनंदिन जीवनशेलीमध्ये प्लास्टिक वापरामुळे होणारा कचरा कमी करण्यासाठी सोप्या उपायांचा अवलंब करण्याची आवश्यकता त्यांनी सांगितली. आतापर्यंत या कार्यशाळेची १० सत्रे झाली आहेत. ती आपलेपर्यावरण या यूट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहेत. ही सत्रे दर शुक्रवारी दु. ४ ते. सायं. ६ या वेळात ऑनलाईन होतात. त्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिकेच्या प्रमुख पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी केले आहे. जागतिक वसुंधरा दिनाच्या पार्श्वभूमीवर, वाढत्या उष्णतेचा मुकाबला करण्यासाठी महापालिका सज्ज असल्याची ग्वाही महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे. त्यानुसार, उष्णतेच्या लाटेबाबत जनजागृती, वृक्ष लागवड, संवर्धन, पिण्याच्या पाण्याचा जपून वापर, प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुर्नवापर यावरही भर देण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले असल्याचेही मनिषा प्रधान यांनी सांगितले.